गुजरात दंगलींवर येतोय चित्रपट

22 वर्षांनी दिसणार गोध्राचे सत्य 2002 मध्ये गुजरातच्या गोध्रा येथे झालेल्या सांप्रदायिक दंगलीवर ‘अॅक्सिडेंट ऑर कॉन्सपिरेसी : गोध्रा’ नावाचा चित्रपट तयार करण्यात आला आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर जारी करत याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नव्या पोस्टरमध्ये एका रेल्वेच्या खिडकीबाहेर काही लोकांचे हात दिसून येत असून बाहेरून डब्याला आग लागलेली आहे. या रेल्वेगाडीचे […]

गुजरात दंगलींवर येतोय चित्रपट

22 वर्षांनी दिसणार गोध्राचे सत्य
2002 मध्ये गुजरातच्या गोध्रा येथे झालेल्या सांप्रदायिक दंगलीवर ‘अॅक्सिडेंट ऑर कॉन्सपिरेसी : गोध्रा’ नावाचा चित्रपट तयार करण्यात आला आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर जारी करत याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. नव्या पोस्टरमध्ये एका रेल्वेच्या खिडकीबाहेर काही लोकांचे हात दिसून येत असून बाहेरून डब्याला आग लागलेली आहे. या रेल्वेगाडीचे नाव साबरमती एक्स्प्रेस असल्याचे दर्शविण्यात आले आहे. 2002 मध्ये घडलेल्या या घटनेच्या पीडितांची सत्यकथा मोठ्या पडद्यावर 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर शौरी, पंकज जोशी यासारखे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत.
या चित्रपटात न्यायासाठी पीडितांच्या लढाईचा प्रवास दर्शविण्यात आला आहे. चित्रपटात रणवीरने वकिलाची भूमिका साकारली असून तो गोध्रा जळितकांड प्रकरणातील पीडितांच्या वतीने न्यायालयीन लढाई लढत असल्याचे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एम.के. शिवाक्ष यांनी केले आहे.
27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रा येथून अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसमध्ये लावण्यात आलेल्या आगीत 59 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरच गुजरातमध्ये दंगल उसळली होती. गोध्रा येथील घटनेमुळे देशभरात संताप निर्माण झाला होता. आता याच घटनेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.