अभय सिंगला दुहेरी मुकुट

अभय सिंगला दुहेरी मुकुट

मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविणारे अभय सिंग-जोश्ना चिन्नप्पा
वृत्तसंस्था/ जोहोर, मलेशिया
येथे झालेल्या आशियाई डबल्स स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अभय सिंगने अप्रतिम प्रदर्शन करीत जेतेपदाचा दुहेरी मुकुट प्राप्त केला. सेंथिल कुमारसमवेत पुरुष दुहेरीचे तर जोश्ना चिन्नप्पासमवेत मिश्र दुहेरीचे जेतेपद मिळविले.
आशियाई क्रीडा सांघिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकलेल्या अभय सिंगने अनुभवी सेंथिलकुमारसमवेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. या अग्रमानांकित जोडीने अंतिम फेरीत मलेशियाच्या द्वितीय मानांकित ऑन्ग साइ हंग व शफीक कमाल यांचा 11-4, 11-5 असा पराभव केला. नंतर त्याने अनुभवी जोश्ना चिन्नप्पासमवेत खेळताना दुसऱ्या मानांकित हाँगकाँगच्या टाँग त्झे विंग व टँग मिंग हाँग यांच्यावर 11-8, 10-11, 11-5 अशी मात करीत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले.  अभय-जोश्ना यांना येथे तिसरे मानांकन मिळाले होते.
यावर्षी पद्मश्री पुरस्कार मिळविलेली जोश्ना या यशानंतर म्हणाली की, ‘भारतासाठी पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली आणि हे यश मिळविता आले हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. गेले पाच महिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे मी खेळापासून दूर होते, याचा विचार करताना हे जेतेपद माझ्यासाठी खास आहे,’ असे ती म्हणाली. दीर्घ काळानंतर राष्ट्रीय डबल्स चॅम्पियनशिप वेळेत पुनरुज्जीवन केल्याचा फायदा आम्हाला मिळाला. यामुळे आम्हाला चालना मिळाली,’ असे सेंथिल कुमार म्हणाला.