भक्ताला आपण आणि भगवंत ह्यामध्ये कुणीही नको असते

अध्याय तिसावा नाथमहाराज म्हणाले, देहत्याग करून निजधामाला जाण्यासाठी श्रीकृष्णनाथ सिद्ध झाले. त्यासाठी सकल सृष्टी धारण करणाऱ्या त्या धराधराने मौन होऊन अश्वत्थातळी वीरासन घातले आणि शार्ङ्गधर श्यामसुंदर स्थिर झाले. त्यांच्या मूर्तीचे वर्णन करताना शुक मुनी म्हणाले, सर्व स्त्राrपुरुषांचे लक्ष श्रीकृष्णाच्या मोहक मूर्तीकडेच लागले होते. अर्थात ह्यात काहीच नवल नाही. विशेष म्हणजे त्यांच्या रुपाकडे पाहून संन्यासीही भुलले […]

भक्ताला आपण आणि भगवंत ह्यामध्ये कुणीही नको असते

अध्याय तिसावा
नाथमहाराज म्हणाले, देहत्याग करून निजधामाला जाण्यासाठी श्रीकृष्णनाथ सिद्ध झाले. त्यासाठी सकल सृष्टी धारण करणाऱ्या त्या धराधराने मौन होऊन अश्वत्थातळी वीरासन घातले आणि शार्ङ्गधर श्यामसुंदर स्थिर झाले. त्यांच्या मूर्तीचे वर्णन करताना शुक मुनी म्हणाले, सर्व स्त्राrपुरुषांचे लक्ष श्रीकृष्णाच्या मोहक मूर्तीकडेच लागले होते. अर्थात ह्यात काहीच नवल नाही. विशेष म्हणजे त्यांच्या रुपाकडे पाहून संन्यासीही भुलले आणि वेडे झाले. वास्तविक पाहता संन्याशांना समोर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी भुलवू शकत नाहीत पण त्या मूर्तीत संन्याशाला मोहिनी पडावी असे सामर्थ्य होते. संन्याशाचे राहूदेत जे आधीच विरक्त झालेले परमार्थी आहेत त्यांचेही लक्ष कृष्ण्मूर्तीने वेधुन घेतले. महादेवानी जेव्हा तेजस्वी कृष्णमूर्ती बघितली तेव्हा शिवांना त्याचेच ध्यान लागले आणि त्यांनी स्वत:चे मन आपणहून कृष्णार्पण केले. मन आपणहून भगवंतांना अर्पण करणे ही परमार्थ साधनेतील अत्यंत कठीण गोष्ट आहे मात्र महादेवांनी हे सहजी केले. ईश्वराला मन आणि बुद्धी अर्पण करणारा भक्त स्वत:चे अस्तित्व विसरून जातो. तो स्वत:च्या बुद्धीने मनात आलेल्या विचारानुसार निर्णय घेत नसून त्याचे सर्व निर्णय ईश्वर स्वत: घेत असतात. श्रीकृष्णाच्या मोहक रुपाला भुलून महादेवांनी त्यांचे मन कृष्णमूर्तीला अर्पण केले. सर्वसंगपरित्यागी, स्मशानात राहणाऱ्या, वैराग्यपूर्ण महादेवांना कृष्णमूर्तीची भुरळ पडावी इतकी  श्रीकृष्णांची काया मोहक दिसत होती आणि त्यावर त्यांच्या हास्य वदनाने कडी केली होती. त्यांचे डोळे कमळासारखे सुंदर दिसत होते. डोक्यावरच्या केसात सुगंधी फुलांच्या माळा गुंफल्या होत्या. त्यांच्या कानात मकराकार कुंडले होती. ती मकराकार होती असे कविवर वर्णन करत असले तरी प्रत्यक्षात ती निराकार होती. कवीवरांनी केलेले कुंडलांचे वर्णन ऐकणाऱ्याचे राग, लोभ, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख आदि विकार मात्र मावळून जातात इतकी ती दैदिप्यमान कुंडले होती. सोने तापवले की, ते पिवळे धमक दिसते. त्याप्रमाणे कमरेवर विराजमान झालेला पितांबर आणि प्रावरण म्हणून खांद्यावर घेतलेला दुसरा पितांबर दोन्हीही तापवलेल्या सोन्यासारखेच पिवळे धमक दिसत होते. खरं म्हणजे डाव्या बाजूला बसायचा अधिकार लक्ष्मीचा असतो परंतु भगवंतांनी तिला डावलून डाव्या भागावर भृगु ऋषींनी मारलेली लाथ धारण केली होती. त्यांच्यावर भक्त करत असलेल्या आत्यंतिक प्रेमाचे ते प्रतिक होते. भृगु ऋषी श्रीविष्णूचे परमभक्त होते. विष्णू एकदा लक्ष्मीबरोबर वार्तालाप करत बसले असताना तेथे महर्षी भृगु ऋषींचे आगमन झाले. लक्ष्मीबरोबर बोलत असल्याने विष्णूचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ऋषींना संताप आला. त्यांना त्यांच्यात आणि विष्णुत कोणताही अडथळा नको होता अगदी लक्ष्मीचाही. रागाच्या भरात त्यांनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. ह्या प्रकाराने विष्णूला बिलकुल राग आला नाही. उलट आपण भक्ताकडे दुर्लक्ष केले ह्या गोष्टीचे त्यांना वाईट वाटले. पुन्हा असे घडू नये म्हणून त्यांनी त्या लाथेची खुण स्वत:च्या छातीवर कायमची धारण केली. ती खुण बघितली की, भक्ताच्या हाकेला विनाविलंब धावून जाण्याची आठवण त्यांच्या मनात कायम होत असते. म्हणून त्यांनी उद्धवाला सांगितले होते की, जे मन आणि बुद्धी मला अर्पण करतात त्यांना मी माझ्यासारखे करतो हे खरे पण कोणत्याही परिस्थितीत ही लाथेची खुण मात्र त्यांच्या छातीवर उमटू देत नाही कारण भृगु ऋषींनी त्यांच्यावरील हक्काचे प्रतिक म्हणून ती लाथ त्यांना मारली होती. भक्ताला आपण आणि भगवंत ह्यामध्ये कुणीही आलेले आवडत नाही. म्हणून भगवंतांना ती लाथेची खुण भक्ताच्या प्रेमाचे प्रतिक वाटत होती. आत्ता निजधामाला जातानाही त्यांच्या छातीवर ती खुण स्पष्ट दिसत होती.
क्रमश: