मराठी शाळा वाचविण्याचे मोठे आव्हान

शिवाजीनगर येथील शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न, प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे पटसंख्येत घट बेळगाव : मराठी शाळा बंद करण्याचा कुटील डाव प्रशासनाकडून सुरू आहे. ज्या भागात मराठी शाळांची पटसंख्या अधिक आहे, त्या शाळा या ना त्या कारणाने इतर भागात स्थलांतरित करून पटसंख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाजीनगरसारख्या मराठी भागातील शाळेत आज हातावर मोजण्याइतके विद्यार्थी शिल्लक राहिले […]

मराठी शाळा वाचविण्याचे मोठे आव्हान

शिवाजीनगर येथील शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न, प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे पटसंख्येत घट
बेळगाव : मराठी शाळा बंद करण्याचा कुटील डाव प्रशासनाकडून सुरू आहे. ज्या भागात मराठी शाळांची पटसंख्या अधिक आहे, त्या शाळा या ना त्या कारणाने इतर भागात स्थलांतरित करून पटसंख्या कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाजीनगरसारख्या मराठी भागातील शाळेत आज हातावर मोजण्याइतके विद्यार्थी शिल्लक राहिले असून त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. अशाचप्रकारे इतर मराठी शाळांमधील पटसंख्या कमी कशी करता येईल, याचा विचार शिक्षण विभागाकडून केला जात आहे. नेहमीच कर्नाटक सरकारच्या डोळ्यात खुपणाऱ्या मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. अनुदान मंजूर न करणे, शिक्षकांची कमतरता, सुविधांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवणे असे प्रकार आता प्रशासनाकडून केले जातात. बेळगाव शहरातील शिवाजीनगर हा परिसर तसा मराठीबहुल भाग आहे. या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून मराठी शाळा क्रमांक 27 सुरू होती. 60 ते 70 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत होते. शाळेची इमारत काहीशी जीर्ण झाल्याचे कारण देत यापूर्वीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळेचे रामनगर येथे स्थलांतर केले. शाळा जीर्ण झाली असल्याने काही ठिकाणी छतामधून पाणी खाली पडत होते. विद्यार्थ्यांचा विचार करून शाळेचे स्थलांतर केले असले तरी पत्रे घालण्याचे काम एप्रिल-मे महिन्याच्या सुटीत करता आले नसते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाजीनगरपासून रामनगर हे तीन ते चार किलोमीटरचे अंतर असल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. 2021 मध्ये 30 ते 35 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत होते. परंतु, रामनगर येथे स्थलांतर झाल्यानंतर ही पटसंख्या निम्म्याहून कमी झाली. दीड वर्ष ही शाळा रामनगर येथे सुरू असल्याने नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश होऊ शकला नाही. जवळ मराठी शाळा उपलब्ध नसल्याने शिवाजीनगर येथील विद्यार्थी इतर शाळांमध्ये दाखल झाले. एसडीएमसी व शिवाजीनगर येथील नागरिकांच्या रेट्यामुळे सप्टेंबर 2023 मध्ये ही शाळा पुन्हा शिवाजीनगर येथे त्याच इमारतीत सुरू झाली. परंतु, यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटली असून शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहे.
पटसंख्या वाढविण्याचे मोठे आव्हान
पटसंख्या कमी होत असल्याने शहरातील अनेक शाळा इतर शाळांमध्ये विलीनीकरण करण्यात आल्या. अशीच परिस्थिती या शाळेचीही होऊ नये यासाठी पटसंख्या वाढविणे गरजेचे आहे. सध्या या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आता मराठी भाषिकांनी आपले मुले या शाळेत पाठविणे गरजेचे आहे.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयासाठीही पाहणी
बेळगाव ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला मागील वर्षी जागा नसल्याने शहरात पाहणी केली जात होती. शिवाजीनगर येथील शाळा रामनगर येथे हलविण्यात आल्याने ही इमारत गटशिक्षणाधिकारी कार्यालयासाठी घेण्याचाही प्रयत्न झाला. परंतु, याला विरोध झाल्याने हे कार्यालय गणपत गल्ली येथील शाळेत हलविण्यात आले.