यादव विरांच्यात आरपारची लढाई सुरु झाली

अध्याय तिसावा श्रीकृष्ण यादवांना म्हणाला, आपल्या कुळाला ब्राह्मणांचा शाप आहे हे तुम्हाला माहित आहेच. त्या शापानुसार आपले समस्त कुल नष्ट होणार आहे. त्याचीच खुण म्हणून द्वारकेवर नाना विघ्ने येऊन अनेक उत्पात घडत आहेत. आता जर आपण येथे राहिलो तर घोर संकटात सापडून दु:खी होऊ. त्यावर उपाय म्हणून येथे क्षणभरसुद्धा न राहता आपण सर्वजण प्रभास क्षेत्री […]

यादव विरांच्यात आरपारची लढाई सुरु झाली

अध्याय तिसावा
श्रीकृष्ण यादवांना म्हणाला, आपल्या कुळाला ब्राह्मणांचा शाप आहे हे तुम्हाला माहित आहेच. त्या शापानुसार आपले समस्त कुल नष्ट होणार आहे. त्याचीच खुण म्हणून द्वारकेवर नाना विघ्ने येऊन अनेक उत्पात घडत आहेत. आता जर आपण येथे राहिलो तर घोर संकटात सापडून दु:खी होऊ. त्यावर उपाय म्हणून येथे क्षणभरसुद्धा न राहता आपण सर्वजण प्रभास क्षेत्री जाऊ. तेथे काही धार्मिक कार्ये करून आपल्याला मिळालेल्या शापाचा प्रभाव नष्ट करण्याचा प्रयत्न करू. जेथे हरीचे देवतार्चन तसेच शाळीग्रामशिळेचे पूजन होते आणि साधुसंतांचा सन्मान होतो तेथे अरिष्टाचा नाश होतो. यादवांनी श्रीकृष्णाचे म्हणणे अत्यंत आदराने स्वीकारले. यादवांनी प्रभासला पोहोचल्यावर श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे स्नान, दान आदि सर्व विधी पार पाडले. भोजन केले. त्यानंतर त्यांनी मद्यपानाला सुरवात केली. खरं म्हणजे श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे तीर्थविधान करून अरिष्टनिरसन करण्यासाठी ते सर्वजण प्रभासला गेले होते. तेथे मद्यपान करणे कदापि योग्य नव्हते परंतु सर्व विधी आटोपताच लहनमोठ्या सर्वानीच मद्य प्यायला सुरवात केली आणि थोड्याच वेळात ते झिंगु लागले. ‘मैरेयक’ नावाच्या मद्याची थोरी अशी की त्याचे माधुर्य अत्यंत भारी असते. जिभेला त्याचा स्पर्श झाला रे झाला की, सज्ञान मनुष्यसुद्धा भ्रांतीवटागत करू लागतो. लहानथोर यादववीर त्याच मद्याचे सेवन स्वेच्छेने आणि अत्यंत आदराने करू लागले. एकमेकांना आग्रह करू लागले. जे एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र होते ते मद्यपानाने मस्तवाल झाल्याने एकमेकांना टोचून बोलू लागले, एकमेकांची उणीदुणी काढू लागले. कृष्णमायेच्या परिणामाने त्यांची बुद्धी नष्ट झाली. बुद्धिमंत होते ते बुद्धिमंद झाले. आपली नातीगोती विसरून गेले. त्यामुळे नुसते एकमेकांना टोचून बोलण्यावर ते थांबले नाहीत तर अत्यंत क्रोध आल्याने हातात शस्त्रs घेऊन त्यांनी निर्वाणीचे युद्ध मांडले. रागाने त्यांचे डोळे लाल झाले. तशाच तांबारलेल्या डोळ्यांनी शस्त्रs परजून ते महावीर समुद्राच्या तीरावर घनघोर युद्ध करू लागले. संपूर्ण विवेक हरवून बसल्याने आपण काय करतोय, कुणाबरोबर लढतोय ह्या कशाचीही शुद्धबुद्ध त्यांना राहिली नाही. मद्याच्या धुंदीत हातात धनुष्य घेऊन  सणसणा बाण सोडू लागले, तलवारींचा खणखणाट करू लागले. खरं म्हणजे हे सर्व शौर्य त्यांनी शत्रूशी लढताना त्यांनी दाखवणे अपेक्षित होते परंतु मद्यधुंद झाल्याने ते आपापसात लढून एकमेकांचे प्राण घ्यायला आतुर झाले. भाले उचलून परस्परांच्या छ्ताडांचा वेध घेऊ लागले. गदेने एकमेकांची डोकी फोडू लागले. आपापली चतुरंगसेना घेऊन रणकंदन करू लागले. उन्मत्त झालेले हत्ती ज्याप्रमाणे वनात आपापले लांबलचक दात एकमेकात रुतवायचा प्रयत्न करून एकमेकांचा जीव घेतात तशी आरपारची लढाई सुरु झाली. मोडलेल्या रथांचे, मेलेल्या हत्तींचे आणि असंख्य यादववीरांच्या प्रेतांचे खच पडले. अशा पद्धतीने यादवांनी परस्परांचा व्यर्थ घात केला. हे सर्व बघून श्रीकृष्णाची मुले खवळली. तिही एकमेकांशी युद्ध करायला आतुर झाली. खरं म्हणजे त्यांचे एकमेकांवर अत्यंत प्रेम होते. तरीही ते एकमेकांशी प्राणपणाने लढू लागले. काळगती संहारक असते. मित्र मित्राचा जीव घेण्याची भाषा बोलू लागले. प्रद्युम्न आणि सांब हे जवळचे मित्र होते पण त्यांनी एकमेकांशी घोर युद्ध आरंभले. अक्रूर आणि भोज दोन्ही वीर एकमेकांशी लढू लागले. अनिरुद्ध आणि सात्यकी ह्यानाही एकमेकांचा राग आला. अपशब्द बोलून परस्परांनी एकमेकांचा उद्धार केला आणि नंतर ते आपापसात लढू लागले. सुभद्र आणि संग्रामजित ह्या दोन खवळलेल्या योद्ध्यांनी उन्मत्त होऊन बाणांचा एकमेकावर वर्षाव केला. कृष्णपुत्र, कृष्णबंधु दोघांचेही नाव गदु होते. त्यांनाही एकमेकांचा राग येऊन त्यांनी युद्धाला सुरवात केली.
क्रमश: