मुंबई: बॉलीवूडमध्ये ‘लारा’ या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री एव्हलिन शर्मा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या या अभिनेत्रीने लग्नाच्या पाच वर्षांनंतर पती तुशान भिंडीपासून वेगळे होत असल्याची धक्कादायक घोषणा केली आहे. या बातमीने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असला तरी, मुलांच्या भविष्यासाठी या जोडप्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दोघांवरही हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत एव्हलिनने या निर्णयाची पुष्टी केली. ती म्हणाली, “हो, आम्ही आता वैवाहिक नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जरी आमचे रस्ते वेगळे झाले असले, तरी आमचे पूर्ण लक्ष आमच्या मुलांच्या उत्तम संगोपनावर असेल.” आयुष्याचा हा नवा धडा मैत्री आणि सह-पालकत्वाच्या (Co-parenting) माध्यमातून पुढे नेणार असल्याचेही तिने स्पष्ट केले.
सिडनीच्या यॉटवरील त्या प्रपोजची झाली होती चर्चा एव्हलिन आणि तुशानची भेट २०१८ मध्ये एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. या मैत्रीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. २०१९ मध्ये तुशानने सिडनी हार्बर ब्रिजसमोर एका आलिशान यॉटवर अत्यंत रोमँटिक पद्धतीने एव्हलिनला लग्नासाठी विचारले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर २०२१ मध्ये कोरोनाच्या निर्बंधांमुळे ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे एका साध्या कौटुंबिक सोहळ्यात हे दोघे विवाहबंधनात अडकले होते.
सिनेसृष्टीला केला होता रामराम लग्नानंतर एव्हलिनने बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राहणे पसंत केले आणि ती पतीसोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. त्यांना ‘आवा’ ही मुलगी आणि ‘आर्डेन’ हा मुलगा अशी दोन मुले आहेत. सोशल मीडियावर ती अनेकदा मुलांसोबतचे आनंदाचे क्षण शेअर करत असते.
एव्हलिनचा बॉलिवूडमधील प्रवास २०१२ मध्ये ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ मधून पदार्पण करणाऱ्या एव्हलिनला २०१३ मधील ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने स्टारडम मिळवून दिले. त्यानंतर तिने ‘यारियाँ’, ‘मैं तेरा हीरो’ आणि प्रभाससोबत ‘साहो’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.