इलेक्टोरल बाँड्समधून भाजपला सुमारे 7,000 कोटी

नवीन डेटा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जारी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली निवडणूक आयोगाने रविवारी इलेक्टोरल बाँड्सबाबत नवीन डेटा सार्वजनिक केला. ही आकडेवारी आयोगाने सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केली. न्यायालयाने नंतर आयोगाला हा डेटा सार्वजनिक करण्यास सांगितले. नव्याने जारी करण्यात आलेला तपशील 12 एप्रिल 2019 पूर्वीच्या कालावधीशी संबंधित असून भाजपने एकूण 6,986.5 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवल्याचे […]

इलेक्टोरल बाँड्समधून भाजपला सुमारे 7,000 कोटी

नवीन डेटा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने रविवारी इलेक्टोरल बाँड्सबाबत नवीन डेटा सार्वजनिक केला. ही आकडेवारी आयोगाने सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केली. न्यायालयाने नंतर आयोगाला हा डेटा सार्वजनिक करण्यास सांगितले. नव्याने जारी करण्यात आलेला तपशील 12 एप्रिल 2019 पूर्वीच्या कालावधीशी संबंधित असून भाजपने एकूण 6,986.5 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे वटवल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित नवीन डेटा आपल्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. या माहितीमधून 2019-20 मध्ये भाजपला सर्वाधिक 2,555 कोटी रुपये मिळाल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसने निवडणूक रोख्यांद्वारे एकूण 1,334.35 कोटी रुपये जमा केले, तर बीजेडीला 944.5 कोटी रुपये, वायएसआर काँग्रेसला 442.8 कोटी ऊपये आणि टीडीपीला 181.35 कोटी रुपये मिळाले. तसेच द्रमुकला निवडणूक रोख्यांद्वारे 656.5 कोटी रुपये मिळाले असून त्यात सँटियागो मार्टिनच्या नेतृत्वाखालील फ्यूचर गेमिंगकडून मिळालेल्या 509 कोटी रुपयांचा समावेश आहे. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसला 1,397 कोटी रुपये आणि बीआरएसला 1,322 कोटी रुपये इलेक्टोरल बाँड्सद्वारे मिळाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, समाजवादी पक्षाला (एसपी) 14.05 कोटी, अकाली दलाला 7.26 कोटी, एआयएडीएमकेला 6.05 कोटी, नॅशनल कॉन्फरन्सला 50 लाख ऊपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत.
निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात निवडणूक रोख्यांशी संबंधित पहिला तपशील सार्वजनिक केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार राजकीय पक्षांनी निवडणूक रोख्यांशी संबंधित डेटा सीलबंद कव्हरमध्ये दाखल केला होता. 15 मार्च 2024 पूर्वी निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्याची मुदत निवडणूक आयोगाला देण्यात आली होती.
सर्वोच न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआयने (भारतीय स्टेट बँक) अखेर निवडणूक रोख्यांविषयीची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. त्यानुसार, एसबीआयकडून एकूण 22,217 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली असून त्यापैकी 22,030 रोखे राजकीय पक्षांकडून वटवण्यात आल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून भारतीय स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती 12 मार्च रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाद्वारे त्यासंबंधीची माहिती देण्यात आली.
स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2019 ते 11 एप्रिल 2019 दरम्यान एसबीआयकडून 3,346 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली. यापैकी 1,609 रोखे वटवण्यात आले. तसेच 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 18,871 निवडणूक रोखे खरेदी केले गेले. त्यापैकी 20,421 रोखे वटवले गेल्याचे स्पष्ट झाले. एकंदर 22,217 निवडणूक रोख्यांची खरेदी झाली असून त्यापैकी 22,030 रोखे वटवण्यात आले आहेत.