भारतीय डेव्हिस चषक संघाला पाकिस्तानमध्ये जावे लागणार

‘आयटीएफ’ लवादाने अखिल भारतीय टेनिस संघटनेचे अपिल फेटाळले वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘आयटीएफ’ लवादाने इस्लामाबादमधील जागतिक गट 1 प्ले-ऑफ लढतीदरम्यान डेव्हिस चषक संघाला सुरक्षेच्या प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो हा अखिल भारतीय टेनिस संघटनेचा दावा फेटाळून लावला आहे. यामुळे भारतीय टेनिस संघाच्या 60 वर्षांतील पहिल्या पाकिस्तान दौऱ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर भारतीय संघ पाकिस्तानला जाण्यात […]

भारतीय डेव्हिस चषक संघाला पाकिस्तानमध्ये जावे लागणार

‘आयटीएफ’ लवादाने अखिल भारतीय टेनिस संघटनेचे अपिल फेटाळले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘आयटीएफ’ लवादाने इस्लामाबादमधील जागतिक गट 1 प्ले-ऑफ लढतीदरम्यान डेव्हिस चषक संघाला सुरक्षेच्या प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो हा अखिल भारतीय टेनिस संघटनेचा दावा फेटाळून लावला आहे. यामुळे भारतीय टेनिस संघाच्या 60 वर्षांतील पहिल्या पाकिस्तान दौऱ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर भारतीय संघ पाकिस्तानला जाण्यात अपयशी ठरला, तर यजमान देशाला विजयी घोषित करण्यात येईल आणि भारतीय संघ जागतिक गट-2 मध्ये फेकला जाईल.
भारतीय डेव्हिस चषक संघाने शेवटच्या वेळी म्हणजे 1964 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता, जेव्हा त्यांनी यजमानांना 4-0 ने पराभूत केले होते. अखिल भारतीय टेनिस संघटनेचे (एआयटीए) महासचिव अनिल धुपर यांनी ‘आयटीएफ’ने त्यांचे अपिल फेटाळले आहे, याची पुष्टी केली. मला एक संदेश मिळाला आहे की, संघटनेचे अपिल आयटीएफ लवादाने फेटाळले आहे. आम्ही सोमवारी क्रीडा मंत्रालयाशी संपर्क साधू आणि आम्ही संघ पाठवणार असल्यास त्यांचे मार्गदर्शन घेऊ, असे धुपर यांनी सांगितले.
अखिल भारतीय टेनिस संघटनेने अलीकडेच 3 व 4 फेब्रुवारीच्या जागतिक गट-1 मधील प्ले-ऑफ लढतीसाठी पाच सदस्यीय संघाची घोषणा केली होती. जर ‘आयटीएफ’ने त्यांचे अपिल नाकारले, तर ते डेव्हिस चषक संघ पाकिस्तानला पाठवतील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. ‘एआयटीए’ची तटस्थ ठिकाणी सामना खेळविण्याची विनंती 15 सदस्यीय डेव्हिस चषक समितीने फेटाळल्यानंतर या राष्ट्रीय महासंघाने ‘आयटीएफ’ लवादाकडे धाव घेतली होती.
‘पाकिस्तानमध्ये लढत आयोजित करण्याच्या डेव्हिस चषक समितीच्या निर्णयामागे ठोस कारणे आहेत आणि डेव्हिस चषक स्पर्धेसाठी या समितीने निवडलेल्या स्थळी जाणे सर्व राष्ट्रांसाठी आवश्यक आहे, असे लवादाने म्हटल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध तणावपूर्ण असल्याने भारताला इतर देशांप्रमाणे वागणूक देऊ नये, असा ‘एआयटीए’चा मुद्दा होता. 8 फेब्रुवारीला पाकिस्तानची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने तेथे जाऊ नये, असा युक्तिवादही ‘एआयटीए’ने केला होता.