ठाणे शहरात 19 डिसेंबर 2025 पर्यंत 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे. कल्याण फाटा येथे महानगर गॅसकडून सुरू असलेल्या कामादरम्यान पिसे धरणातून ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या 1000 मिमी व्यासाच्या जलवाहिनीला 11 डिसेंबर 2025 रोजी चार ते पाच ठिकाणी बिघाड झाला आहे.सदर जलवाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी चार दिवस लागण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा विभागाकडून दुरुस्तीचे काम तातडीने आणि वेगाने सुरू आहे. मात्र ही जलवाहिनी जुनी असून प्री-स्ट्रेस्ड काँक्रिट तंत्रज्ञानाने बनवलेली आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडचणी येत आहेत आणि ते पूर्ण होण्यासाठी अजून चार दिवस लागण्याची शक्यता आहे. परिणामी ठाणे शहराचा पाणीपुरवठा घटला असून संपूर्ण शहरात 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे.शहरात पाणी पुरवठ्याचा समतोल राखण्यासाठी झोनिंग प्रणालीद्वारे प्रत्येक भागाला दिवसातून 12 तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना मर्यादित प्रमाणात आणि अनियमित वेळेत पाणी मिळणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
ठाणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ तारखेला 50% पाणी कपात जाहीर
