परिवहनच्या 50 बसेस भंगारात

नवीन बसेसकडे लक्ष : सार्वजनिक बस वाहतुकीवर ताण बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. विविध मार्गांवर बसफेऱ्या कमी असल्यामुळे परिवहनचा डोलारा डळमळीत झाला आहे. येत्या जूनपर्यंत 50 बसेस स्क्रॅपमध्ये काढल्या जाणार आहेत. तत्पूर्वी ताफ्यात नवीन बसेस येणे आवश्यक आहे. शासनाकडे नवीन बसेससाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे बेळगाव परिवहनचे […]

परिवहनच्या 50 बसेस भंगारात

नवीन बसेसकडे लक्ष : सार्वजनिक बस वाहतुकीवर ताण
बेळगाव : परिवहनच्या ताफ्यात बसेसची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. विविध मार्गांवर बसफेऱ्या कमी असल्यामुळे परिवहनचा डोलारा डळमळीत झाला आहे. येत्या जूनपर्यंत 50 बसेस स्क्रॅपमध्ये काढल्या जाणार आहेत. तत्पूर्वी ताफ्यात नवीन बसेस येणे आवश्यक आहे. शासनाकडे नवीन बसेससाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे बेळगाव परिवहनचे नवीन बसेसकडे लक्ष लागले आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज विविध मार्गांवर 650 हून अधिक बसेस धाऊ लागल्या आहेत. मात्र शक्तीयोजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे बसेसचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी बसफेऱ्या कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिवहनच्या ताफ्यात असलेल्या एकूण बसेसपैकी 150 बसेस आयुर्मान संपलेल्या आहेत. यापैकी 50 बसेस जूनपर्यंत भंगारात काढल्या जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा बससेवेवर अतिरिक्त ताण वाढला आहे.
मागील दोन वर्षांपासून नवीन बसेससाठी मागणी होऊ लागली आहे. मात्र सरकारकडून केवळ एक, दोन बस देऊन तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या बसेसवर डोलारा सुरू आहे. परिणामी बसेस नादुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सार्वजनिक बससेवेवर परिणाम होताना दिसत आहे. कोरोनाकाळात परिवहनचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून मदत घेण्यात आली होती. नवीन बसेस खरेदीसाठी आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत परिवहनने बीएमटीसीकडून जुन्या बसेस खरेदी केल्या आहेत. 15 वर्षे वापर झालेल्या बसेस दुरुस्त करून वापरल्या जात आहेत. त्यामुळे या बसेसही आता भंगारात काढाव्या लागणार आहेत. प्रवाशांच्या संख्येत बसेस कमी असल्याने बससेवा अनियमित होत आहे. काही बसेस बंद केल्या जात आहेत. त्यामुळे सार्वजनिक बस वाहतूक विस्कळीत होत आहे.
शासनाकडे नवीन 50 बसेससाठी पाठपुरावा
शासनाकडे नवीन 50 बसेससाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. हुबळी विभागाला 100 बसेस मिळाल्या आहेत. बेळगाव परिवहनलाही जूनपर्यंत नवीन बसेस मिळणे गरजेचे आहे. बस, बसचालक आणि वाहकांची कमतरता असल्याने बससेवेवर ताण वाढू लागला आहे.
– ए. वाय. शिरगुप्पीकर, डेपो मॅनेजर