बेळगावात उभारणार 50 चार्जिंग स्टेशन्स
महामार्गाशेजारी प्राधान्य : इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढतेय
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाहनांसाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स गरजेची आहेत. सध्या काही खासगी कंपन्या निवडक ठिकाणी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारकडूनही बेळगावमध्ये 50 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे लवकरच सरकारी इमारती व महामार्गाशेजारी उच्चक्षमतेची चार्जिंग स्टेशन्स बेळगावमध्ये उपलब्ध होणार आहेत. कर्नाटकात डिसेंबरअखेर 3 लाख 31 हजार इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यापूर्वीची अनेक वाहने नोंदणी नसताना वापरली जात आहेत. त्यामुळे ही संख्या 4 लाखांहून अधिक असण्याची शक्यता आहे. राज्यभरात 5 हजार 59 चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. काही खासगी कंपन्यांनी हॉटेल्स, तसेच कंत्राटी पद्धतीने जागा घेऊन चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत. देशात सर्वाधिक चार्जिंग स्टेशन्स कर्नाटकात असल्याचे नुकतेच एका सर्व्हेद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ दुचाकीच इलेक्ट्रिक वाहनांची संख्या जास्त होती. परंतु, आता तिचाकी व चारचाकी वाहनांचीही संख्या वाढत असल्याने ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स होणे गरजेचे आहे. विशेषत: महामार्गाशेजारी किमान 100 किलोमीटरला एक चार्जिंग स्टेशन उभारण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारकडून चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा प्रस्ताव आहे. बेळगावमध्ये 50 तर शेजारील धारवाड जिल्ह्यात 33 चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.
बेंगळूरच्या धर्तीवर बेळगावमध्येही चार्जिंग स्टेशन्स उभारणार
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असल्याने चार्जिंग स्टेशन्सची मागणी वाढत आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी कार्यालय, तसेच सरकारी खुल्या जागा व महामार्गाशेजारी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा प्रस्ताव आहे. बेंगळूर येथे बेस्कॉमकडून चार्जिंग स्टेशन्स उभारणीचे काम सुरू असून त्याच धर्तीवर बेळगावमध्ये हेस्कॉमच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.
– ए. एम. शिंदे (कार्यकारी अभियंते)
लवकरच इलेक्ट्रिक बस धावणार
बेळगावमधून येत्या काळात इलेक्ट्रिक बस धावणार असल्याने यासाठी हेस्कॉमने तयारी सुरू केली आहे. शिवाजीनगर येथील केएसआरटीसीच्या डेपो क्रमांक 3 मध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. डेपोच्या प्रवेशद्वारानजीक 4 हजार केव्ही तर अंतर्गत भागात 2500 केव्ही इतक्या मोठ्या क्षमतेची चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याचा प्रस्ताव हेस्कॉमच्या बेळगावमधील अधिकाऱ्यांनी हुबळी येथील मुख्य कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे लवकरच स्टेशन्स सुरू झाल्यास इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.
Home महत्वाची बातमी बेळगावात उभारणार 50 चार्जिंग स्टेशन्स
बेळगावात उभारणार 50 चार्जिंग स्टेशन्स
महामार्गाशेजारी प्राधान्य : इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढतेय बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाहनांसाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशन्स गरजेची आहेत. सध्या काही खासगी कंपन्या निवडक ठिकाणी चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारकडूनही बेळगावमध्ये 50 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे लवकरच सरकारी इमारती व महामार्गाशेजारी उच्चक्षमतेची […]