दोडा चकमकीत 5 सैनिक हुतात्मा
एका अधिकाऱ्याचाही समावेश, हल्ल्याचा प्रतिशोध घेण्याचा सेनाप्रमुखांचा निर्धार
वृत्तसंस्था / दोडा
जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे सीमावर्ती भागात दहशतवाद्यांशी होत असलेल्या चकमकीत भारतीय सेनेचे एक अधिकारी आणि चार सैनिक हुतात्मा झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार केले जात असताना त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सेनेकडून देण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात कठुआ येथील चकमकीतही चार सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. सोमवारचा हल्ला हा गेल्या महिनाभरातील सातवा हल्ला होता. सोमवारी रात्रीपासूनच ही चकमक सुरु होती. दोडा परिसरातील उरार बग्गी वनप्रदेशात दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सचे सैनिक आणि स्थानिक पोलीस यांनी या प्रदेशात प्रवेश करुन दहशतवाद्यांना टिपण्याचे अभियान हाती घेतले होते. याचवेळी एका सैनिकांच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात चार सैनिक आणि एका अधिकाऱ्यांना गंभीर जखमा झाल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचार सुरु असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली, अशी माहिती सेनेच्या प्रवक्त्याने या घटनेनंतर दिली.
चकमक अद्यापही सुरुच
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर या भागात अतिरिक्त सेनाबळ पाठविण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे अभियान पुढे सुरु ठेवण्यात आले आहे. दोडा येथील वनप्रदेश दुर्गम असून दहशतवाद्यांनी येथे लपण्यासाठी अनेक स्थाने निर्माण केली आहेत. ही स्थाने शोधून नष्ट करण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये चकमकींचे प्रमाण वाढले आहे.
राजनाथसिंग यांचा संपर्क
संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी या घटनेनंतर भूसेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याची चर्चा केली. द्विवेदी यांनी त्यांना सीमेवरील परिस्थितीची आणि सेनेने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी अभियानाची माहिती दिली. दहशतवादाचा पूर्णपणे नि:पात करण्याचा सेनेचा निर्धार असून त्या दिशेने कार्यवाही होत आहे, असे प्रतिपादन नंतर राजनाथसिंग यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सीमेवर देशासाठी संघर्ष करणाऱ्या सैनिकांसमवेत सारा देश आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
हल्ल्याचा प्रतिशोध घेऊच
गेल्या एका आठवड्यात कठुआ आणि दोडा भागांमध्ये भारतीय सेनेच्या 9 सैनिकांना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत. आम्ही नेटाने दहशतवाद्यांना संपविण्यासाठी अभियान चालविलेले आहे. आमच्या सैनिकांच्या बलिदानाचा प्रतिशोध कोणत्याही परिस्थितीत घेतला जाईल. दहशतवादाचा पूर्ण नायनाट केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी राजनाथसिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर केले.
हेलिकॉप्टरचा उपयोग
वनप्रदेशात लपून हल्ले चढविणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सेनेने आता हेलिकॉप्टरचा उपयोग सुरु केला आहे. हेलिकॉप्टरमधून दहशतवादी लपलेल्या स्थानांवर गोळीबार करण्यात येत आहे. या गोळीबारात मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले गेल्याची अनधिकृत माहिती आहे. मात्र, या माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, हेलिकॉप्टरचा उपयोग यापुढेही केला जाईल, अशी माहिती सेना सूत्रांनी पत्रकारांना सोमवारी दिली आहे.
विरोधकांची सरकारवर टीका
सीमेवरील हल्ल्यांमध्ये होणाऱ्या सैनिकांच्या जीवितहानीला केंद्र सरकार जबाबदार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होत आहे. या घटना चिंताजनक असून सरकारने त्यांची जबाबदारी घ्यावी, असे विधान त्यांनी केले. गेल्या 32 महिन्यांमध्ये 50 सैनिक देशाने गमावले आहेत. याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केला. उत्तरदायित्व निश्चित करुन आतापर्यंत काही अधिकाऱ्यांना पदच्युत करावयास हवे होते. तसेच जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना घरी पाठवावयास हवे होते, असे विधान त्यांनी केले.
चकमक अद्यापही सुरुच…
ड दोडा येथे मध्यरात्रीपासून होत असलेली चकमक अद्यापही सुरुच
ड वनप्रदेशात लपलेल्या दहतशवाद्यांना शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न
ड या दहशतवादी हल्ल्यांचा प्रतिशोध घेण्याचा सैन्यदलांकडून निर्धार
ड दहशतवादी लपलेल्या भागांमध्ये अतिरिक्त सैनिक तुकड्या नियुक्त
Home महत्वाची बातमी दोडा चकमकीत 5 सैनिक हुतात्मा
दोडा चकमकीत 5 सैनिक हुतात्मा
एका अधिकाऱ्याचाही समावेश, हल्ल्याचा प्रतिशोध घेण्याचा सेनाप्रमुखांचा निर्धार वृत्तसंस्था / दोडा जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे सीमावर्ती भागात दहशतवाद्यांशी होत असलेल्या चकमकीत भारतीय सेनेचे एक अधिकारी आणि चार सैनिक हुतात्मा झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार केले जात असताना त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती सेनेकडून देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात कठुआ येथील […]