दहापैकी 5 कंपन्यांच्या बाजार भांडवलात घसरण

टीसीएस, इन्फोसिस सर्वाधिक तोट्यात : रिलायन्सच्या मूल्यात मात्र वाढ वृत्तसंस्था/ मुंबई शेअर बाजारातील आघाडीवरच्या दहापैकी पाच कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 1 लाख 97 हजार कोटी रुपयांची घसरण दिसून आली आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. मागच्या आठवड्यामध्ये आघाडीवरच्या पाच कंपन्यांचे बाजार भांडवल […]

दहापैकी 5 कंपन्यांच्या बाजार भांडवलात घसरण

टीसीएस, इन्फोसिस सर्वाधिक तोट्यात : रिलायन्सच्या मूल्यात मात्र वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजारातील आघाडीवरच्या दहापैकी पाच कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये 1 लाख 97 हजार कोटी रुपयांची घसरण दिसून आली आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस या आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. मागच्या आठवड्यामध्ये आघाडीवरच्या पाच कंपन्यांचे बाजार भांडवल 1 लाख 97 हजार 958 कोटी रुपयांनी घसरले होते. मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 188 अंकांनी वधारला होता.
का घटले आयटी कंपन्यांचे भांडवल?
टीसीएसचे बाजार भांडवल 1 लाख 10 हजार 134 कोटी रुपयांनी घटून 14 लाख 15 हजार 793 कोटी रुपयांवर राहिले होते. इन्फोसिसचे बाजार भांडवल 52 हजार 291 कोटींनी घटून 6 लाख 26 हजार 280 कोटी रुपयांवर राहिले होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील अॅक्सेंचर या कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी आपल्या महसुलामध्ये घसरणीचा अंदाज वर्तवल्याने शुक्रवारी आयटी क्षेत्रातील कंपन्यांवर शेअरबाजारात दबाव दिसून आला होता.
इतर कंपन्यांची काय स्थिती
अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याचप्रमाणे एचडीएफसी बँक यांच्या बाजार भांडवलामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बाजार भांडवलात 49 हजार 152 कोटी रुपयांची वाढ झाली असून कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 19 लाख 68 हजार 748 कोटी रुपये झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजार भांडवलामध्ये 12851 कोटी रुपयांची वाढ झाली असून मूल्य 6 लाख 66 हजार 133 कोटी रुपयांवर पोहोचले होते. एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीचे बाजार भांडवल मूल्य 11 हजार 108 कोटी रुपयांनी वाढले होते, जे 5 लाख 34 हजार 768 कोटी रुपयांवर पोहोचले.