अशोकनगर क्रीडा संकुलासाठी चौथ्यांदा निविदा

मनपा आयुक्त राजेश्री जैनापुरे यांची माहिती बेळगाव : शहरातील खासबाग येथे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारलेल्या भाजीमार्केट गाळ्यांचे वितरण लवकरच करण्यात येईल. तसेच अशोकनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी चौथ्यांदा निविदा बोलाविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राजेश्री जैनापुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शहरामध्ये खासबाग येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. […]

अशोकनगर क्रीडा संकुलासाठी चौथ्यांदा निविदा

मनपा आयुक्त राजेश्री जैनापुरे यांची माहिती
बेळगाव : शहरातील खासबाग येथे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत उभारलेल्या भाजीमार्केट गाळ्यांचे वितरण लवकरच करण्यात येईल. तसेच अशोकनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी चौथ्यांदा निविदा बोलाविण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राजेश्री जैनापुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शहरामध्ये खासबाग येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. भाजी विक्रेत्यांसाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गाळे उभारण्यात आले आहेत. मात्र गाळ्यांचे वितरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गाळ्यांचे वितरण कधी करणार? असा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित करण्यात आला. यावेळी आयुक्त जैनापुरे यांनी सदर गाळे अद्याप मनपाकडे हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही प्रक्रिया विलंब झाली आहे. लवकरच स्मार्ट सिटी योजना अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेऊन गाळे वितरण प्रक्रिया राबवू, असे त्यांनी सांगितले.
अशोकनगर येथे बॅडमिंटन स्टेडीयम, स्वीमिंगपूल, जीम उभारण्यात आली आहे. जवळपास 400 कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. मात्र या सुविधा नागरिकांसाठी अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे कोट्यावधींची साधनसामग्री धूळखात पडली आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या, याच्या देखभालीसाठी तीनवेळा निविदा बोलाविण्यात आली होती. मात्र कोणीही पुढे आलेले नाही. लवकरच चौथ्यांदा निविदा बोलाविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेत काही अडचणी असतील तर त्या दूर करून निविदा बोलाविण्यात येईल. यालाही प्रतिसाद मिळाला नाही तर महानगरपालिकेकडूनच देखभालीची जबाबदारी घेऊन नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त राजेश्री जैनापुरे यांनी सांगितले.