संसदेतून आणखी 49 खासदार निलंबित

एकंदर संख्या 140 हून अधिक, जगदीप धनखड यांची नक्कल केल्याने वादंग, गुन्हेगारी विषयक विधेयके राज्यसभेत संमत  वृत्तसंस्था / नवी दिल्ली विरोधी पक्षांच्या खासदारांनी पुन्हा लोकसभेत प्रचंड गोंधळ आणि गदारोळ केल्यामुळे आणखी 49 विरोधी खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे या अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची एकंदर संख्या 141 झाली आहे. राज्यसभेत नवी गुन्हेगारी कायदा विधेयके […]

संसदेतून आणखी 49 खासदार निलंबित

एकंदर संख्या 140 हून अधिक, जगदीप धनखड यांची नक्कल केल्याने वादंग, गुन्हेगारी विषयक विधेयके राज्यसभेत संमत 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
विरोधी पक्षांच्या खासदारांनी पुन्हा लोकसभेत प्रचंड गोंधळ आणि गदारोळ केल्यामुळे आणखी 49 विरोधी खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे या अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची एकंदर संख्या 141 झाली आहे. राज्यसभेत नवी गुन्हेगारी कायदा विधेयके चर्चेला घेण्यात आली आहेत. निलंबनावर विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप ढंकर यांची नक्कल संसदेबाहेर केल्याने वादंग निर्माण झाले आहे. या प्रकाराचीही चर्चा होत आहे.
गेल्या आठवड्यापासून संसदेत होणारा गदारोळ मंगळवारीही होत राहिला. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनेकदा स्थगित करावे लागले. लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. तसेच पत्रके फडकविण्याचेही प्रकार घडले. काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांना आधी कानपिचक्या दिल्या. पण परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून त्यांनी 49 खासदारांच्या निलंबनाचा आदेश दिला.
सुप्रिया सुळे, कोल्हे निलंबित
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या सर्व खासदारांचे निलंबन लोकसभेचे सध्याचे अधिवेशन संपेपर्यंतच्या कालावधीसाठी आहे. विरोधी खासदारांनी या निलंबनांच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केला आहे. जनतेकडे दाद मागण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
नागरिक सुरक्षा विधेयकांवर चर्चा
राज्यसभेत शांतता निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारने मांडलेले नागरी सुरक्षा कायद्यांचे प्रस्ताव चर्चेला घेण्यात आले. रात्री उशीरापर्यंत चर्चा होत राहिली. राज्यसभेत अनेक विरोधी खासदार निलंबित करण्यात आले आहेत. नंतर ध्वनी मतदानाने हे प्रस्ताव संमत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या विधेयकांचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग राज्यसभेत मोकळा झाला.
धनखड यांची नक्कल
विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेतून बाहेर आल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची विकट नक्कल केली. या प्रकारचे व्हिडिओ चित्रण राहुल गांधी यांनी केले. त्यामुळे मोठाच वाद निर्माण झाला आहे. हा लाजिरवाणा प्रकार असून विरोधकांनी राज्यसभेची प्रतिष्ठा धुळीला मिळविली आहे, अशी टीका ढंकर यांनी केली. भारतीय जनता पक्षानेही विरोधकांवर या प्रकारासंबंधी हल्लाबोल केला. विरोधकांना आपली हार कळून चुकली असून त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांनी साऱ्याच मर्यादा ओलांडल्या असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली.
गोंधळासंबंधी सत्ताधारी कठोर
संसदेत विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून घालण्यात येत असलेल्या गोंधळासंबंधी सत्ताधाऱ्यांकडून कठोर भूमिका घेतली जात आहे. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्षही विरोधी पक्षांच्या वर्तणुकीवर अत्यंत नाराज असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांनी निलंबनाचे अस्त्र बाहेर काढले आहे. गोंधळ करणाऱ्या खासदारांना या अधिवेशनाच्या अखेरपर्यंत निलंबित करण्यात येत आहे.
 

Go to Source