शहरातील 43 मतदान केंद्रे प्रभावी

मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांची माहिती : शहरामध्ये 106 मतदान केंद्रे संवेदनशील  बेळगाव : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेळगाव दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता पालन करण्याच्या दृष्टिने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शहरामध्ये 106 मतदान केंद्रे संवेदनशील असून 43 मतदान केंद्रे प्रभावी आहेत, अशी माहिती साहाय्यक निवडणूक अधिकारी मनपा […]

शहरातील 43 मतदान केंद्रे प्रभावी

मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांची माहिती : शहरामध्ये 106 मतदान केंद्रे संवेदनशील 
बेळगाव : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेळगाव दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता पालन करण्याच्या दृष्टिने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शहरामध्ये 106 मतदान केंद्रे संवेदनशील असून 43 मतदान केंद्रे प्रभावी आहेत, अशी माहिती साहाय्यक निवडणूक अधिकारी मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांनी पत्रकार परिषदेत दिली. आदर्श आचारसंहिता लागू करण्याच्या दृष्टिने शहरामध्ये दोन्ही मतदारसंघात ठिकठिकाणी लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे फलक, नेत्यांचे कटआऊट्स, योजनांच्या जाहिराती, मतदारांवर प्रभाव पाडणारे फलक हटविण्यात आले आहेत. निवडणुकीची घोषणा होताच याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सात ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तर मतदारांना मतदानाच्या दिवसापर्यंत नावनोंदणी करण्याची, याबरोबरच मतदान ओळखपत्रात दुरुस्ती करण्यासाठी सोय असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव उत्तर मतदारसंघात 2,61,823 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 1,28,299, महिला 1,33,507 मतदार आहेत. दक्षिण मतदारसंघात 2,55,024 मतदार असून 1,27,499 पुरुष तर 1,27,509 महिला मतदार आहेत. याचबरोबर दोन्ही मतदारसंघात इतर 33 मतदार आहेत.
युवा मतदारांची संख्या
बेळगाव उत्तरमध्ये युवा मतदार 5677 असून यामध्ये पुरुष 2909 व महिला 2768 आहेत. दक्षिण मतदारसंघात युवा मतदार 5061 असून पुरुष 2657 तर महिला 2403 व इतर 1 मतदार आहे.
नोकर मतदार संख्या
बेळगाव उत्तरमध्ये 301 पुरुष व 23 महिला एकूण 324 मतदार आहेत. बेळगाव दक्षिणमध्ये 531 पुरुष व 41 महिला एकूण 572 मतदार आहेत. निवडणूक आयोगाकडून मतदान ओळखपत्र थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहोचविले जात आहे. पोस्ट खात्याच्या माध्यमातून 13 हजार  ओळखपत्र पाठविले जाणार आहे. तसेच व्होटरअॅपच्या माध्यमातून नोंदणी करण्याबरोबरच दुरुस्तीची सोयही करण्यात आली आहे.
प्रभावी मतदारसंघात जनजागृती…
यापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या आधारावरून प्रभावी मतदारसंघ ठरविण्यात आले आहेत. 90 टक्के मतदान झालेल्या बुथमध्ये 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान एकाच उमेदवाराला झालेले पाहून त्यांची गणना प्रभावी मतदारसंघात करण्यात आली आहे. पैशाचे आमिष दाखवून अथवा आपला प्रभाव दाखवून मतदान होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अशा मतदारसंघांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. मतदान तुमचा हक्क असून निर्भयपणे मतदान करा, कोणत्याही आमिषाला बळी पडून मतविक्री करू नका, असे आवाहन केले जात आहे, असे आयुक्तांनी सांगितले.