सायबर फसवणुकीतील 43 आरोपींना अटक

एफबीआय, इंटरपोलच्या मदतीने सीबीआयची जम्बो कारवाई वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एफबीआय आणि इंटरपोलच्या माहितीनुसार पावले उचलत सीबीआयने सायबर फसवणुकीच्या प्रकरणातील 43 जणांना अटक केली आहे. दिल्ली, गुऊग्राम आणि नोएडा येथे सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. यादरम्यान, गुऊग्रामच्या डीएलएफ सायबर सिटीतील कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेसह इतर देशांतील नागरिकांची सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या कारवाईनंतर संबंधितांना न्यायालयात […]

सायबर फसवणुकीतील 43 आरोपींना अटक

एफबीआय, इंटरपोलच्या मदतीने सीबीआयची जम्बो कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एफबीआय आणि इंटरपोलच्या माहितीनुसार पावले उचलत सीबीआयने सायबर फसवणुकीच्या प्रकरणातील 43 जणांना अटक केली आहे. दिल्ली, गुऊग्राम आणि नोएडा येथे सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. यादरम्यान, गुऊग्रामच्या डीएलएफ सायबर सिटीतील कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेसह इतर देशांतील नागरिकांची सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या कारवाईनंतर संबंधितांना न्यायालयात हजर केले असता तिघांना सीबीआय कोठडी तर उर्वरित 40 जणांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
‘ऑपरेशन चक्र-3’ अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत अनेक सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. 2022 पासून येथे कॉल सेंटर कार्यरत होते. त्यांचे नेटवर्क अनेक देशांमध्ये पसरले होते. एफबीआय आणि इंटरपोलने या प्रकरणात अचूक माहिती दिल्यानंतर सीबीआयच्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन विभागाने संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून ही कारवाई केली. सायबर फसवणुकीचे हे नेटवर्क अनेक केंद्रांवर कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे. गुऊग्राममध्ये त्याचे नियंत्रण केंद्र होते.
छाप्यादरम्यान थेट सायबर गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेले आरोपी पकडले गेले. घटनास्थळावरून पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. तपास पथकाने 130 संगणक हार्डडिस्क, 65 मोबाईल फोन, पाच लॅपटॉप आणि गुन्हा सिद्ध करणारी इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक पुरावेही सापडले आहेत. याशिवाय फसवणुकीसाठी पैशांची देवाणघेवाण, कॉल रेकॉर्डिंग, पीडितांची यादी आणि लोकांना टार्गेट करण्यासाठी केलेल्या ट्रान्सक्रिप्टसह इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी आपली ओळख लपवून अमेरिकन आणि इतर देशांतील नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळत असल्याचे सीबीआयने सांगितले.