मनपाकडून 20 महिन्यांत 3795 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया

  रुक्मिणीनगर येथील केंद्रामध्ये आठवड्यातून दोन दिवस 10 ते 12 कुत्र्यांची नसबंदी बेळगाव : शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेकवेळा भटकी कुत्री लहान मुलांसह इतरांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. महानगरपालिकेनेही कुत्री पकडून त्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जुलै 2022 पासून […]

मनपाकडून 20 महिन्यांत 3795 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया

  रुक्मिणीनगर येथील केंद्रामध्ये आठवड्यातून दोन दिवस 10 ते 12 कुत्र्यांची नसबंदी
बेळगाव : शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेकवेळा भटकी कुत्री लहान मुलांसह इतरांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. महानगरपालिकेनेही कुत्री पकडून त्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जुलै 2022 पासून फेब्रुवारी 2024 पर्यंत 3 हजार 795 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विविध ठिकाणी कुत्र्यांचे कळप थांबलेले असतात. एखादी व्यक्ती तेथून जाताना ही कुत्री हल्ला करत आहेत. तर पिसाळलेली कुत्रीही अनेकांवर हल्ला करून जखमी करत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. महानगरपालिकेच्यावतीने कुत्री पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात आहे. रुक्मिणीनगर येथील केंद्रामध्ये आठवड्यातून दोन दिवस 10 ते 12 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरामध्ये सोडण्यात येत आहे.
गोकाक येथील एका ठेकेदाराने कुत्री पकडण्याचा ठेका घेतला आहे. सदर ठेकेदार नेपाळ येथून कामगार आणून त्यांच्याकडून कुत्री पकडण्याचे काम करून घेत आहे. कुत्री पकडल्यानंतर रुक्मिणीनगर येथील केंद्रामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. गेल्या 20 महिन्यांमध्ये 1380 नर आणि 2415 मादींवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दररोज कुत्री पकडण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र कुत्री हुलकावणी देतात. कुत्र्यांना पकडणाऱ्या व्यक्ती दिसताच तेथून पळ काढत आहेत. त्यामुळे कसरत करावी लागत असल्याचे सांगण्यात आहे. महानगरपालिकेतील राजू संकन्नावर यांना फोन येताच संबंधित कर्मचाऱ्यांना त्या भागामध्ये जावून कुत्री पकडण्याची सूचना करतात. त्यानंतर सर्व तयारी आणि वाहनांसह कुत्री पकडण्याचे पथक दाखल होते. मात्र पथक दाखल होताच त्याचा कुत्र्यांना सुगावा लागतो आणि कुत्री तेथून इतर ठिकाणी पलायन करत आहेत. त्यामुळे बऱ्याचवेळा या पथकाला रिकाम्या हाती परतावे लागत आहे. परिसरातील जनता सहकार्य करते. त्यामुळे काहीवेळा पाच तर कधी दहा कुत्री पकडली जातात. त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. मात्र कुत्र्यांची संख्या अधिक असल्यामुळे सर्वांवर शस्त्रक्रिया करणे अवघड आहे, असे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले.
गेल्या 20 महिन्यांत पकडण्यात आलेल्या कुत्र्यांची संख्या

महिना    कुत्र्यांची संख्या    
जुलै-2022  187
ऑगस्ट   243
सप्टेंबर    265
ऑक्टोबर  184
नोव्हेंबर  163
डिसेंबर  210
जानेवारी 2023    168
फेब्रुवारी 169
मार्च        164
एप्रिल     193
मे            104
जून         150
जुलै         136
ऑगस्ट   194
सप्टेंबर    181
ऑक्टोबर 188
नोव्हेंबर  171
डिसेंबर  238
जानेवारी-2024   233
फेब्रुवारी 252
एकूण     3795