300 गावे पाणी संकटाच्या झोनमध्ये
जिल्हा प्रशासनाकडून संकट निवारणासाठी तयारी : टँकर खरेदीबाबत प्रश्नचिन्ह
बेळगाव : पावसाअभावी जिल्ह्यामध्ये यंदा पाणी संकट उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायतकडून पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांचा सर्व्हे करण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये भविष्यात 300 गावांमध्ये पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर गावांचा समावेश पाणी संकट झोनमध्ये करण्यात आला आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतांश गावांमधील पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडे पडले आहेत. कूपनलिका व विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे मार्चपासूनच अनेक गावांत पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. विहिरींच्या पाणीपातळीत झालेली घट पुढील संकटाचे सूचक असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे एप्रिल-मे दरम्यान पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यामध्ये राबविण्यात आलेल्या बहुग्राम पाणीपुरवठा योजना नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. नदी पात्र कोरडे पडत आहे. त्यामुळे बहुग्राम पाणीपुरवठा योजनेंतर्गत होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. बेळगाव तालुक्यासह रामदुर्ग, सौंदत्ती, अथणी आदी तालुक्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठीच जिल्हा प्रशासनाकडून खासगी कूपनलिका व विहिरींच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागले आहे. त्यामुळे अशा विहिरी व कूपनलिका भाडे तत्त्वावर घेण्याची सूचना तालुका पंचायतींना करण्यात आली आहे. तर तालुका पंचायतीकडून ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांना व ग्रा. पं. सदस्यांना विहीर व कूपनलिका मालकांशी संवाद साधून पाणी भाडे तत्त्वावर घेण्यासाठी बोलणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. याबरोबरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर खरेदीची सूचना करण्यात आली आहे. मात्र, ग्रा. पं. कडे अनुदान उपलब्ध नसल्याने टँकर खरेदीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पाहणीनुसार 300 गावांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने भविष्यातील नियोजनासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. खासगी कूपनलिका व विहिरींच्या पाण्यावरच पाणी संकट निवारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना कितपत यश येणार हे येणारा काळच ठरवेल.
12 गावांना टँकरने पाणीपुरवठा
सध्याच्या घडीला जिल्ह्यात 12 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून भविष्यात 300 गावे पाणी संकटाच्या झोनमध्ये असून पाणीसमस्या निवारण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
– राहुल शिंदे, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी
ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना राबवा : ता. पं. कार्यकारी अधिकारी रामररेड्डी पाटील यांची सूचना
दुष्काळामुळे तालुक्याच्या गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे. यासाठी ग्रा. पं. विकास अधिकाऱ्यांनी उपाययोजना राबवाव्यात व अहवाल सादर करावा, अशी सूचना तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रामरेड्डी पाटील यांनी केली. तालुका पंचायतीच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीसमस्या निर्माण होऊ शकते. यासाठी ग्राम पंचायतीने पूर्वखबरदारी घेणे आवश्यक आहे. पाण्यासंदर्भात माहिती घेऊन अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी ग्रा. पं. विकास अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी व आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे त्यांनी सांगितले. काही गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेली कामे त्वरित पूर्ण करावीत. प्रलंबित कामे पूर्ण करून पाणीपुरवठा करण्याची सोय करावी. पाणीसमस्या निर्माण झालेल्या गावांमध्ये खासगी कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार सिदराय भोसगी, कार्यकारी अभियंता एस. के. पाटील, व्यवस्थापक राजेंद्र मोरबद, तालुका अधिकारी श्रीधर सरदार, रमेश मादर यासह ग्रा. पं. विकास अधिकारी उपस्थित होते.