3 अपक्ष आमदारांकडून भाजपला पुन्हा समर्थन

हरियाणातील राजकारणाला नवे वळण : दोन पत्रांवर तारीख नमूद नसल्याने पेच वृत्तसंस्था /चंदीगड हरियाणात तीन अपक्ष आमदारोन नव्याने भाजप सरकारला पाठिंबा दर्शविणारे पत्र राज्यपाल बंडारु दत्तात्रेय आणि विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांना पाठविले आहे. पुंडरीचे आमदार रणधीर सिंह गोलन, चरखी दादरीचे आमदार सोमवीर सिंह सांगवना आणि नीलोखेडीचे आमदार धर्मपाल गोंदर यांनी स्वत:च्या ईमेल आयडीवरून ही […]

3 अपक्ष आमदारांकडून भाजपला पुन्हा समर्थन

हरियाणातील राजकारणाला नवे वळण : दोन पत्रांवर तारीख नमूद नसल्याने पेच
वृत्तसंस्था /चंदीगड
हरियाणात तीन अपक्ष आमदारोन नव्याने भाजप सरकारला पाठिंबा दर्शविणारे पत्र राज्यपाल बंडारु दत्तात्रेय आणि विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांना पाठविले आहे. पुंडरीचे आमदार रणधीर सिंह गोलन, चरखी दादरीचे आमदार सोमवीर सिंह सांगवना आणि नीलोखेडीचे आमदार धर्मपाल गोंदर यांनी स्वत:च्या ईमेल आयडीवरून ही पत्रं पाठविली आहेत. परंतु दोन आमदारांच्या पत्रावर तारीख नमूद नसल्याने आता आणखी एक पेच निर्माण होऊ शकतो. यापूर्वी 7 मे रोजी तिन्ही आमदारांनी रोहतक येथे पत्रकार परिषद घेत भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी काँग्रेसला समर्थन देणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे राज्यातील नायब सैनी सरकार अल्पमतात आले होते. राज्यात भाजप सरकार बहुमतात नसल्याने बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी आणि  राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेसने पत्राद्वारे राज्यपालांकडे केली होती. जजप आणि इनेलो या प्रादेशिक पक्षांनीही काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. तिन्ही अपक्ष आमदारांनी भाजप सरकारला पुन्हा समर्थन देत असल्याचे पत्र अन्य ईमेल आयडीद्वारे पाठविल्याने राजभवनाकडून ते फेटाळण्यात आले होते. याचमुळे बुधवारी तिन्ही आमदारांनी स्वत.च्या अधिकृत ईमेल आयडीवरून राजभवन आणि विधानसभा सचिवालयाला भाजप सरकारला समर्थन देत असल्याचे पत्र पाठविले आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेला दावा तसेच अपक्ष आमदारांनी पुन्हा सरकारला पाठिंबा दर्शविल्याने आता राज्यपाल कुठला निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. काँग्रेसच्या आमदारांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितला असल्याचे समजते.