गुजरात : मुसळधार पावसामुळं आलेल्या पुरात 26 जणांचा मृत्यू, हजारो नागरिक विस्थापित

गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना सततच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका बसला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये आलेल्या पुरामुळे तीन दिवसात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गुजरात : मुसळधार पावसामुळं आलेल्या पुरात 26 जणांचा मृत्यू, हजारो नागरिक विस्थापित

rain gujarat

गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना सततच्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका बसला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये आलेल्या पुरामुळे तीन दिवसात 26 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

हवामान विभागाने कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका आणि पोरबंदरमध्ये 30 ऑगस्ट रोजीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मोरबी, जुनागड आणि राजकोटमध्ये मुसळधार पावसाच्या अंदाजासह यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

 

वडोदरा, मोरबी आणि पोरबंदर या तीन जिल्ह्यातील हजारो लोक, पुरामुळे विस्थापित झाले आहेत.

 

गुरुवारी (29ऑगस्ट) गुजरामधल्या अनेक भागांमध्ये बचावकार्य सुरू होतं, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत होतं. गुजरातच्या माहिती विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1,785 नागरिकांना वाचवण्यात यश आलं असून, 13 हजार 183 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी जामनगर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनीही वडोदरा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला.

 

गेल्या दोन दिवसात, फक्त वडोदरा जिल्ह्यातून, पुरात अडकलेल्या 1,271 लोकांना वाचवण्यात बचाव कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. तर, 10 हजार 335 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. यापैकी, 9 हजार 704 लोकांना वेगवेगळ्या निवारा छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसेच 333 लोक स्वतःच्या घरी परतले आहेत.

 

एनडीआरएफच्या 17 तुकड्या आणि एसडीआरएफच्या 25 तुकड्या तसंच लष्कराच्या 9 तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

 

तटरक्षक दलाच्या जवानांनी देवभूमी द्वारका येथील कल्याणपूर तालुक्यात असणाऱ्या धूमथर गावातून पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार जणांची सुटका केली. एनडीआरएफच्या जवानांनी देवीला गावातील सात जणांना पुरातून वाचवलं आहे.

 

वडोदरा शहरातील पुराचं पाणी ओसरलं, पण…

वडोदरा शहरात सुमारे तीन दिवस पुराचं पाणी साचलं होतं. गुरुवारी हे पाणी ओसरायला सुरुवात झाली.

 

पाणी कमी झाल्यानंतर, संपूर्ण शहरात लोक त्यांची घरं आणि कार्यालयांमध्ये स्वच्छता करत होते. गुजरात सरकार आणि वडोदरा महानगरपालिकेने आतापर्यंत या पुरात एकही मृत्यू झाल्याची पुष्टी केलेली नाही.

 

वडोदरा शहरातील सखल भागांमध्ये अजूनही पाणी साचलं असून, अनेक लोकांना त्यांच्या घरी परत जात आलेलं नाही.

 

वडोदरा शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीचं पाणी ओसरल्यामुळे लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

 

रविवारी (25 ऑगस्ट) झालेल्या मुसळधार पावसानंतर विश्वामित्री नदीचं पाणी 37 फुटांवरून वाहत होतं.

 

बीबीसीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर छारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शहरात राहणाऱ्या लोकांना अजूनही बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरात स्वच्छ पाणी आणि जेवण मिळण्यात अडचणी येत आहेत. पाण्याच्या बाटल्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. शहरातील परिस्थिती बिघडल्यामुळे खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या असून, दुधासारख्या गोष्टी महाग होऊन बसल्या आहेत. दैनंदिन आयुष्यातील गरजा भागवण्यासाठी, लोक स्वतःच धडपड करत आहेत.”

 

वडोदरा शहरात पाणी साचल्यामुळे अनेक पूल बंद होते. पण, परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

 

सौराष्ट्रात काय परिस्थिती?

मध्य गुजरातमध्ये पाऊस थांबला असला तरी सौराष्ट्र आणि कच्छमध्ये अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. या भागातील, देवभूमी द्वारका, जामनगर, जुनागढ, पोरबंदर, अमरेली आणि सुरेंद्रनगर या जिल्ह्यातील नागरिकांना पावसाचा फटका बसला आहे.

 

या पावसामुळे सौराष्ट्रमधील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. हजारो एकरवर पुराचं पाणी साचल्यामुळे या भागातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कापूस, भुईमूग, ज्वारी, गवार, तूर यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

 

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी सकाळी एक्सवर पोस्ट करून सांगितलं की,”देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसेच, पंतप्रधान मोदी ही वडोदऱ्याला भेट देणार आहेत.”

 

गुजरातचे कृषिमंत्री राघवजी पटेल यांनी नुकसान झालेल्या शेतीचं सर्वेक्षण करून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं सांगितलं आहे.

 

Published By- Dhanashri Naik 

Go to Source