रेशनकार्डसाठी 25 हजार अर्ज प्रलंबित

वितरण बंदच : योजनेपासून वंचित लाभार्थ्यांचे लक्ष सुरू करण्याकडे, सरकारकडून अद्यापही हालचाली नाहीत बेळगाव : रेशनकार्ड दुरुस्ती आणि शिधापत्रिका वितरणाचे काम मागील काही वर्षांपासून बंद झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबीयांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे रेशनकार्डच्या कामाला कधी सुरुवात होणार, याकडेच गोरगरीबांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात 10.70 लाख बीपीएल कार्डे, 3.24 लाख एपीएल तर […]

रेशनकार्डसाठी 25 हजार अर्ज प्रलंबित

वितरण बंदच : योजनेपासून वंचित लाभार्थ्यांचे लक्ष सुरू करण्याकडे, सरकारकडून अद्यापही हालचाली नाहीत
बेळगाव : रेशनकार्ड दुरुस्ती आणि शिधापत्रिका वितरणाचे काम मागील काही वर्षांपासून बंद झाले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबीयांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे रेशनकार्डच्या कामाला कधी सुरुवात होणार, याकडेच गोरगरीबांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात 10.70 लाख बीपीएल कार्डे, 3.24 लाख एपीएल तर 68 हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. विशेषत: शिधापत्रिका दुरुस्तीसाठी दररोज शेकडो अर्ज दाखल होऊ लागले आहेत. जिल्ह्यात नवीन रेशनकार्ड आणि शिधापत्रिका दुरुस्तीसाठी 25 हजारहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. हे सारे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना विविध योजनांपासून दूर रहावे लागत आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे स्वतंत्र रेशनकार्डची मागणी वाढली आहे. विशेषत: काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांचा लाभ घेण्यासाठी मागील वर्षभरात रेशनकार्डची मागणी दुपटीने वाढली आहे. मात्र, रेशनकार्डचे कामच स्थगित असल्याने लाभार्थ्यांना केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्याबरोबर रेशनकार्डमधील दुरुस्तीची कामेही वाढली आहेत. नाव, पत्ता आणि इतर कामांच्या दुरुस्तीसाठी अर्ज दाखल होऊ लागले आहेत.
बागायत-कृषी खात्याच्या योजनांपासून वंचित
शेतकरी कुटुंबीयांकडे रेशनकार्ड नसल्याने बागायत आणि कृषी खात्याच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास रेशनकार्ड बंधनकारक आहे. मात्र, काही शेतकऱ्यांकडे रेशनकार्डच नसल्याने सुविधा मिळणे अशक्य झाले आहे. सध्या खरीप हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके दिली जातात. मात्र, रेशनकार्ड नसल्याने या सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे. रेशनकार्डविना शैक्षणिक प्रवेश, आरोग्याच्या सुविधा आणि इतर सोयी-सवलतींपासून लाभार्थ्यांना दूर रहावे लागत आहे. निवडणूक संपल्यानंतर रेशनकार्डच्या कामाला सुरळीत प्रारंभ होईल, अशी आशा होती. मात्र, अद्याप शासनाकडून कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे लाभार्थ्यांची निराशा झाली आहे. शिवाय नवीन रेशनकार्ड कधी सुरू होणार, या तारखेकडे लक्ष लागले आहे. मागील जुलै महिन्यात वैद्यकीय उपचारासाठी तात्पुरती रेशनकार्ड दुरुस्ती आणि नवीन रेशनकार्ड सुरू करण्यात आले होते. यासाठी केवळ दोन-चार दिवसांचीच मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यातही सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याने रेशनकार्डची कामे प्रलंबित पडली आहेत.
शिधापत्रिकांची दुरुस्ती थांबविली
नवीन शिधापत्रिका आणि शिधापत्रिकांची दुरुस्ती थांबविण्यात आली आहे. शिवाय वैद्यकीय उपचारासाठी देखील दुरुस्तीची परवानगी देण्यात आली नाही. सध्या विभागाकडे दुरुस्ती आणि नवीन रेशनकार्डसाठी 25 हजार अर्ज प्रलंबित आहेत.
– श्रीशैल कंकणवाडी (सहसंचालक अन्न व नागरीपुरवठा खाते)