सत्तरीत 101 सरकारी शाळांसाठी 24 इंग्रजी शिक्षक

आठवड्यातून फक्त दोनच दिवस शिक्षकांची व्यवस्था, खोतोडा पंचायत क्षेत्रातील शाळा इंग्रजी शिक्षकाविना वाळपई : सत्तरी तालुक्यात 101 सरकारी प्राथमिक शाळा आहेत मात्र एवढ्या शाळांसाठी फक्त 24 इंग्रजी शिक्षक आहेत. खोतोडा येथील शाळेसाठी इंग्रजी शिक्षकच नाही तर गुळेली पंचायत क्षेत्रातील सरकारी शाळांसाठी फक्त एकच इंग्रजी शिक्षक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तरी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक अशा सध्या 101 सरकारी प्राथमिक शाळा आहेत. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब […]

सत्तरीत 101 सरकारी शाळांसाठी 24 इंग्रजी शिक्षक

आठवड्यातून फक्त दोनच दिवस शिक्षकांची व्यवस्था, खोतोडा पंचायत क्षेत्रातील शाळा इंग्रजी शिक्षकाविना
वाळपई : सत्तरी तालुक्यात 101 सरकारी प्राथमिक शाळा आहेत मात्र एवढ्या शाळांसाठी फक्त 24 इंग्रजी शिक्षक आहेत. खोतोडा येथील शाळेसाठी इंग्रजी शिक्षकच नाही तर गुळेली पंचायत क्षेत्रातील सरकारी शाळांसाठी फक्त एकच इंग्रजी शिक्षक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तरी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक अशा सध्या 101 सरकारी प्राथमिक शाळा आहेत. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी प्रत्येक गावामध्ये सरकारी प्राथमिक शाळा सुरू केल्या. या सर्व शाळा मराठी भाषेमध्ये आहेत. कालांतराने इंग्रजीचे वाढते स्तोम पाहून पालकांनी प्रत्येक शाळेमध्ये इंग्रजी शिक्षकाची व्यवस्था करण्याची मागणी केली होती.
सत्तरी तालुक्यामध्ये 24 शिक्षकांची नियुक्ती 
सत्तरी तालुक्यात 101 शाळांसाठी केवळ 24 शिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत. आठवड्याचे दोन दिवस इंग्रजीचा शिक्षक हजर राहून इंग्रजी शिकवितो. यातून मुलांना इंग्रजीचे ज्ञान मिळणे मुश्किल आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा दावा पालकांनी केला आहे. ही मुले खासगी शाळांमधील मुलांच्या तुलनेत मागे पडतात. यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करून पूर्णवेळ इंग्रजी शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.
खोतोडा पंचायत क्षेत्रात एकही शिक्षक नाही 
खोतोडा पंचायत क्षेत्रात असलेल्या एकाही सरकारी शाळेत इंग्रजी शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या शाळातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असून सरकारने अजूनपर्यंत याची दखल घेतलेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
गुळेली पंचायत क्षेत्रासाठी एकच शिक्षक 
सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदारसंघातील गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी प्राथमिक शाळेसाठी सध्या फक्त एकच इंग्रजी शिक्षक उपलब्ध आहे. सदर शिक्षक आठवड्यातून दोन दिवस अध्यापनाचे काम करीत असून केवळ तीन शाळांमध्ये हा शिक्षक इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहे. त्यामुळे या पंचायत क्षेत्रातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.
स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात इंग्रजी शिक्षकांची नियुक्ती
स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना पालकांकडून इंग्रजी शिक्षकांची नियुक्त करण्याच्या मागणीला जोर आला होता. गोवा मुक्तीनंतर स्थानिक पातळीवर शिक्षक मिळत नव्हते. महाराष्ट्रातून शिक्षकांची नियुक्ती करावी लागली. ते शिक्षक मराठीतून शिकलेले होते. इंग्रजी शिकविण्यासाठी सरकारी शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे मनोहर पर्रीकर यांनी अनेक शाळांमध्ये इंग्रजी शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या.