सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी 220 कोटी मंजूर

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती बेळगाव : सौंदत्ती येथील रेणुका मंदिर परिसराच्या विकासासाठी सरकारकडून 220 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून या परिसराचा संपूर्ण विकास केला जाईल, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या परिसरात मोठे नुकसान झाल्याची माहिती पत्रकारांनी सांगितली. तसेच यावर तुम्ही काय करणार? असे विचारले असता, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी […]

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी 220 कोटी मंजूर

सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेळगाव : सौंदत्ती येथील रेणुका मंदिर परिसराच्या विकासासाठी सरकारकडून 220 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून या परिसराचा संपूर्ण विकास केला जाईल, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे या परिसरात मोठे नुकसान झाल्याची माहिती पत्रकारांनी सांगितली. तसेच यावर तुम्ही काय करणार? असे विचारले असता, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वरील माहिती दिली. महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी सतीश जारकीहोळी हे आले होते. त्यावेळी सौंदत्ती येथील मंदिर परिसरात विविध विकासकामे राबविली जाणार आहेत. सरकारने या मंदिराचा संपूर्ण विकास करण्याची जबाबदारी घेतली असून निश्चितच काही वर्षात येथील मंदिर परिसराचा कायापालट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सौंदत्ती येथील श्ऱी यल्लम्मादेवीच्या मंदिराला बेळगावसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यामुळे तेथील मंदिर प्रशासनावर ताण पडत आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात ढगफुटी झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. व्यावसायिक तसेच इतरांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. याची माहिती सरकारला दिली आहे. मात्र यापूर्वीच 220 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने लवकरच त्या कामांना सुरुवात होईल, असेदेखील मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. विशेषकरून पाणी, शौचालय, पार्किंग सोय आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी वसतिगृह निर्माण करण्यात येणार आहे. एकूणच आराखडा तयार करून त्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठीच हा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार विश्वास वैद्य, आमदार राजू सेठ हे उपस्थित होते.