बस दरीत कोसळून जम्मूमध्ये 21 ठार

47 जखमी : उत्तर प्रदेशातील भाविकांना शिवखोरीला नेताना दुर्घटना वृत्तसंस्था /जम्मू जम्मू काश्मीरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेत 21 भाविकांना प्राण गमवावे लागले. तसेच अन्य 47 जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ विविध इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली […]

बस दरीत कोसळून जम्मूमध्ये 21 ठार

47 जखमी : उत्तर प्रदेशातील भाविकांना शिवखोरीला नेताना दुर्घटना
वृत्तसंस्था /जम्मू
जम्मू काश्मीरमध्ये प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेत 21 भाविकांना प्राण गमवावे लागले. तसेच अन्य 47 जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ विविध इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, उत्तर प्रदेश नोंदणीची ही बस जम्मूहून शिवखोरीला जात होती. यावेळी अखनूर येथील तुंगी मोर येथे बस दरीत कोसळली. बसमध्ये 60 हून अधिक प्रवासी असल्यामुळे अतिभारामुळे हा अपघात झाल्याचा दावा केला जात आहे.
जम्मूमधील या भीषण अपघातात 21 प्रवाशांच्या मृत्यूची पुष्टी प्रशासकीय सूत्रांकडून करण्यात आली आहे. हे सर्व हातरस (उत्तर प्रदेश) येथील भक्तगण होते. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथकाचे सदस्य घटनास्थळी पोहोचले. 25 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वांना जवळच्या ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस खोल दरीत पडल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचत तातडीने बचावकार्य सुरू केले. तसेच पोलीस आणि स्थानिक लोकांकडून मदतकार्याला हातभार लावण्यात आला. जखमींना तातडीने अखनूर उपजिल्हा ऊग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून गंभीर जखमी प्रवाशांना जम्मू वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले.