विशाल पाटील यांच्यासह 20 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले

पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही, उमेदवारांना अर्ज दाखलसाठी केवळ पाच दिवस मिळणार सांगली प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 20 जणांनी 46 उमेदवारी अर्ज घेतले. पण पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. 19 एप्रिल उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे तीन दिवसांच्या सुट्ट्या वगळता अवघे पाच दिवस […]

विशाल पाटील यांच्यासह 20 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले

पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही, उमेदवारांना अर्ज दाखलसाठी केवळ पाच दिवस मिळणार

सांगली प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह 20 जणांनी 46 उमेदवारी अर्ज घेतले. पण पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. 19 एप्रिल उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे तीन दिवसांच्या सुट्ट्या वगळता अवघे पाच दिवस उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून शंभर मीटरच्या अंतरात उमेदवारांची केवळ तीन वाहने सोडण्यात येणार आहेत. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी केवळ पाच जणांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. दररोज दुपारी तीन वाजल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयच्या प्रवेशव्दारावरील नोटीस बोर्डवर अर्ज दाखल केलेल्यांची नावे प्रसिध्द करण्यात येणार आहेत. उमेदवारीसाठी अनामत रक्कम 25 हजार आहे. पण राखीव प्रवर्गातील उमेदवाराला साडेबारा हजार आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
उमेदवारांना आपल्यावरील गुन्ह्यांचे स्पष्टीकरण तीन दिवस वर्तमानपत्रांत तर तीन दिवस इलेक्ट्रॉनिक मिडीयात प्रसिध्द करावे लागणार आहे. याशिवाय मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
2300 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई : घुगे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2300 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. एक गुन्हा दाखल असलेल्या 1724 जणांवर, दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या 295 जणांवर, शिक्षा झालेले 44 आदींचा या कारवायामध्ये समावेश आहे.
याशिवाय तडीपारीचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले असल्याचे अधीक्षक घुगे यांनी सांगितले. याशिवाय 16 आंतरजिल्हा आणि नऊ आंतरराज्य असे 25 तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन हजार लीटरहून अधिक दारू, 28 किलो गांजा, 3853 किलो गुटखा आणि अवैध हत्यारे पकडण्यात आली आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेने संपूर्ण तयारी केली असल्याचेही संदीप घुगे यांनी सांगितले.
उमेदवारांनी सुचवलेल्या तीन चिन्हापैकी एक मिळणार
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना देण्यात येणाऱ्या संभाव्य चिन्हांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीसा बोर्डवर लावण्यात आली आहे. यातील तीन चिन्हे उमेदवारांनी सुचवायची आहेत. उमेदवारांनी सुचवलेल्या तीन चिन्हापैकी एक चिन्ह प्रशासनामार्फत देण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.