मंत्र्यासह तिघांना दिले 17.68 कोटी दिले

प्रमुख संशयित पूजा नाईकचा खळबळजनक दावा : पूजा खोटारडी : सुदिन ढवळीकर,मगो कार्यालयात ती कधीच नव्हती : दीपक पणजी : राज्यात वणव्याप्रमाणे भडकलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याला काल शुक्रवारी कलाटणी मिळाली. या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार पूजा नाईक हिने स्वत: पत्रकारांसमोर येऊन नोकरीच्या उमेदवारांकडून गोळा केलेले 17 कोटी रुपये आपण स्वत: मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह आयएएस अधिकारी निखील देसाई आणि साबांखाचे […]

मंत्र्यासह तिघांना दिले 17.68 कोटी दिले

प्रमुख संशयित पूजा नाईकचा खळबळजनक दावा : पूजा खोटारडी : सुदिन ढवळीकर,मगो कार्यालयात ती कधीच नव्हती : दीपक
पणजी : राज्यात वणव्याप्रमाणे भडकलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याला काल शुक्रवारी कलाटणी मिळाली. या घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार पूजा नाईक हिने स्वत: पत्रकारांसमोर येऊन नोकरीच्या उमेदवारांकडून गोळा केलेले 17 कोटी रुपये आपण स्वत: मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह आयएएस अधिकारी निखील देसाई आणि साबांखाचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांना रोखीने दिले होते, असा खळबळजनक दावा केला आहे. दुसऱ्या बाजूने हे आरोप धादांत खोटे असून या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पूजा नाईक कधीच मगो कार्यालयात काम करत नव्हती, असे स्पष्ट केले आहे. आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांच्याकडून पूर्ण सुरक्षा देण्याच्या हमीवर पालेकर यांच्यासोबतच पूजा नाईक पत्रकारांसमोर आली. पणजीत श्रीमहालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या पक्षकार्यालयाच्या परिसरात तिने पत्रकारांना ‘आपबिती’ कथन केली. त्यावरून हे एकूण प्रकरण म्हणजे ‘मेगा नोकरभरतीतील महाघोटाळा’ असल्याचे समोर आले आहे.
पूजा नाईकने स्वत:च सांगितली ‘मोडस ऑपरेंडी’

पूजानाईकम्हणाली की, वर्ष 2012 मध्ये आपण मगो कार्यालयात काम करत होते. 2019 मध्ये सरकारी कार्यालयांमध्ये मेगा भरती सुरू झाली होती. त्यावेळी मंत्री ढवळीकर यांनी आपणास ‘ती’ वाट दाखवली. इच्छुक उमेदवारांच्या मागावर राहून त्यांना पैशांच्या बदल्यात नोकरी मिळवून देण्याची हमी देण्यास सांगितले.
अशाप्रकारेविनासायासमोठ्या मिळकतीचा मार्ग सापडल्यानंतर आपण जोमाने कार्यरत झाले. त्या दरम्यान अनेक इच्छुकांशी सौदेबाजी झाली. ठरल्यानुसार पैसेही हाती पडू लागले.
कामाचीव्याप्तीवाढू लागली तेव्हा ‘चेन मार्केटिंग’च्या धर्तीवर आणखीही काही जणांना आपल्या मदतीसाठी घेतले. त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन उमेदवारांच्या संपर्कात आले.
यासौदेबाजीतूनप्रारंभीच्या काळात 80 जणांना नोकऱ्या देण्यात आल्या. मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांची नियत फिरली आणि आपणाकडून पैसे घेतल्यानंतरही ते नोकऱ्या देईनासे झाले. त्यातून उमेदवारांनी आपल्यामागे नोकरी तसेच पैशांसाठी तगादा लावला.
त्यामुळेआपणवारंवार दोन्ही अधिकाऱ्यांना भेटू लागले. परंतु आपल्या उमेदवारांना नोकऱ्या तर मिळाल्या नाहीत किंवा त्यांचे पैसेही परत मिळाले नाहीत. शेवटी काही उमेदवारांनी पोलिस तक्रारी दाखल केल्यामुळे भांडाफोड झाला, असे पूजाने सांगितले.
याप्रकरणाचेकाही पुरावे आहेत का? असे विचारले असता आपल्या ज्या मोबाईलमध्ये ऑडिओ-व्हीडिओ पुरावे होते तो डिचोली पोलिसांनी जप्त केला आहे, त्यामुळे सध्यातरी काहीच पुरावे नाहीत, असे पूजा म्हणाली.

613 अर्जदारांकडून 17.68 कोटी गोळा करुन दिले देसाई, पार्सेकरकडे
अशा या महाघोटाळ्याची व्याप्ती नक्की किती असेल याबद्दल आपण स्वत:ही खात्रीशिररित्या काहीच सांगू शकत नाही, मात्र आपणाकडे 613 अर्ज आले होते. त्यांच्याकडून गोळा केलेले 17.68 कोटी रुपये वेळोवेळी नेऊन निखिल देसाई आणि उत्तम पार्सेकर यांच्या हाती देत होते. हा सर्व व्यवहार एका फ्लॅटमध्ये होत होता आणि केवळ रोखीनेच पैसे देण्यात येत होते. त्यातील शेवटचा व्यवहार हा 2022 मध्ये झाला होता, अशी माहिती पूजाने दिली.
पूजा नाईक धादांत खोटारडी : सुदिन
पूजा नाईक ही धादांत खोटारडी असून तिच्याशी आपला कोणताही संबंध नाही, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी अधिक बोलणे टाळताना त्यांनी, सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून त्यानंतर आम्ही यावर भाष्य करू असे ते म्हणाले. आपण राजकीय जीवनामध्ये अनेक वर्षांपासून असून आपणास आणि आपल्या कुटुंबाला गोव्यातील जनता ओळखते. मी काय आहे, हे गोमंतकीयांना माहीत आहे. माझे नाव कोणीच बदनाम करु शकणार नाही. कोणीही माझे नाव घेऊन काहीही आरोप करत असेल, तर त्याला अर्थ नाही. त्यामुळे असे आरोप झाले तरी पोलिसांच्या तपासानंतरच यावर भाष्य केले जाईल, असे ढवळीकर म्हणाले. आपल्या कार्यालयात सर्व आर्थिक व्यवहार हे बँकेमार्फत होतात आणि पोलिस ते तपासू शकतात. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून आपण राजकीय जीवनात असून राज्यभरातील लोक आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना ओळखतात, त्यामुळे सदर आरोप कितपत खरे आहेत हे आपले हितचिंतक आणि जनताच ठरवेल, असेही मंत्री ढवळीकर म्हणाले.
पूजा मगो कार्यालयात नव्हतीच : दीपक
पूजा नाईक नावाची महिला मगो पक्षाच्या कार्यालयात कधीच कार्यरत नव्हती, असे सांगत मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी तिचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा प्रकार गंभीर आहे. एखाद्याने जर पक्षाचे नाव वापरून लोकांकडून पैसे घेतले असतील तर त्यांची चौकशी होऊन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले. तरीही पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसू नये म्हणून आमची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक होते, असेही त्यांनी नमूद केले.
उत्तम पार्सेकरला हटवून चौकशी करा : फेरेरा
पूजा नाईकच्या दाव्यानुसार कॅश फॉर जॉब घोटाळा जर 2019 ते 2021 च्या दरम्यान झाला आहे तर त्याकाळात सुदिन ढवळीकर सत्तेतच नव्हते. अशावेळी त्यांचा घोटाळ्याशी संबंध कसा येऊ शकतो, असा सवाल आमदार कार्लोस फेरेरा यांनी केला आहे. यावरून पूजाच्या माध्यमातून कुणीतरी त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न करत आहे हेच स्पष्ट होते. हा प्रकार म्हणजे गलिच्छ राजकारणाचा भाग आहे. सत्य शोधण्यासाठी तिचे फोन कॉल रिकॉर्डस् तपासले पाहिजेत, त्याचबरोबर उत्तम पार्सेकर यांना सर्वप्रथम पदावरून हटवून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे मत फेरेरा यांनी व्यक्त केले.