न्यू वंटमुरीतील प्रकरणात 12 जणांना 5 वर्षांची शिक्षा

दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल : सर्वांची रवानगी हिंडलगा कारागृहात; निकाल ऐकण्यासाठी गर्दी बेळगाव : न्यू वंटमुरी गावातील महिलेला विवस्त्र करत विद्युतखांबाला बांधून मारहाण केल्याप्रकरणी दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने 12 जणांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. बुधवार दि. 4 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून निकाल ऐकण्यासाठी न्यायालय आवारात ग्रामस्थ, नागरिक व वकिलांनी मोठी गर्दी केली होती. बसाप्पा रुद्राप्पा नाईक (वय 45), राजू […]

न्यू वंटमुरीतील प्रकरणात 12 जणांना 5 वर्षांची शिक्षा

दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल : सर्वांची रवानगी हिंडलगा कारागृहात; निकाल ऐकण्यासाठी गर्दी
बेळगाव : न्यू वंटमुरी गावातील महिलेला विवस्त्र करत विद्युतखांबाला बांधून मारहाण केल्याप्रकरणी दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने 12 जणांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. बुधवार दि. 4 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून निकाल ऐकण्यासाठी न्यायालय आवारात ग्रामस्थ, नागरिक व वकिलांनी मोठी गर्दी केली होती. बसाप्पा रुद्राप्पा नाईक (वय 45), राजू रुद्राप्पा नाईक (वय 52), केंपाण्णा रुद्राप्पा नाईक (वय 52), पार्वती बसाप्पा नाईक (वय 37), यल्लव्वा रुद्राप्पा नाईक (वय 67), लक्काप्पा राजू नाईक (वय 26), गौरव्वा बसाप्पा वालीकर (वय 62), संगीता सदाशिव हेग्गनाईक (वय 35), संतोष बसाप्पा नाईक (वय 21), शोभा राजाप्पा उर्फ राजू नाईक (वय 49), लक्कव्वा यल्लाप्पा नाईक (वय 42), शिवाप्पा रायाप्पा वन्नुरी (वय 53) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पीडित महिलेचा मुलगा आणि मुख्य आरोपी बसाप्पा नाईक याची मुलगी एकमेकावर प्रेम करत होते. प्रेमप्रकरणातून दोघांनी 10 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12.30 च्या दरम्यान घरातून पलायन केले. याच कारणातून 11 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास वरील सर्व आरोपींनी न्यू वंटमुरी गावातील एका अनुसूचित जमातीतील 42 वर्षीय महिलेच्या घरात दरवाजा तोडून प्रवेश केला.  त्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडण्यात आले. तिला घरातून फरफटत बाहेर ओढून आणण्यात आल्यानंतर विवस्त्र करून विजेच्या खांबाला बांधण्यात आले. इतकेच नाहीतर तिला अमानुष मारहाण करून विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात 11 डिसेंबर 2023 रोजी भारतीय दंड संहिता कलम 34, 37, 109, 114, 117, 143, 147, 148, 149, 307, 324, 323, 326, 341, 342, 353, 354, 354 बी, 355, 392, 427, 452, 504, 506 आणि सहकलम 2 (ए), ऑफ दि प्रिव्हेंशन डिस्ट्रक्शन अॅण्ड लॉस ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1981 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्य सरकारने, तसेच न्यायालयाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी 16 डिसेंबर 2023 रोजी सदर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला.त्यामुळे सीआयडीचे विशेष तपास विभागाचे पोलीस अधीक्षक पृथ्वीक शंकर यांची तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सहतपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधिक्षक अंजुमाला आणि पोलीस निरीक्षक  नारायणी यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. चौकशी अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून 133 दिवसांत 22 एप्रिल 2024 रोजी दहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात दोषारोप दाखल केला. दोषारोपात 92 साक्षीदार आणि 37 पुरावे सादर करण्यात आले. तर राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. एल. एस. सुळ्ळेद यांची नियुक्ती करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राज्याच्या हायकोर्टने सुमोटू प्रोसिडींग्स रिट पिटीशन नं. 27927/2023 मध्ये दाखल केले. तसेच सदर प्रकरण वर्षभरात निकालात काढण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. सुनावणीवेळी सरकारी पक्षातर्फे 45 साक्षी व मुद्देमाल तपासण्यात आले. तपास अधिकारी आणि पीडित महिलेने दिलेल्या साक्षीनंतर आरोपींवर गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे न्यायालयाने वरील सर्वांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान तत्कालीन पोलीस अधीक्षक, विशेष तपास विभाग सीआयडी, शुभान्वीता यांनी बारकाईने लक्ष घातले. सरकारी वकील सुळ्ळेद यांनी न्यायालयात सादर केलेले सर्व साक्षीदार आणि कागदपत्रे वेळेवर सादर करून प्रभावीपणे खटला चालविल्याने आरोपींना शिक्षा झाली. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस बंदोबस्तात सर्वांची हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलीस निरीक्षक झाले होते निलंबित…
हलगा येथील सुवर्णविधानसौधमध्ये कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्याचकाळात 11 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 च्या दरम्यान न्यू वंटमुरी गावात ही घटना घडली. अधिवेशनाच्या बंदोबस्तात काकतीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व्यस्त होते. मात्र सदर प्रकरणास जबाबदार धरत पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांना निलंबित करण्यात आले होते. सदर प्रकरण केवळ बेळगाव जिल्हा नव्हेतर राज्यभरात चर्चेला आले होते.