वीटभट्टी कामगारांच्या 11 झोपड्या भस्मसात
इदलहोंड येथील घटना : संसारोपयोगी साहित्य, सोन्याचे मंगळसूत्र, दोन मोटारसायकली आगीत खाक
खानापूर : खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथे वीटभट्टी कामगारांच्या 11 झोपड्या आगीत भस्मसात झाल्याने वीटभट्टी कामगारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. झोपडीसमोर लावलेल्या दोन दुचाकींसह सोन्याचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र व काही रोख रक्कमही या आगीत खाक झाली आहे. इदलहोंड येथील बाबाजी पाटील यांच्या शेतात वीटभट्टीचे काम गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. सोमवारी सर्व वीट कामगार वीटभट्टी उभारणीच्या कामात व्यस्त होते. त्यावेळी अचानक एका झोपडीला आग लागली. सर्व झोपड्या एकमेकाला लागून असल्याने सर्वच झोपड्यांना आगीने वेढले. आगीचा मोठा भडका उडाल्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांवर मर्यादा आल्या. खानापूर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत सर्व झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. या आगीत वीटकामगारांचे संसारोपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अंथऊण, भांडी तसेच स्वयंपाकाला लागणारे साहित्य यात जळून खाक झाले. तसेच झोपडीसमोर पार्क केलेल्या दोन दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत सोन्याचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्रही जळून खाक झाले आहे. काही रोख रक्कमही या आगीत जळाली आहे. या आगीत वीट कामगारांचे लाखो रुपयांचे साहित्य भस्मसात झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस निरीक्षक नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
पालकमंत्र्यांकडून मदत
हे सर्व कामगार गोकाक तालुक्यातील राजकट्टी गावचे आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना ही घटना समजताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना इदलहोंड येथे पाठवून आगीत नुकसान झालेल्या वीटभट्टी कामगारांना आर्थिक मदत देऊ केली.