सुलतानपूर न्यायालयात राहुल गांधी हजर

अमित शहा यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावणी वृत्तसंस्था/ सुलतानपूर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मानहानीच्या खटल्यात शुक्रवारी सुलतानपूरच्या खासदार-आमदार न्यायालयासमोर हजर झाले. अमित शहा यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी येथील न्यायालयात हजर राहून जबाब नोंदवला. न्यायाधीशांसमोर आपले म्हणणे नोंदवताना आपल्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत सांगितलेल्या सर्व गोष्टी खोट्या आणि निराधार असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. आपली प्रतिमा मलीन […]

सुलतानपूर न्यायालयात राहुल गांधी हजर

अमित शहा यांच्यासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सुनावणी
वृत्तसंस्था/ सुलतानपूर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मानहानीच्या खटल्यात शुक्रवारी सुलतानपूरच्या खासदार-आमदार न्यायालयासमोर हजर झाले. अमित शहा यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी येथील न्यायालयात हजर राहून जबाब नोंदवला. न्यायाधीशांसमोर आपले म्हणणे नोंदवताना आपल्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीत सांगितलेल्या सर्व गोष्टी खोट्या आणि निराधार असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी चुकीच्या राजकीय हेतूने ही याचिका दाखल करण्यात आली असल्याचेही स्पष्ट केले. राहुल गांधी यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी 12 ऑगस्ट 2024 ही खटल्याची पुढील तारीख निश्चित केली. राहुल गांधी यांचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2018 मध्ये बेंगळूरमध्ये तत्कालीन भाजप अध्यक्ष आणि विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करत मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने 20 फेब्रुवारी रोजी राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला होता. विशेष दंडाधिकारी शुभम वर्मा यांनी राहुल यांना या खटल्यातील जबाब नोंदवण्यासाठी 26 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.