पीडितेच्या मदतीला धावणाऱ्यांचा गौरव

पोलीस परेड ग्राऊंडवर रोख बक्षीस देऊन केला सत्कार  : उच्च न्यायालयाने केले कौतुक प्रतिनिधी/ बेळगाव काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील न्यू वंटमुरी येथे घडलेल्या ‘त्या’ निंद्य घटनेच्या वेळी पीडितेच्या मदतीला धावणाऱ्या गावकऱ्यांचा शनिवारी पोलीस दलाच्यावतीने सत्कार करण्यात आला. उच्च न्यायालयाने त्यांचे कौतुक करून दिलेले प्रमाणपत्रही संबंधितांना सुपुर्द करण्यात आले. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू असताना […]

पीडितेच्या मदतीला धावणाऱ्यांचा गौरव

पोलीस परेड ग्राऊंडवर रोख बक्षीस देऊन केला सत्कार  : उच्च न्यायालयाने केले कौतुक
प्रतिनिधी/ बेळगाव
काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील न्यू वंटमुरी येथे घडलेल्या ‘त्या’ निंद्य घटनेच्या वेळी पीडितेच्या मदतीला धावणाऱ्या गावकऱ्यांचा शनिवारी पोलीस दलाच्यावतीने सत्कार करण्यात आला. उच्च न्यायालयाने त्यांचे कौतुक करून दिलेले प्रमाणपत्रही संबंधितांना सुपुर्द करण्यात आले.
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू असताना 10 डिसेंबर रोजी रात्री न्यू वंटमुरी येथे प्रेमप्रकरणातून पलायन करणाऱ्या युगुलातील तरुणाच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. यावेळी महिलेला खांबाला बांधून मारहाण करण्यात आली होती. तिचा अवमान करण्यात आला होता.
अशा घटना घडतात त्यावेळी कोणीच पोलिसांना माहिती देण्यासाठी किंवा मदतीसाठी पुढे येत नाहीत. या घटनेच्या वेळी न्यू वंटमुरी येथील वासीम मकानदार व सिद्धाप्पा होळेकर (ग्रा. पं. अध्यक्ष) यांनी त्वरित पोलीस कंट्रोल रुमला माहिती दिली होती. त्याच गावातील जहांगीर तहसीलदार यांनी पोलीस पोहोचण्याआधी पीडितेच्या मदतीसाठी प्रयत्न केला होता.
या घटनेसंबंधीचा फोन पोलीस कंट्रोल रुमला गेला, तेव्हा कंट्रोल रुमचा कर्मचारी मंजुनाथ याने तातडीने काकती पोलीस स्थानकाशी संपर्क साधून ही घटना सांगितली. केवळ दहा मिनिटात काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद, सुभाष बिल्ल, विठ्ठल पठेद, नारायण चिप्पलकट्टी व अधिवेशन बंदोबस्तासाठी कोलार जिल्ह्यातून आलेले डीएआरचे कर्मचारी मुत्तप्पा क्वॉनी हे गावात पोहोचले आणि त्या महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका केल्याची माहिती पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी दिली.
शनिवारी सकाळी पोलीस परेड मैदानावर पीडितेच्या मदतीला धावणारे वासीम मकानदार, सिद्धाप्पा होळेकर, जहांगीर तहसीलदार यांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद यांना पाच हजार रुपये व उर्वरित पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी चार हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळ्ळूर, बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
महिलेच्या घरावर हल्ला करून निंद्य प्रकार सुरू असतानाच धाडसाने तिच्या मदतीसाठी धावणाऱ्या जहांगीर तहसीलदार यांचे 20 डिसेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने कौतुक केले होते. यासंबंधीचे प्रमाणपत्रही पोलीस आयुक्तांनी जहांगीर यांच्याकडे सुपूर्द केले.
त्या तिघांना संरक्षण
सत्कारानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा म्हणाले, अशा प्रकारच्या कोणत्याही घटना घडल्या की निर्भयपणे नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. वेळेत माहिती मिळाल्यास संबंधितांना तातडीने मदत मिळते. न्यू वंटमुरी प्रकरणात मदतीसाठी धावलेल्या तिघा जणांना संरक्षण पुरविण्यात येत आहे.