मुंबई : धनवीरसिंग ठाकूर, सध्या महाराष्ट्र भर गाजत असलेल्या ललित पाटील प्रकरणातून महाराष्ट्र अजून सावरलेला नाही. तोच ड्रग्ज च्या विळख्यात गुंतलेल्या नशेडी नराधमांची विकृती नुकतीच उजेडात आली आहे.
मुंबईतील रहिवासी एक दाम्पत्यानं आपल्या ड्रग्ज च्या गरज पूर्ती साठी आपल्या पोट च्या जन्मलेल्या मुलांची विक्री करून त्याच पैश्यांची उधळण ड्रग्ज वर केली असल्याची अत्यंत हृदय पिळवूनटाकणारी घटना अंधेरी प्रभागातून उघडकीस आली आहे. ज्याचे सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे.
अंधेरीतील डीएन नगर पोलिसांनी अंमली पदार्थांचे व्यसन असलेल्या दाम्पत्यावर दोन वर्षांखालील दोन मुलांना स्वत:साठी ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पैशांसाठी विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दाम्पत्याला त्यांची मुले विकण्यास मदत केल्याप्रकरणी आणि एक मूल विकत घेतल्याप्रकरणी पोलिसांनी इतर दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
लहान मुले विकण्याचे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय असल्याने आता हे प्रकरण पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट-९ च्या पोलिसांना कर्मचाऱ्यांना यश आले असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी शब्बीर खान, त्याची पत्नी सानिया, उषा राठोड आणि शकील मकरानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शब्बीर आणि सानिया यांना बऱ्याच काळापासून ड्रग्जचे व्यसन आहे. सुरुवातीला ते शब्बीरची बहीण रुबीना खानच्या वांद्रे (पूर्व) भारत नगर येथे राहत होते. पण ड्रग्जच्या व्यसनामुळे रुबीना अनेकदा त्यांच्याशी भांडत असे, म्हणून ते वर्सोवा येथे सानियाच्या आईच्या घरी राहायला गेले. आईच्या निधनानंतर ते आपल्या तीन मुलांसह नालासोपाऱ्यात स्थायिक झाले.
पैश्यांच्या शोधात ते रुबिनाच्या घरी परतले.
जेव्हा ते रुबिनाच्या घरी पोहोचले तेव्हा तिने त्यांना विचारले की त्यांना तीन मुले असताना त्यांच्यासोबत एकच मूल का आहे? सानियाने ड्रग्ज विकत घेण्यासाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी आपल्या दोन मुलांना विकल्याची कबुली दिली.
मे 2022 मध्ये शब्बीर आणि सानिया यांनी हुसेनला अंधेरीतील एका व्यक्तीला 60,000 रुपयांना विकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याने गेल्या महिन्यात आपले दुसरे मूल शकील मकरानी यांना १४ हजार रुपयांना विकले होते.
त्यानंतर हैराण झालेल्या रुबीनाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने गुन्ह्याच्या छडा लावून आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर नवजात मुलीची सुटका करण्यात आली, मात्र दोन वर्षांच्या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.