डेव्हिड वॉर्नरचा कसोटीसह वनडे क्रिकेटलाही अलविदा

37 वर्षीय स्फोटक खेळाडूची धमाकेदार कामगिरी : पाकिस्तानविरुद्ध खेळणार शेवटचा कसोटी सामना वृत्तसंस्था/ सिडनी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या 14 वर्षाच्या देदीप्यमान कामगिरीनंतर कसोटीसह एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या प्रारंभी सोमवारी सिडनी येथे पत्रकार परिषद घेत त्याने या निर्णयाची माहिती दिली. तीन जानेवारीपासून पाकिस्तानविरुद्ध तो आपला शेवटचा कसोटी सामना खेळेल. आपल्या […]

डेव्हिड वॉर्नरचा कसोटीसह वनडे क्रिकेटलाही अलविदा

37 वर्षीय स्फोटक खेळाडूची धमाकेदार कामगिरी : पाकिस्तानविरुद्ध खेळणार शेवटचा कसोटी सामना
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आपल्या 14 वर्षाच्या देदीप्यमान कामगिरीनंतर कसोटीसह एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या प्रारंभी सोमवारी सिडनी येथे पत्रकार परिषद घेत त्याने या निर्णयाची माहिती दिली. तीन जानेवारीपासून पाकिस्तानविरुद्ध तो आपला शेवटचा कसोटी सामना खेळेल. आपल्या धमाकेदार व स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या डावखुऱ्या खेळाडूने ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले.
पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका ही कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका असेल, असे वॉर्नरने अगोदरच जाहीर केले. मात्र, वॉर्नरने आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. पुढील दोन वर्ष टी-20 क्रिकेट खेळताना पूर्णपणे तंदुरुस्त राहिला आणि 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाला गरज असेल तर निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, असेही तो याप्रसंगी म्हणाला. मी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतात झालेल्या विश्वचषकादरम्यानच वनडे क्रिकेटला अलविदा करण्याचा विचार केला होता. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटते. या निर्णयानंतर मला जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल, असेही तो यावेळी म्हणाला. सध्या तरी माझी पत्नी कँडिस आणि तीन मुलींना मला जास्त वेळ देण्याची गरज  असल्याचे मत त्याने यावेळी मांडले.
टी-20 मध्ये मात्र खेळत राहणार
वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरीही वॉर्नर टी-20 क्रिकेट मात्र खेळत राहणार आहे. वॉर्नरने टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वनडे आणि टेस्टमधून निवृत्ती जाहीर केली आहे. जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असू शकतो. याशिवाय, आयपीएलमध्येही तो त्याच दमाने मैदानात उतरणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 लीगमध्ये तो दुबई कॅपिटल्सची धुरा सांभाळणार आहे.
कसोटी, वनडेत जबरदस्त कामगिरी
वॉर्नरने 161 वनडे आणि 111 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. वनडेत 22 शतकासह 6932 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 26 शतकासह 8695 धावा केल्या आहेत. तसेच तो दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा भागही होता. सलामीला फलंदाजीला येत अनेकवेळा त्याने आक्रमक खेळी साकारली आहे. गोलंदाजावर तुटून पडताना त्याने संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. कसोटीपाठोपाठ वनडेतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचे अविस्मरणीय कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.
गरज पडल्यास पुन्हा मैदानात
मला कल्पना आहे की, पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी महत्त्वाची स्पर्धा खेळवली जाणार आहे. तोवर मी असाच चांगल्या फॉर्ममध्ये खेळत राहिलो आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला माझी गरज असेल तर मी संघासाठी उपलब्ध असेन.
                     -डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू