इटलीनजीक समुद्रात नौका बुडाली, 11 ठार
60 हून अधिक जण बेपत्ता : प्रवाशांमध्ये पाकिस्तानी अन् बांगलादेशी नागरिक
वृत्तसंस्था/ रोम
इटलीच्या किनाऱ्यानजीक समुद्रात दोन नौका बुडाल्या असून या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 66 जण बेपत्ता झाले आहेत. प्रवासी नौकांमध्ये बिघाड झाल्याच्या काही तासांनी सोमवारी रात्री उशिरा भूमध्य समुद्रात इटलीच्या तटरक्षक दलोन शोध आणि बचावकार्य हाती घेतले. दक्षिण इटलीत कॅलाब्रियाच्या किनाऱ्यापासून सुमारे 193 किलोमीटर अंतरावर संकटात सापडलेल्या नौकेला पाहून एका मर्चंट शिपने सर्वप्रथम एसओएस कॉल केला, ज्यानंतर बचावमोहीम हाती घेण्यात आली.
मर्चंट शिपने 12 जणांना वाचविले असून इटलीचे तटरक्षक दल येईपर्यंत त्यांना सहाय्य केले आहे. नौका बुडाल्यावर बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे. दोन इटालिन गस्तनौका आणि एक एटीआर42 विमान शोधमोहिमेत सामील आहे. लवकरच वैद्यकीय पथकांसोबत आणखी एक गस्तनौका शोधमोहिमेत सामील होणार असल्याचे तटरक्षक दलाकडून सांगण्यात आले.
तुर्कियेमधून रवाना झाल्या नौका
बेपत्ता असलेल्या 66 जणांपैकी 26 जण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. तर संबंधित नौका मागील आठवड्यात तुर्कियेमधून रवाना झाल्या होत्या, यातून इराक, सीरिया, इराण आणि अफगाणिस्तानातील नागरिक प्रवास करत होते. इटालियन अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. भूमध्य समुद्राच्या मार्गे या नौका युरोपपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या.
पाकिस्तानी, बांगलादेशी लोकांचा समावेश
एका अन्य घटनेत जर्मन मदतपथकाला एका नौकेवर 10 प्रवासी मृतावस्थेत आढळून आले होते. तर हे पथक इटलीच्या लॅम्पेडुसा बेटापासून दूर माल्टानजीक संकटात सापडलेल्या एका नौकेवरील 51 जणांना वाचविण्यास यशस्वी ठरले आहे. या नौकेतून बांगलादेश, पाकिस्तान, इजिप्त आणि सीरियाचे नागरिक प्रवास करत होते. इटालियन गृह मंत्रालयाने या नौकेला लॅम्पेडुसामध्ये डॉक करण्याचा आदेश दिला होता. चालू वषांत आतापर्यंत भूमध्य समुद्र ओलांडण्याच्या प्रयत्नादरम्यान सुमारे एक हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत किंवा बेपत्ता झाले आहेत. मागील वर्षी हा आकडा 3,155 इतका होता.
Home महत्वाची बातमी इटलीनजीक समुद्रात नौका बुडाली, 11 ठार
इटलीनजीक समुद्रात नौका बुडाली, 11 ठार
60 हून अधिक जण बेपत्ता : प्रवाशांमध्ये पाकिस्तानी अन् बांगलादेशी नागरिक वृत्तसंस्था/ रोम इटलीच्या किनाऱ्यानजीक समुद्रात दोन नौका बुडाल्या असून या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 66 जण बेपत्ता झाले आहेत. प्रवासी नौकांमध्ये बिघाड झाल्याच्या काही तासांनी सोमवारी रात्री उशिरा भूमध्य समुद्रात इटलीच्या तटरक्षक दलोन शोध आणि बचावकार्य हाती घेतले. दक्षिण इटलीत कॅलाब्रियाच्या […]
