इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी

हिदर नाईट सामनावीर, सुझी बेट्सचे अर्धशतक वाया वृत्तसंस्था/ ड्युनेडीन यजमान न्यूझीलंड आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने विजयी सलामी दिली. या मालिकेतील मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 27 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या हिदर नाईटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने […]

इंग्लंड महिला संघाची विजयी सलामी

हिदर नाईट सामनावीर, सुझी बेट्सचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ ड्युनेडीन
यजमान न्यूझीलंड आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने विजयी सलामी दिली. या मालिकेतील मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 27 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या हिदर नाईटला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 4 बाद 160 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 133 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 27 धावांनी गमवावा लागला.
इंग्लंडच्या डावामध्ये कर्णधार हिदर नाईटने 39 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 63, माईया बुचरने 40 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 43, सोफिया डंकलेने 24 चेंडूत 6 चौकारांसह 32, ब्युमॉन्टने 14 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. अॅमी जोन्स 2 धावावर धावचीत झाली. ब्युमाँट आणि डंकले यांनी पहिल्या गड्यासाठी 27 धावांची भागिदारी केली. माईया बुचर आणि नाईट यांनी तिसऱ्या गड्यासाठी 64 चेंडूत 98 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या डावामध्ये 1 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जेस केर, जोनास आणि ताहुहु यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीची फलंदाज आणि कर्णधार सुझी बेट्सने 51 चेंडूत 9 चौकारांसह 65, प्लिमेरने 24 चेंडूत 1 चौकारासह 21, तर हॅलीडेने 23 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 27, ग्रीनने 14 चेंडूत 8, जेस केरने 1 चौकारासह नाबाद 8 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 13 चौकार नेंदविले गेले. इंग्लंडतर्फे लॉरेन बेलने 29 धावांत 2 तर ग्लेनने 17 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड 20 षटकात 4 बाद 160 (ब्युमॉन्ट 15, डंकले 32, बुचर नाबाद 43, हिदर नाईट 63, जोन्स 2, गिब्सन नाबाद 1, अवांतर 4, जेस केर 1-26, जोनास 1-30, ताहुहु 1-36), न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 133 (सुझी बेट्स 65, प्लिमेर 21, हॅलिडे नाबाद 27, ग्रीन 8, केर नाबाद 8, अवांतर 4, बेन 2-29, ग्लेन 1-17).