आम्हाला विचार नकोत…. दणदणीत सोहळा हवा..!विचार ऐकायला जेमतेम गर्दी

सुधाकर काशीद कोल्हापूर राजर्षी शाहू जयंतीचे दिवसभर भरगच्च कार्यक्रम. मिरवणुका.. पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी, पुतळ्याजवळ उभे राहून फोटो काढून घेण्यासाठी गर्दी. रात्री तर डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचे एका मंडळाने केलेले धाडस. शाळा, महाविद्यालय, सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी म्हणजे सगळे तसे निवांत. संध्याकाळी शाहू जयंतीचा मुख्य कार्यक्रम शाहू पुरस्कार वितरणाचा. खऱ्या अर्थाने शाहूंचे विचार आयुष्यभर जपलेल्या पन्नालाल […]

आम्हाला विचार नकोत…. दणदणीत सोहळा हवा..!विचार ऐकायला जेमतेम गर्दी

सुधाकर काशीद कोल्हापूर

राजर्षी शाहू जयंतीचे दिवसभर भरगच्च कार्यक्रम. मिरवणुका.. पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी, पुतळ्याजवळ उभे राहून फोटो काढून घेण्यासाठी गर्दी. रात्री तर डॉल्बी लावून मिरवणूक काढण्याचे एका मंडळाने केलेले धाडस. शाळा, महाविद्यालय, सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी म्हणजे सगळे तसे निवांत. संध्याकाळी शाहू जयंतीचा मुख्य कार्यक्रम शाहू पुरस्कार वितरणाचा. खऱ्या अर्थाने शाहूंचे विचार आयुष्यभर जपलेल्या पन्नालाल सुरांणा यांच्या गौरव सोहळ्याचा व त्यांचे विचार ऐकण्याचा. त्या कार्यक्रमाला प्रतिसाद कसा भरभरून पाहिजे होता. पण हा मुख्य कार्यक्रम मात्र जेमतेम गर्दीचा झाला. म्हणजे विचारांच्या देवघेवीच्या ज्या कार्यक्रमाला नव्या, जुन्या पिढीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिजे होता, तो नाही. आणि फोटोच्या कार्यक्रमाला मात्र मोठी गर्दी झाली.
गर्दी जेमतेम असल्यामुळे शाहू पुरस्काराचे आणि पुरस्कार विजेत्या पन्नालाल सुराणा यांचे महत्त्व कमी व्हायचा प्रश्नच नाही. पण लोकांना आता विचार नकोत, सोहळे हवेत, हे तेथे उपस्थित असलेल्यांना जाणवल्याशिवाय राहिले नाही. हीच परिस्थिती शाहू जयंतीनिमित्त दसरा चौकात उभारलेल्या भव्य स्ट्रक्चर मंडपाची उभारणी होती. तेथेही पोवाडा, व्याख्यान, लोककलांचे अखंड दिवसभर कार्यक्रम होते. मोठा खर्च करून पावसाचा एक थेंबही आत येणार नाही, असा मंडप उभारला होता. चार दिवस मंडप उभारणीचे काम सुरू होते. हजार ते दीड हजार लोकांसाठी खुर्च्या मांडल्या होत्या. अत्याधुनिक यंत्रणा होती. पण तेथेही उपस्थितांची गर्दी जेमतेमच होती.
शाहू जयंतीचा सोहळा काल जरूर वेगवेगळ्या संस्थांत उत्साहाने साजरा झाला. शहरात शाहूमय वातावरण होते. ठिकठिकाणी प्रतिमा पूजन झाले. सकाळी दसरा चौकातून चित्ररथ निघाले. शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचा सोहळाही थाटात झाला. शाहूकालीन कागदपत्रे, आदेश, जाहीरनामे, विविध कलाकारांच्या रंगरेषातून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरले. पण मुख्य सोहळा होता तो शाहू पुरस्काराचा. हा पुरस्कार म्हणजे अतिशय मानाचा. देशभरातील विविध मान्यवरांना या पुरस्काराने गौरवले गेले. काल पन्नालाल सुराणा यांच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला शाहू पुरस्कार देण्याचा हा समारंभ होता.
पुरस्कारासाठी त्यांची निवड हा अतिशय चांगला निर्णय झाला. कारण आज पन्नालाल सुराना यांचे वय 92. वयाची 70 वर्षे या माणसाने समाजवादी विचार केवळ भाषणातून नव्हे तर, प्रत्यक्ष कृतीतून जपला. भुदान चळवळ, कामगार चळवळ, जात निर्मूलन चळवळ, महागाई, भ्रष्टाचाराच्या विरोधात चळवळ, अनाथ मुलांसाठी अपना घर अशा चळवळीत ते कायम सक्रिय राहिले. पटणार नाही, पण वयाच्या 90 वर्षापर्यंत ते या कामासाठी एसटीतूनच राज्यभर फिरत राहिले. स्वतंत्र गाडी पाहिजे, राहण्यासाठी रेस्ट हाऊस पाहिजे, जेवण-खाणं पाहिजे, असली कोणतीही अट नाही.
अलीकडे प्रवासात त्यांचे पाय सुजू लागल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा एसटीचा प्रवास बंद केला. त्यांना पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी राज्यपालपदाची संधी दिली होती. पण त्यांनी ती विनम्रपणे नाकारली. मला मखरात बसवू नका. मला लोकांतच काम करू द्या, असे त्यांनी सांगितले. किल्लारीच्या भूकंपात जी मुले अनाथ झाली, त्यांच्यासाठी त्यांनी अपना घर संस्था काढली. त्यात या मुलांना ठेवले. त्या संस्थेसाठी शासकीय अनुदान यायचे. त्या अनुदानाचा चेक देण्यासाठी एका अधिकाऱ्याने कमिशन मागितले. पन्नालाल सुराणा तेथून उठले व त्या अधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसले. मागून संस्था चालवीन, पण एक पैसा कमिशन देणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतली आणि सारे शासन हादरले.
अशा 92 वर्षाच्या कणखर माणसाला काल शाहू पुरस्कार देण्यात आला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या इतर कार्यक्रमामुळे या समारंभाला ते आले नाहीत. समारंभाला गर्दी जेमतेम. त्यात वीस मिनिटे पन्नालाल सुराणा बोलले. खूप काही सांगून गेले. ऐकायला तेथे नवी पिढी होतीच कुठे? उलट त्याचवेळी डॉल्बी लावून दसरा चौकातून एका मंडळाच्या पोरांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती. सारा दसरा चौक दणाणत होता. पण हा शाहू पुरस्काराचा सर्वात मुख्य समारंभ ज्यांना विचार ऐकण्याची गरज आहे अशांच्या उपस्थितीशिवाय सुरू होता. त्यामुळे नक्कीच शाहू पुरस्कार विजेत्या पन्नालाल सुराणांचे काही बिघडले नाही. शाहू पुरस्काराची महती गर्दी नसल्यामुळे कमी झाली नाही. पण लोकांना मात्र आता असले विचार नकोत. फक्त दणदणीत सोहळे पाहिजेत, हे तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना जाणवल्याशिवाय राहिले नाही.