आफ्रिकेने सामना जिंकला, पण अमेरिकेचा शेवटपर्यंत लढा

पण अमेरिकेचा शेवटपर्यंत लढा, आफ्रिका 18 धावांनी विजयी : सामनावीर डिकॉकची 74 धावांची खेळी  वृत्तसंस्था/ अँटिग्वा दक्षिण आफ्रिकेने टी 20 विश्वचषक स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखताना सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात अमेरिकेवर 18 धावांनी विजय मिळवला. डिकॉक व कर्णधार मार्करमच्या शानदार खेळीच्या जोरावर आफ्रिकेने 20 षटकांत 6 बाद 194 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग […]

आफ्रिकेने सामना जिंकला, पण अमेरिकेचा शेवटपर्यंत लढा

पण अमेरिकेचा शेवटपर्यंत लढा, आफ्रिका 18 धावांनी विजयी : सामनावीर डिकॉकची 74 धावांची खेळी 
वृत्तसंस्था/ अँटिग्वा
दक्षिण आफ्रिकेने टी 20 विश्वचषक स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखताना सुपर-8 मधील पहिल्या सामन्यात अमेरिकेवर 18 धावांनी विजय मिळवला. डिकॉक व कर्णधार मार्करमच्या शानदार खेळीच्या जोरावर आफ्रिकेने 20 षटकांत 6 बाद 194 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेने शेवटपर्यंत लढा दिला पण त्यांना 6 बाद 176 धावापर्यंत मजल मारता आली. 40 चेंडूत 74 धावांची खेळी करणाऱ्या डिकॉकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. द.आफ्रिकेची पुढील लढत दि. 21 रोजी इंग्लंडविरुद्ध होईल.
195 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्टिव्हन टेलर आणि अँड्रिज गौस यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत 33 धावांची सलामी दिली. रबाडाने टेलरला बाद करत अमेरिकेला पहिले यश मिळवून दिले. टेलरने 14 चेंडूत 24 धावांची खेळी केली. टेलर बाद झाल्यानंतर अमेरिकेने लागोपाठ विकेट फेकल्या. नितीश कुमारला फक्त आठ धावाच करता आल्या. कर्णधार अॅरोन जोन्सला खातेही उघडता आले नाही. अनुभवी कोरी अँडरसनला 12 धावाच काढता आल्या. एस जहांगिर तीन धावा काढून बाद झाला.
गौसची अर्धशतकी खेळी वाया
एका बाजूला विकेट पडत असताना अँड्रिज गौस मात्र दुसऱ्या बाजूला शानदार फलंदाजी करत होता. गौसला हरमीत सिंहने चांगली साथ दिली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचे पाणी पळवलं होतं. शेवटच्या 2 षटकात 28 धावांची गरज होती, त्यावेळी अनुभवी रबाडाने भेदक मारा केला. रबाडाने हरमीत सिंहला बाद करत सामना फिरवला. रबाडाने या षटकात फक्त दोन धावा खर्च करत जम बसलेल्या हरमीत सिंह ला बाद केले. गौसने एकतर्फी झुंज देताना 47 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारासह नाबाद 80 धावांचे योगदान दिले. गौसला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही, त्याचा फटका अमेरिकाला बसला. अमेरिकन संघाला 20 षटकांत 6 बाद 176 धावापर्यंत मजल मारता आली. आफ्रिकेकडून रबाडाने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
डिकॉकला सूर गवसला
प्रारंभी, अमेरिकेने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी पाचारण केले. आफ्रिकेकडून डिकॉक व रिझा हेंड्रिक्स यांनी डावाला सुरुवात केली पण तिसऱ्या षटकात सौरभ नेत्रावळकरने हेंड्रिक्सला 16 धावांवर बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. यानंतर डिकॉक व कर्णधार मार्करम यांनी संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 106 धावांची भागीदारी साकारली. दोघांनाही अमेरिकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. दरम्यान, डिकॉकला हरमीत सिंगने बाद करत ही जोडी फोडली. डिकॉकने 40 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारासह 74 धावा केल्या. डिकॉक बाद झाल्यानंतर स्टार फलंदाज डेव्हिड मिलरला भोपळाही फोडता आला नाही. त्याला हरमीत सिंगने तंबूचा रस्ता दाखवला.
लागोपाठ दोन विकेट गेल्यानंतर कर्णधार मार्करमही 15 व्या षटकांत बाद झाला. त्याने 32 चेंडूत 46 धावा केल्या. यानंतर हेन्रिक क्लासेन व ट्रिस्टन स्टब्ज यांनी अखेरच्या पाच षटकात आक्रमक खेळत संघाला 4 बाद 194 धावापर्यंत मजल मारुन दिली. पाचव्या विकेटसाठी ट्रिस्टन स्टब्स आणि क्लासेन या दोघांनी 53 धावांची भागीदारी केली. क्लासेनने 22 बॉलमध्ये 3 षटकारासह 36 तर स्टब्सने 16 बॉलमध्ये 2 चौकारासह 20 धावा केल्या. अमेरिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. अमेरिकेचा अन्य कोणताही गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही.
 
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 4 बाद 194 (डिकॉक 74, हेंड्रिक्स 11, मार्करम 46, मिलर 0, क्लासेन नाबाद 36, स्टब्ज नाबाद 20, नेत्रावळकर व हरमीत सिंग प्रत्येकी दोन बळी).
अमेरिका 20 षटकांत 6 बाद 176 (स्टीव्हन टेलर 24, गौस नाबाद 47 चेंडूत नाबाद 80, नितिश कुमार 8, अॅरॉन जोन्स 0, कोरी अँडरसन 12, हरमीत सिंग नाबाद 38, जसदीप सिंग नाबाद 2, रबाडा 18 धावांत 3 बळी, केशव महाराज, नोर्तजे व शम्सी प्रत्येकी एक बळी).
 
महत्वाचा बॉक्स
द.आफ्रिकेचे सलग पाच विजय
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने सलग पाच सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. गट टप्प्यातील सलग चार सामने जिंकल्यानंतर आफ्रिकेने सुपर-8 मधील पहिला सामना जिंकून सलग पाचव्या विजयाची नोंद केली.