गुड बाय वेस्ट इंडिज, वेलकम इंडिया

गुड बाय वेस्ट इंडिज, वेलकम इंडिया

2026 टी 20 वर्ल्डकपचे यजमानपद भारत व श्रीलंकेला : 20 संघ होणार सहभागी
वृत्तसंस्था/ बार्बाडोस
भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024 चा टी 20 विश्वचषक जिंकला. भारताने विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. आयसीसीच्या या नवव्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्याकडे होते. प्रथमच अमेरिका खंडात यशस्वी आयोजन केल्यानंतर 2026 साली होणारा टी 20 वर्ल्डकप भारत व श्रीलंकेत होणार आहे. आयसीसीकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
आयसीसीची दहावी टी 20 वर्ल्डकप स्पर्धा फेब्रुवारी ते मार्च 2026 या दरम्यान होण्याची शक्यता आहे. भारत व श्रीलंका हे दोन्ही देश संयुक्तरित्या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या स्पर्धेतही 20 संघ सहभागी होतील, अशी माहिती आयसीसीच्या सूत्रांनी दिली. यजमान असल्यामुळे भारत आणि श्रीलंका वर्ल्डकपचा भाग असतील. विशेष म्हणजे, 2026 टी 20 विश्वचषकातील बहुतांश सामने भारतात खेळवले जातील. या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचा संघही भारतात येणार आहे. विंडीजमधील स्पर्धेत सुपर 8 फेरी गाठलेले 12 संघ 2026 वर्ल्डकपसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित 8 संघ पात्रता फेरीतून येतील. दरम्यान, आयसीसीने भारतातील या स्पर्धेचे वेळापत्रक व इतर माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
2026 टी 20 वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेले संघ –
भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि पाकिस्तान.