इंडस टॉवरमध्ये हिस्सेदारी घेणार नसल्याचा एअरटेलचा खुलासा

इंडस टॉवरमध्ये हिस्सेदारी घेणार नसल्याचा एअरटेलचा खुलासा

21 टक्के हिस्सेदारीबाबत होती चर्चा : चर्चेला विराम
नवी दिल्ली :
इंडस टॉवरमधील व्होडाफोन समूहाची 21 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार असल्याच्या वृत्ताचा दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने इन्कार केला आहे. तसा कोणत्याही प्रकारचा इरादा नसल्याचे भारती एअरटेलने स्पष्ट केले आहे.
भारती एअरटेल इंडस टॉवरमधील हिस्सा खरेदी करणार असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून ऐकू येत होत्या. त्याबाबत चर्चाही सुरु होती. पण
बुधवारी भारती एअरटेलने याबाबत मौन सोडले आणि तसा कोणताही खरेदीचा इरादा नसल्याचे स्पष्ट करत यावर पडदा टाकला.
नियामकाची परवानगी घेऊनच खरेदी
भारती एअरटेल ही भारतातील दिग्गज दूरसंचार क्षेत्रातील कंपनी मानली जाते. भारती एअरटेलने म्हटले, की कंपनी कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वाटा खरेदी करण्यासाठी सध्याला तरी इच्छुक नाही. भविष्यात जर का हिस्सेदारी खरेदी करायची झालीच तर नियामकाची रीतसर मंजुरी घेऊनच केली जाणार असल्याचा खुलासाही भारती एअरटेलने याप्रसंगी केला आहे. अब्जाधीश उद्योगपती सुनील मित्तल यांच्या मालकीच्या एअरटेलचा वाटा इंडस टॉवरमध्ये सर्वाधिक 47 टक्के इतका आहे.
काय झाला समभागांवर परिणाम
बुधवारी एअरटेलने हिस्सेदारीबाबत खुलासा केल्याने यादरम्यान शेअरबाजारात मात्र त्याचे पडसाद दिसून आले. बुधवारी एअरटेलचे समभाग 0.3 टक्के तेजीत होते तर व्होडाफोन आयडियाचे समभाग मात्र 4.5 टक्के घसरणीत होते. इंडस टॉवरचे समभाग 1.4 टक्के नुकसानीसह 354 रुपयांवर व्यवहार करत होते.