वार्षिक राशिभविष्य 2024 : तुळ
अत्यंत संवेदनशील असल्या तरी तूळ राशीच्या व्यक्ती मनातील गोष्टी सहसा इतरांसोबत वाटत नाहीत. स्वच्छता आणि सजावटीचे ते भोक्ते असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचीदेखील निवड अत्यंत पारखून करतात. गुपित राखून ठेवण्यात त्यांचा हातखंडा असतो. आपल्या सभोवती कितीही जवळच्या व्यक्ती असल्यातरी त्यांना मनाचा थांगपत्ता लागू देत नाहीत.
चिन्ह – तराजू
राशीस्वामी – शुक्र
शुभवार – शुक्रवार
अशुभ वार- गुरुवार
घात मास – माघ
शुभ रंग- पांढरा व गुलाबी
भाग्यरत्न – हिरा
आराध्य देवता – श्री कुलदेवता
कोणत्याही नात्याचे संतुलन बिघडू न देणे तूळ राशीच्या व्यक्तींना खूपच चांगले जमते. प्रत्येक व्यक्तीला तुम्हीच आमच्या आयुष्यात किती महत्वाचे आहात, हे या व्यक्ती खूप चांगल्या तऱ्हेने भासवून देऊ शकतात. तूळ राशीच्या व्यक्ती या अत्यंत संवेदनशील असतात. आपल्या मनातील गोष्टी सहसा कोणाहीबरोबर वाटून घेत नाहीत. मनातील गोष्टी बोलताना खूप विचार करतात. त्यामुळे यांच्याविषयी जाणून घेणे कठीण आहे. या व्यक्ती राजकारणामध्ये अधिक माहीर असतात. कोणत्याही गोष्टीच्या तळाशी जाऊन या व्यक्ती विचार करतात. या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट लागते. त्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना स्वच्छता आणि डेकोरेशन करणे अत्यंत आवडते. कोणतीही गोष्ट यांना चुकीची वाटली तर या व्यक्ती स्वत: ती गोष्ट नीट होईपर्यंत मेहनत घेतात. कारण अस्ताव्यस्त राहणं या व्यक्तींना आवडत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन या व्यक्तींना हवे असते. या राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे रागावर आणि नको त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे या व्यक्तींना खूपच चांगले जमते. प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती परफेक्ट लव्ह मटेरियल असतात. यांचे प्रेम हे शारीरिक नसते तर आंतरिक प्रेमावर यांचा विश्वास जास्त असतो. आपल्या प्रेमाला जपणे यांना जास्त आवडते. संपूर्ण प्रामाणिकपणे आपल्या जोडीदारावर या व्यक्ती प्रेम करतात. कधी कधी त्यांना समजून घेणे कठीण जाते पण हीच त्यांच्या प्रेमाची पद्धत आहे. तूळ राशीच्या व्यक्तींची नजर अत्यंत पारखी असते. वस्तू पाहूनच ती किती किमतीची असेल याची कल्पना या व्यक्ती करू शकतात. कोणाहीबाबत पटकन मत व्यक्त करत नाहीत. त्या व्यक्तीचे नीट निरीक्षण करून मगच आपले मत बनवतात. या व्यक्तींना भांडण करणे अजिबात आवडत नाही. आपल्या आजूबाजूच्या लोकांनी नेहमी आनंदी राहावे असेच यांना वाटत असते. आपल्यावर कोणी रागावणार नाही ना अथवा रूसून बसणार नाही याचा या व्यक्ती खूपच विचार करतात. अत्यंत उत्कृष्ट जीवन जगायचं असल्यामुळे निवड अगदी विचार करून या व्यक्ती घेतात. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात प्रवेश तर देतात पण सर्व गोष्टी त्यांना सांगत नाहीत.
ग्रहमान
शनी पंचम भावात राहतील. जे तुमच्या सप्तम, एकादश आणि द्वितीय भावावरही दृष्टी कायम ठेवतील. या स्थानातील शनी शुभ असतो. गुरु 1 मे पर्यंत तुमच्या सप्तम भावात राहून, त्यानंतर अष्टम भावात जाऊन तुमच्या द्वादश भावात तुमच्या द्वितीय आणि तुमच्या चतुर्थ भावावर दृष्टी टाकतील. सप्तमातील गुरु सर्वार्थाने आपल्यासाठी शुभ आहे कौटुंबिक सौख्य, भागीदारीचे व्यवहार, संतती सौख्य यादृष्टीने गुरु शुभ राहणार आहे. आर्थिक लाभ चांगले घडत राहणार आहेत. कोणतेही कार्य सहज जुळून येईल. लग्नासाठी गुरुबळ मात्र एप्रिल महिन्यापर्यंत आहे. पुढील अष्टमातील गुरु तितकासा चांगला नाही. जरी गुरु वाईट नसला तरी तो शुभकारक नाही. मानसिक दडपण येण्याची दाट शक्यता आहे. राहू षष्ठ भावात आणि केतू द्वादश भावात राहतील. राहू आणि केतू यांचे विचार केला तर हे दोन्ही भ्रमण आपल्यासाठी तितकेसे चांगले नाही. संगत बिघडू देऊ नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या. दुखापतही होऊ शकते. तुमच्या प्रेम संबंधात या वर्षीची सुरवात चांगल्या स्थितीत राहील. दुसऱ्या भावात शुक्र आणि बुध तुम्हाला गोड बोलणारे बनवतील. तुम्हाला आपल्या करिअरला घेऊन या वर्षी बरेच उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सूर्य आणि मंगळ वर्षाच्या सुरवातीमध्ये तुमच्या तिसऱ्या भावात राहील, तसेच राहूचा प्रभाव तुमच्या सहाव्या भावावर असण्याने तुम्ही कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यात अजिबात अडचण येणार नाही आणि तुमची हीच गोष्ट तुमच्या करिअरमध्ये यश देईल. शनि एकदश भावात पूर्ण वर्षभर दृष्टी टाकेल यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनेल. द्वितीय भावावरही शनिची कृपादृष्टी कायम राहील. यामुळे आर्थिक उन्नतीचे योग बनतील. वर्षाची सुरवात खूप उत्तम असेल कारण, दुसऱ्या भावात शुक्र आणि बुध राहील आणि चौथ्या भावाचा स्वामी शनी पंचम भावात आपल्याच राशीमध्ये असून कौटुंबिक सामंजस्य वाढवेल. तिसऱ्या भावात सूर्य आणि मंगळमुळे भावंडांना काही मोठी उपलब्धी प्राप्त होऊ शकते परंतु, फेब्रुवारी, मार्चमध्ये मंगळाचे आणि सूर्याचे गोचर तुमच्या चतुर्थ भावाला प्रभावित करेल यामुळे कौटुंबिक जीवनात तणाव आणि संघर्ष वाढू शकतो. विवाहेच्छुकांसाठी मेपर्यंतच गुरुबळ आहे अन्यथा वर्षभर वाट पाहावी लागेल.
नोकरदार
तुमच्या जीवनशैलीतही फरक पडेल. तुम्ही लोकांसाठी उपयुक्त असाल परंतु, आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणून, तुम्ही या वर्षी आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणत्याही व्यापार, वाहतूक किंवा शेअर मार्केटशी संबंधित व्यवसायात असाल तर या काळात सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होईल आणि त्यामुळे तुमचे नुकसान होईल. या काळात तुम्ही अनुभवी व्यक्तीची मदत घ्यावी. कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप खर्च कराल.
पालकांना खूश करण्याचा प्रयत्न कराल. यामुळे मानसिक समाधान मिळेल. घरातील सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल आणि तुम्ही स्वत:ला एक चांगला माणूस म्हणून स्थापित करू शकाल. घरात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरीत तुमची स्थिती चांगली राहील. मे महिन्यात गुरुदेव बृहस्पती महाराज आठव्या भावात प्रवेश करतीलही पण परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहणार नाही, त्यामुळे धनहानीची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे नुकसानदेखील होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्या वाढू शकतात. मात्र, हा काळ तुमची आध्यात्मिक विचारसरणी वाढवेल. धार्मिक कार्यात अधिक रस घेण्यास सुरुवात कराल. ही परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहणार नाही, त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जे काही काम मिळेल, तुम्ही आपल्या नोकरीमध्ये त्याला उत्तम पद्धतींनी फायदा करू शकाल. यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुष राहतील आणि त्यांच्या कृपेने तुम्हाला उत्तम पदप्राप्तीही होईल.
स्त्री वर्ग
करिअरबाबत योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या करिअरमध्ये बदल होऊ शकतो. या वर्षी तुमची कारकीर्द तुम्हाला पुढे जाण्यासाठी खूप संधी देईल परंतु, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की अनेक प्रकरणांमध्ये गडबड करून चालणार नाही. स्वत:बद्दल बेफिकीर राहू नका अन्यथा, तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रातही अचानक बदल घडू शकतो किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर एप्रिलनंतर व्यवसायात बदल होण्याची शक्यताही निर्माण होऊ शकते. विशेषत: मे महिन्यात असे योग तयार होतील आणि तुम्ही एखादे काम केले तर त्यातही अचानक काही अडचण येऊ शकते, त्यामुळे सावधगिरीने पुढे जा. शेअर बाजार, सट्टेबाजी, लॉटरी इत्यादी बाबींमध्ये गुंतलेले असाल तर, हा काळ तुम्हाला तोटा देईल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत वाटू शकेल. या काळात कुटुंबातील एखाद्या वृद्ध व्यक्तीला शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जीवनात मतभेद निर्माण होऊ शकतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव वाढेल. तुमचे प्रियजनही काही कारणाने तुमच्यापासून काही काळ दूर जाऊ शकतात, पण जर तुम्हाला तुमचे नाते सुरक्षित ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वत:मध्ये काही बदल करावे लागतील जेणेकरून तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यावर रागावणार नाही. या वर्षात तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर त्यासाठी आळस टाळला पाहिजे कारण तो तुमच्याकडे वारंवार येईल आणि त्यामुळे अनेक महत्त्वाच्या संधी तुमच्या हातून गमावल्या जाऊ शकतात. तुम्ही तुमचे कोणतेही कर्ज फेडू शकता.
विद्यार्थी वर्ग
विद्यार्थ्यांसाठी वर्ष खूप आव्हानात्मक असेल. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला योग जुळून येत आहे. दुसरीकडे, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल चांगले लागतील पण त्यांना नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागणार आहे. केतूमुळे वर्षाच्या मध्यात विद्यार्थ्यांची एकाग्रता बिघडू शकते. तसेच तुम्ही तुमच्या कामगिरीवर समाधानी राहणार नाही. वैद्यकीय आणि आयटी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. वर्षाच्या शेवटी, सर्व विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळेल.