राष्ट्रीय क्रीडा दिन : देशासाठी पदकं जिंकतात, त्यांना ट्रोल करणं योग्य आहे का?

मी बसलो तरी ते ट्रोल करायचे. मी उठलो, तरी ट्रोल करायचे.” भारताचा क्रिकेटर के एल राहुलनं त्याला झालेल्या ट्रोलिंगचं वर्णन अशा शब्दांत केलं आहे.“आधी मी याकडे दुर्लक्ष करायचो किंवा परिस्थिती हाताळू शकायचो. पण काही वर्षांपूर्वी ट्रोलिंग खूपच वाढलं. “आता …

राष्ट्रीय क्रीडा दिन : देशासाठी पदकं जिंकतात, त्यांना ट्रोल करणं योग्य आहे का?

“मी बसलो तरी ते ट्रोल करायचे. मी उठलो, तरी ट्रोल करायचे.” भारताचा क्रिकेटर के एल राहुलनं त्याला झालेल्या ट्रोलिंगचं वर्णन अशा शब्दांत केलं आहे.

 

“आधी मी याकडे दुर्लक्ष करायचो किंवा परिस्थिती हाताळू शकायचो. पण काही वर्षांपूर्वी ट्रोलिंग खूपच वाढलं.

 

“आता गेलं दीड वर्ष मी इन्स्टाग्रामपासून दूर झालो आहे. मी इन्स्टावर जातो, पोस्ट करतो आणि लवकरात लवकर बाहेर पडतो,” एका पॉडकास्टमध्ये बोलताना राहुलनं अलीकडेच ही माहिती दिली.

 

अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागणारा राहुल साहजिकच एकटाच खेळाडू नाही. आजवर अनेक खेळाडूंना कधी प्रत्यक्षात तर कधी सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

 

अलीकडेच ऑलिंपिकमधल्या कामगिरीनंतर काही खेळाडूंना एवढं ट्रोलिंग सहन करावं लागलं की, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अ‍ॅथलीट्स कमिशननंही त्याची दखल घेतली आहे.

 

पॅरिस ऑलिंपिकदरम्यान ऑनलाईन छळवणुकीच्या 8500 हून अधिक घटनांची नोंद IOCच्या अ‍ॅथलीट्स कमिशननं घेतली आहे.

 

एरवी विजयानंतर आपल्या लाडक्या खेळाडूंना डोक्यावर उचलून धरणारे चाहते पराभवानंतर त्यांच्यावर जहरी टीका का करतात? असा प्रश्नही त्यामुळे पुन्हा पडतो.

 

विखारी टीका आणि ट्रोलिंग

पॅरिस ऑलिंपिकमध्ये रेसवॉकिंग स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करमारी प्रियांका गोस्वामी हिला गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला. प्रियांका या शर्यतीत 45 जणांमध्ये 41 वी आली.

 

काही दिवस आधीच तिनं ऑलिंपिक व्हिलेजमध्ये प्रचंड उकडत असताना एसी मिळाल्यावर एक रील तयार केलं होतं.

 

त्याला अनुसरून सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर एका यूजरनं लिहिलं, “मला वाटतं तिनं रील बनवण्यापेक्षा खेळावर लक्ष द्यावं, करदात्यांच्या पैशावर ती सराव करते आहे.”

 

ही पोस्ट व्हायरल झाली आणि प्रियांकाला लोक ट्रोल करू लागले. काहीजण तिच्या बचावासाठीही उतरले आणि भारतातल्या एवढ्या खेळाडूंमधून ऑलिंपिक गाठणारी ती एकच आहे, हा मुद्दा त्यांनी मांडला.

 

घडल्या प्रकारावर प्रियांकाची प्रतिक्रिया आलेली नाही, पण तिनं ते रीलच डिलिट केलं.

 

भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारीलाही अशाच ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

 

आपल्या चौथ्या ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यात दीपिकाला पुन्हा अपयश आल्यानं लोक तिच्यावर वाटेल त्या शब्दांत लिहित होते, पण दीपिकानं वर्ल्ड कपमध्ये मिळवलेल्या 35 पदकांची माहितीही त्यातल्या अनेकांना नसावी.

 

इथे एक लक्षात घ्यायला हवं. खेळाडूंच्या अपयशाचं सखोल विश्लेषण करणं, त्यांच्या खेळातील कमतरतांवर टीका करणं वेगळं आणि त्यांच्या हेतूवरच शंका घेत वैयक्तिक गोष्टींवर तोंडाला येईल ते लिहिणं, कुणाचा पाणउतारा करणं, शा‍ब्दिक हल्ला, शिव्या देणं हे मात्र योग्य नसतं.

 

अपयश आल्यावर खेळाडूंवर टीका याआधीही होत असे.

 

हॉकीपटू मीर रंजन नेगी यांना तर देशद्रोही ठरवण्यात आलं होतं. पण पुढे त्यांच्या कहाणीवर आधारीत चक दे इंडिया हा चित्रपट चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरला होता.

 

यापूर्वी खेळाडूंवर चाहते टीका करायचे ते मैदानातून बाहेर पडताना किंवा क्वचित खेळाडूंच्या निवासाबाहेर एखाद्या निदर्शनातून.

 

सोशल मीडियाच्या युगात मात्र कुणीही, जगभरातून कुठूनही आणि कधीही कुठल्याही गोष्टीवर कुणालाही आणि कसंही ट्रोल करू शकतं.

 

हे फक्त भारतातच होतं असं नाही आणि फक्त पराभूत खेळाडूंनाच त्याचा सामना करावा लागतो, असंही नाही.

 

जगभरातली समस्या

पॅरिस ऑलिंपिकमध्येमध्ये ब्रेकिंग (ब्रेकडान्सिंग) या क्रीडाप्रकारात ऑस्ट्रेलियाची बी-गर्ल (ब्रेकडान्स करणाऱ्या खेळाडूंना बी-गर्ल्स किंवा बी बॉईज म्हणून ओळखतात) रेचेल गन अर्था ‘रेगन’ हिच्या सादरीकरणाची खिल्ली उडवण्यात आली.

 

तर इमान खलिफ महिलांच्या गटात बॉक्सिंग करण्यास योग्य ठरते की नाही, यावरून ट्रोलिंग सुरू झालं, तेव्हा तिच्या देशातले म्हणजे अल्जेरियातले अनेकजण तिच्या बाजूनं उभे राहिले.

 

पण सगळ्याच खेळाडूंना असा पाठिंबा मिळत नाही.

 

ख्रिस्टा देगुचीनं ज्युदोमध्ये कॅनडाला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. पण फायनलमध्ये ज्या पद्धतीनं पेनल्टीच्या आधारे तिला विजयी ठरवलं गेलं, त्यावरून अनेकांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं.

 

जपानमध्ये जन्मलेल्या ख्रिस्टानं त्यावर लिहिलेली पोस्ट बोलकी ठरली. “तुम्ही माझ्याविषयी नकारात्मक मत ठेवू नका असं मी सांगणार नाही. पण लोकांना दुखावण्यासाठी तुम्ही शब्दांना शस्त्रासारखं का वापरता आहात?”

 

ती पुढे म्हणते, “केवळ हाताच्या बोटावर मोजता येईल एवढे खेळाडू फायनलमध्ये पोहोचतात आणि त्यातही थोडेच पदक जिंकतात. भीती आणि चिंतेवर मात करून ते जागतिक पातळीवर खेळत असतात. तुमचं मत पोस्ट करण्यापूर्वी एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहा.”

 

सोशल मीडियावर टीकेचं विखारी टिप्पण्यांमध्ये लगेच रुपांतर होतं. त्यात वर्णद्वेश, लिंगभेद, होमोफोबिया अशा गोष्टींचीही किनार असते. अनेकदा खेळाडूंना अथवा त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जातात. याचं प्रमाण अलीकडे वाढत चाललं आहे.

 

खेळाडू महिला असतील, तर ट्रोलिंग होण्याची शक्यता जास्त आहे, असं बीबीसीनं युकेमध्ये 2020 साली केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं होतं.

 

विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांच्या पत्नीच नाही तर मुलींनाही ट्रोल्सनी लक्ष्य केलं होतं. त्याविरोधात पोलिसांत तक्रारीही दाखल करण्यात आल्या.

 

ऑलिंपिकमध्ये स्टीपलचेसची फायनल गाठून इतिहास घडवणारा धावपटू अविनाश साबळेनं खेळाडूंना सहन कराव्या लागणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं आहे.

 

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “खेळाडूंच्या विरोधात सोशल मीडियावरचे काही मेसेजेस पाहून मला वाईट वाटलं. हे आपल्या देशातले सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि त्यांच्यावर अशी टीका होते आहे. माझ्या शेजारी बसलेल्या खेळाडूंना अशा प्रतिक्रिया वाचून येणारं नैराश्य मी पाहिलं आहे.

 

“काहींना वाटतं की आपले खेळाडू शेवटच्या काहीजणांमध्ये आले आहेत. पण आम्ही इथे पोहोचून जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंचा सामना करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतो.”

 

सरावासाठी खेळाडूंना परदेशात पाठवण्यावरूनही लोकांनी ट्रोलिंग केलं आहे. त्यांना अविनाश सांगतो, “परदेशात राहून सराव करणं म्हणजे मजा असं नसतं. काहींना वाटतं की आम्ही सरकारच्या पैशानं परदेशात भटकतो आहोत. पण तसं नसतं.

 

“चार पाच महिने कुटुंबापासून, मित्रांपासून दूर राहायचं, रात्री उशीरापर्यंत सराव करायचा आणि मग घरी येऊन स्वतःचं जेवण तयार करायचं हे सगळं सोपं नसतं” असं अविनाशनं नमूद केलं आहे.

 

टीका आणि ट्रोलिंग कधीकधी सकारात्मक असू शकतं. चांगली कामगिरी होते, तेव्हा खेळाडूंना चाहत्यांचं प्रेमही भरभरून मिळतं. त्यामुळेच काही खेळाडू खराब कामगिरी होते तेव्हा टीका मनाला लावून घेत नाहीत आणि आपल्या खेळावर लक्ष देतात.

 

काही खेळाडू आपल्या कामगिरीतून टीकेला उत्तर देतात. पण काहींच्या मनावर अशा ट्रोलिंगचा परिणाम होऊ शकतो.

 

नीरज चोप्रासारखे काही खेळाडू महत्त्वाच्या स्पर्धेदरम्यान सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतात.

 

अ‍ॅथलीट्स कमिशनची भूमिका

ट्रोलिंगचा एखाद्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतो, याविषयी आजवर अनेकदा लिहिलं, बोललं गेलं आहे. त्यामुळेच अलीकडे खेळांच्या जगात ट्रोल्सचा बिमोड करण्याचे उपायही योजले जात आहेत.

 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अथलीट्स कमिशननं यावेळी ट्रोलिंगवर कडक भूमिका घेतली आहे. खेळाडूंना ज्या प्रमाणात विशेषतः ऑनलाईन टिप्पण्या आणि छळाचा सामना करावा लागला आहे, ते फारच त्रासदायक आणि गंभीर असल्याचं अ‍ॅथलीट्स कमिशननं म्हटलं आहे.

 

18 ऑगस्टला जारी केलेल्या एका पत्रकात अ‍ॅथलीट्स कमिशननं म्हटलं आहे की,

 

“यावेळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक स्पर्धांदरम्यान खेळाडूंना उद्देशून केलेल्या ऑनलाईन छळ आणि शिवीगाळ यांचा माग काढण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याला आम्ही पाठिंबा दिला, याचं समाधान वाटतं. पण यातून ऑलिंपिकदरम्यान अशा 8500 पोस्टची ओळख पटवून त्यावर कारवाई करण्यात आली आहे.

 

“खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कुठल्याही पद्धतीचा असा हल्ला किंवा छळ यांचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत. मग ते कुठल्या एखाद्या निर्णयाविरोधातलं मत का असेना. ज्यांना याचा त्रास झाला, अशा खेळाडू आणि निकटवर्तीयांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे.

 

“खेळाडूंनी जी मजल मारली आहे त्यासाठी त्यांचा आदर ठेवला जावा.”

 

ट्रोल्सचा शोध लावणं, त्यांच्यावर कारवाई करणं आणि त्यासाठी एआय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणं अशी पावलं जगभरातल्या काही संघटनांनी उचललेली दिसतात.

 

इंग्लंडची द प्रीमियर लीग ही फुटबॉल जगातली मोठी प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. त्यात खेळणाऱ्या फुटबॉलपटूंना ट्रोलिंगचा सामना करावा लागणं नवं नाही.

 

त्यावर उपाय म्हणून अलीकडेच एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे, जी विखारी ट्रोलिंग करणाऱ्या आणि धमक्या देणाऱ्या पोस्टचा शोध लावते. अशा पोस्ट डिलिट करायला लावणं, पोस्ट कर्त्यांचा शोध घेणं आणि कायद्याचा भंग करणाऱ्या पोस्ट लिहिणाऱ्यांवर कारवाईसाठी अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते.

 

पण लोकांमध्ये स्वतः याविषयी जागरुकता वाढत नाही, तोवर बदल होणार नाही, असं तज्ज्ञांना वाटतं.

 

तज्ज्ञांचं मत

मुंबईतले मनोविकारतज्ज्ञ डॉ. अभिजीत देशपांडे सांगतात, “आपल्याकडे क्रीडासंस्कृती नाही. पण आपल्या आवडत्या खेळाडूनं दरवेळी जिंकायलाच पाहिजे अशी अपेक्षा मात्र आहे.

 

“एखादी टीम किंवा खेळाडू चांगला खेळला नाही, तर तो विकला गेला आहे, असा समज केला जातो. काही प्रसंग असे घडलेही आहेत. पण त्यामुळे सगळ्यांकडेच संशयानं पाहिलं जातं.”

 

सोशल मीडियावर ओळख लपून राहते, त्यामुळे ट्रोलिंग करताना भान राखलं जात नाही.

 

“पूर्वी जाहीर टीका करणं हे प्रामुख्यानं पत्रकारांच्या हातात होतं. ते खेळाविषयी वर्तमानपत्रातून, रेडियो किंवा टीव्हीवरून लिहायचे. त्यांच्या टीकेवर अंकुश असायचा, नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा असायची. पण सोशल मीडियाचं तसं नाही.”

 

अनेक खेळाडूही स्वतःला किती फॉलोअर्स आहेत याला महत्त्व देतात. त्यामुळे सोशल मीडियापासून पूर्णतः दूर राहू शकत नाहीत, असं डॉ. देशपांडे नमूद करतात.

 

समाजातल्या ध्रुवीकरणाचं प्रतिबिंब खेळाडू आणि चाहत्यांमधल्या नात्यातही पडतं, असं त्यांना वाटतं.

 

“एखाद्या प्रथितयश व्यक्तीनं मांडलेलं मत, हे सध्याच्या काळात प्रस्थापित राजकीय विचारांच्या विरोधात आहे की बाजूनं आहे यावरून ते बरोबर की चूक हे आधीच ठरवलं जातं.

 

“दुसऱ्यावर टीका करणं हे चुकीचं नाही. पण ती टीका करण्यासाठी जे तारतम्य बाळगायला हवं, जे दिसत नाही. हे म्हणजे माकडाच्या हाती कोलित दिल्यासारखं आहे.

 

“एकूणच समाजातली अगतिकता – फ्रस्ट्रेशन वाढतंय आणि त्याचं हे प्रतीक आहे. एकमेकांसोबत वागायचं कसं, याचा आपल्याला विसर पडत चालला आहे.”

Published By- Dhanashri Naik