सायबर गुन्हेगारांचे कारनामे सुरूच

सायबर गुन्हेगारांचे कारनामे सुरूच

मुलाला अडकवण्याचे सांगून वडिलांकडून वसुलीचा प्रयत्न :
प्रतिनिधी/ बेळगाव
डिजिटल अरेस्टचे प्रकार सुरूच आहेत. सायबर गुन्हेगारांनी आता सावजांना ठकवण्यासाठीच्या पद्धतीत थोडासा बदल केला आहे. ‘तुमचा मुलगा बलात्कार प्रकरणात रंगेहाथ सापडला आहे. आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही. त्याला वाचवायचे असेल तर आम्ही सांगतो तेवढी रक्कम द्या’ असे सांगत एका सामान्य नागरिकाला धमकावून ठकवण्याचा प्रयत्न झाला आहे.
यासंबंधी अन्नपूर्णावाडी येथील इमामहसन आप्पालाल हलकर्णी यांनी शनिवारी सायंकाळी शहर सीईएन पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. सायबर गुन्हेगारांच्या धमकीने ते पूर्णपणे घाबरून गेले होते. एकुलत्या एक मुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे त्यांनी गुन्हेगारांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची तयारीही दर्शविली होती.
डीपीवर पोलीस अधिकाऱ्याचा फोटो
शनिवार दि. 22 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास इमामहसन हलकर्णी यांच्या मोबाईलवर +48459266663 या क्रमांकावरून त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक व्हॉईस कॉल आला. ‘तुमचा मुलगा बलात्कार प्रकरणात रंगेहाथ सापडला आहे. त्याला कारागृहात पाठवणार आहे. आम्ही त्याचे जीवनच बरबाद करणार आहे’ असे धमकावण्यात आले. ज्या क्रमांकावरून इमामहसन यांना कॉल आला, त्या क्रमांकाच्या डीपीवर एका पोलीस अधिकाऱ्याचा फोटो आहे.
मुलाला मारहाण करत असल्याची बतावणी
आपल्या मुलाच्या नावाचा उल्लेख करून सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या धमकीमुळे इमामहसन पार घाबरून गेले. त्यांनी ‘आमचा मुलगा तसा नाही’ असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘आम्ही तुमच्या मुलाला मारहाण करीत आहोत’ असे पलीकडच्या व्यक्तीने सांगितले. त्याचवेळी आरडाओरडा करण्याचा आवाजही आला. त्यामुळे मुलगा संकटात सापडला आहे, असे त्यांना वाटले.
‘फोन पे’ साठी तीन वेगवेगळे मोबाईल क्रमांक
‘ही गोष्ट कोणालाही सांगायची नसेल तर आमच्या खात्यावर त्वरित एक लाख रुपये जमा करा’ असे गुन्हेगारांनी सांगितले. ‘माझ्याजवळ तेवढे पैसे नाहीत. केवळ दहा हजार रुपये खात्यावर आहेत’ असे इमामहसन यांनी सांगितले. त्यावर ‘पैसे दिले नाहीत तर तुमच्या मुलाला संपवतो’ असे धमकावण्यात आले. शेवटी फोन पे करण्यासाठी त्यांना तीन वेगवेगळे मोबाईल क्रमांक देण्यात आले.
‘पैसे दिले नाहीत तर तुमच्या मुलाला संपवतो’
इमामहसन यांनी त्यांनी दिलेल्या नंबरवर दहा हजार रुपये पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे गुन्हेगारांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. ही प्रक्रिया सुरू असतानाच इमामहसन यांच्या पत्नीने कामावर गेलेल्या आपल्या मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याने फोन उचलला, ‘घराजवळच आहे, घरी येतोय’, असे मुलाने सांगितले. ही गोष्ट त्यांनी इमामहसन यांना सांगितल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार असल्याचे उघडकीस आले. सायबर गुन्हेगारांच्या प्रतापाने एका सामान्य कुटुंबीय हबकून गेले आहे.