जगन्नाथ यात्रेतही चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था / नवी दिल्ली ओडिशा राज्याच्या पुरी जिल्ह्यातील जगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरीची घटना घडली असून दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच साधारणत: 130 भाविक जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरीची घटना यात्रेत दोन स्थानी घडली असून दोन्ही घटनांमध्ये प्रत्येकी एका भाविकाने प्राण गमाविला, अशी माहिती देण्यात आली. या दोन घटनांपैकी एक घटना शनिवारी घडली होती, असे स्पष्ट करण्यात […]

जगन्नाथ यात्रेतही चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ओडिशा राज्याच्या पुरी जिल्ह्यातील जगन्नाथ यात्रेत चेंगराचेंगरीची घटना घडली असून दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच साधारणत: 130 भाविक जखमी झाले आहेत. चेंगराचेंगरीची घटना यात्रेत दोन स्थानी घडली असून दोन्ही घटनांमध्ये प्रत्येकी एका भाविकाने प्राण गमाविला, अशी माहिती देण्यात आली. या दोन घटनांपैकी एक घटना शनिवारी घडली होती, असे स्पष्ट करण्यात आले.
यंदा ही यात्रा शनिवार आणि रविवार असे दोन दिवस होती. रविवारी यात्रेची सांगता झाली. 10 लाखांहून अधिक भाविकांनी या यात्रेत सहभाग घेतला होता. यात्रा पारंपरिक उत्साहात पार पडली आहे. मात्र या दोन चेंगराचेंगरीच्या घटनांचे गालबोल या यात्रेला लागले आहे. दोन भाविकांपैकी एकाचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाला. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार होत आहेत. अनेक जखमींना प्रथमोपचार करुन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.
अनेक छावण्या
प्रत्येकवर्षी या यात्रेत लक्षावधी श्रद्धाळू सहभागी होतात. यंदा दोन दिवस यात्रा असल्याने भाविकांची संख्याही तुलनेत अधिक होती. भाविकांच्या साहाय्यार्थ ओडिशा सरकारने यात्रामार्गावर अनेक साहाय्यता छावण्या स्थापन केल्या होत्या. तेथे भाविकांसाठी विश्रांती घेण्याची सोय करण्यात आली होती. तसेच अन्नपाणी, औषधे आणि प्रथमोपचार यांचीही सुविधा होती. साधारणत: 600 भाविकांनी या सुविधांचा लाभ घेतला, अशी माहिती पुरी जिल्ह्याच्या प्रशासनाने दिली