मणिपूरमधील स्थितीत सुधारणाच नाही!

मणिपूरमधील स्थितीत सुधारणाच नाही!

राहुल गांधी यांचा हल्लाबोल : हिंसाचार पीडितांची घेतली भेट
► वृत्तसंस्था/ इंफाळ (मणिपूर)
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी मणिपूर आणि आसामचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी मणिपूरमधील मदत शिबिरांना भेट देत हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांशी चर्चा केली. तसेच संध्याकाळी मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांची भेट घेत त्यांच्यासोबतही राज्यातील स्थितीसह आपल्या अपेक्षांबाबत सल्लामसलत केली. यानंतर राहुल गांधी संध्याकाळी 6.15 वाजता मणिपूर काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना राज्यातील परिस्थितीत आम्ही सुधारणेची आशा करत होतो, पण दुर्दैवाने काही सुधारणा झाली नाही, असा हल्लाबोल चढवला.
हिंसाचारग्रस्त राज्याचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी सोमवारी दुपारी 12 वाजता जिरीबाम येथे पोहोचले होते. येथील उच्च माध्यमिक विद्यालयात उभारण्यात आलेल्या मदत शिबिरात उपस्थित नागरिकांची भेट घेतली. तत्पूर्वी ते आसाममधील सिलचरला सकाळी दहाच्या आधी पोहोचले. त्यांनी थलाई इन युथ केअर सेंटर, फुलरताल येथील मदत शिबिराला भेट दिली. हा भाग हिंसाचारग्रस्त मणिपूरला लागून आहे.
मणिपूरच्या चुराचंदपूर येथील मंडप तुइबोंग मदत छावणीमध्ये दुपारी 3 वाजता राहुल यांनी मणिपूर हिंसाचारातील पीडितांची भेट घेतली. त्यानंतर 4.30 वाजता ते मोइरांग येथील फुबाला पॅम्पमध्ये पोहोचले. येथून निघाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता राजभवनात राज्यपालांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असून कित्येक लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. गेल्यावषी 3 मे रोजी हिंसाचार उसळल्यापासून आतापर्यंत बऱ्याचवेळा हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे.
दौऱ्यापूर्वीही जिरीबाममध्ये गोळीबार
राहुल गांधी यांचे मणिपूरमध्ये आगमन होण्यापूर्वी रात्री साडेतीन वाजता जिरीबामच्या फितोल गावात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या व्हॅनवर गोळीबार केला. यामध्ये अग्निशमन दलालाही लक्ष्य करण्यात आले. सुरक्षा दलांनी शोध घेतल्यानंतर 2 जणांना अटक केली आहे. पहाटे 3.30 वाजता अज्ञातांनी परिसरात गोळीबार केल्याची माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली. मैतेई समुदायाचे प्राबल्य असलेल्या भागात हा गोळीबार झाला. गोळीबाराची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सकाळी सात वाजेपर्यंत सुरक्षा कर्मचारी आणि बंदूकधाऱ्यांमध्ये गोळीबार सुरू होता. खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.