गौंडवाड गावच्या प्रवेशद्वाराचा रस्ता चिखलमय

गौंडवाड गावच्या प्रवेशद्वाराचा रस्ता चिखलमय

ग्रा. पं.-संबंधित अधिकारी वर्गाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक 
गौंडवाड गावच्या प्रवेशद्वाराचा रस्ता खाचखळगे व चिखलमय झाल्यामुळे नागरिकांना या चिखलमय रस्त्यावरूनच गावामध्ये प्रवेश करावा लागत आहे. प्रवेशद्वाराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासंदर्भात ग्रा. पं. लोकप्रतिनिधी व संबंधीत अधिकारी वर्गाला कळवूनसुद्धा अजून रस्त्याच्या डांबरीकरणाचा मुहूर्त कधी सापडणार, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. तेव्हा संबंधीत अधिकारीवर्गाने प्रवेशद्वार रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
गौंडवाड गाव कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत क्षेत्रात येते. विधानसभा मतदार संघ यमकनमर्डी तर लोकसभा चिकोडी मतदार संघात येते. यामुळे सदर गावच्या विकासासाठी ग्राम पंचायत, विधानसभा व लोकसभा मतदार संघातून निधी मंजूर झाल्यास या गावचे नंदनवन होईल, असेही विचार नागरिकांतून व्यक्त होत आहेत. बेळगावपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावाकडे एक प्रगतशील शेतीप्रधान गाव म्हणून पाहिले जाते. गावातील भाजीपाला कोल्हापूर, सांगली, मुंबई, गोवा आदी ठिकाणी पाठविला जातो. अशा शेतीप्रधान गावचे प्रवेशद्वार खड्डेमय व चिखलमय बनले आहे.
लक्ष्मी मंदिर ते शिवाराकडील रस्ताही चिखलमय 
लक्ष्मी मंदिरपासून शिवाराकडे जाणारा रस्ताही चिखलमय बनला आहे. सदर रस्त्याचेही डांबरीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेतकरी वर्गाला शेतीकडे जाणे सुलभ होणार आहे. तेव्हा संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष घालून प्रवेशद्वार रस्ता व शेतीकडे जाणारा रस्त्यांचे डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.