महासंचालकांना गुंडाळावा लागणार गाशा

आसगाव येथील घर पाडल्याचे प्रकरण, ओमवीर सिंग यांना रूजू होण्याचे फर्मान प्रतिनिधी/ पणजी आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडण्यासाठी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी हणजूण पोलिसांवर दबाव आणून अप्रत्यक्षपणे घर पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा प्रकार जसपाल सिंग यांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे लवकरच जसपाल सिंग यांना गोव्यातून लवकरच गाशा गुंडाळावा लागणार आहे. आसगाव […]

महासंचालकांना गुंडाळावा लागणार गाशा

आसगाव येथील घर पाडल्याचे प्रकरण, ओमवीर सिंग यांना रूजू होण्याचे फर्मान
प्रतिनिधी/ पणजी
आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडण्यासाठी पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी हणजूण पोलिसांवर दबाव आणून अप्रत्यक्षपणे घर पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा प्रकार जसपाल सिंग यांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे लवकरच जसपाल सिंग यांना गोव्यातून लवकरच गाशा गुंडाळावा लागणार आहे.
आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबाचे घर पाडल्याप्रकरणी टीकेचे लक्ष्य बनलेले पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांची बदली करण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग हे विदेशात रजेवर गेले आहेत. त्यांना तत्काळ सेवेत रूजू होण्याचे फर्मान जारी झाले आहे. तसेच हणजूण पोलीस स्थानकाचा ताबा कळंगुटचे निरीक्षक परेश नाईक यांच्याकडे देण्यात आला आहे.
आसगाव प्रकरणावरून सरकारी अधिकारी हे वेगवेगळ्या प्रकारात कसे गुंतले आहेत याचा पोलखोलच झाल्यामुळे राज्य सरकारचीही बरीच नाचक्की झाली आहे. आसगाव प्रकरणामुळे एका निरीक्षकासह, एक उपनिरीक्षक आणि एका कॉन्स्टेबलला निलंबित केल्यानंतर हणजूण पोलिसांनी पोलीस महासंचालकांनी आगरवाडेकर यांचे घर पाडण्यास दबाव आणल्याचा खळबळजनक गाप्यस्फोट केला आणि अडचणीत आलेले महासंचालक जसपाल सिंग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
जसपाल सिंग यांचा या घटनेशी असलेल्या संबंधामुळे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन
तोंडावर असताना या प्रकरणाचा विरोधक विधानसभेत मुख्य मुद्दा बनवून  सरकारवर हल्लाबोल करणार हे निश्चित असल्यामुळे या प्रकरणात कोणतीही जोखीम न घेण्याचा सरकारचाही पवित्रा दिसत आहे.
कारमालक अशपाक शेखला न्यायालयीन कोठडी
आसगाव  येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडण्यासाठी वापरण्यात आलेल्या कारचा मालक आणि संशयित आरोपी अशपाक शेख याला गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी म्हापसा प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, त्याला  14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरा संशयित सहआरोपी आणि इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे खटल्याची पुढील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब ठेवण्यात आली आहे.