रान रस्त्यावर टाकत असल्याने दलदल

रान रस्त्यावर टाकत असल्याने दलदल

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास : ग्रा. पं.ने कारवाई करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
उचगाव परिसरातील अनेक गावातून शेतवडीत ये-जा करण्यासाठी शेतवडीतून मार्ग काढण्यात आलेले आहेत. सदर मार्गावरून शेतकरी रोज ये-जा करत असतात. मात्र याच रस्त्यावर अनेक शेतकरी शेतातील काढलेले रान रस्त्यावरच टाकत असल्याने दलदल निर्माण होऊन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतवडीतील शेतकऱ्यांनी अशाप्रकारचे रान न टाकता ते आपल्या शेतातच एका ठिकाणी जमा करावे, अशी मागणी या भागातील अनेक शेतकऱ्यांनीच केलेली आहे.
उचगाव परिसरातील सुळगा, गोजगे, मण्णूर, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते, उचगाव, कोनेवाडी, बेनकनहळ्ळी, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची अशा या सर्व गावांमधून शेतवडीत ये-जा करण्यासाठी मार्ग काढण्यात आलेले आहेत. उन्हाळ्यात सदर मार्गावरून ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या ही सर्व वाहने ये-जा करत असतात. मात्र पावसाळ्यात चिखल असल्याने ही वाहने या रस्त्यावरून येणे जाणे बंद असते. मात्र याच मार्गाने सर्व शेतकरी आपापल्या शेतवडीत जाण्यासाठी या मार्गाचा उपयोग करतात.
एका गावातील शेतकरी दुसऱ्या गावाच्या शेतीपर्यंत सातत्याने येजा करावी लागते.  शेतातील रान-गवत, टाकाऊ गवताचा भाग या रस्त्याच्या मधोमध टाकण्यात येतो. सदर गवत कुजून दलदल निर्माण होत आहे. यासाठी या संपूर्ण भागातील  शेतकऱ्यांनी अशाप्रकारचे टाकाऊ गवत रस्त्यावर न टाकता स्वत:च्याच शेतामध्ये एका बाजूला ठेवावा आणि तो नंतर इतरत्र त्याची विल्हेवाट लावावी. अन्यथा रस्त्यावर रान टाकणाऱ्यांवर ग्रा. पं.ने कारवाई करण्याची मागणी होत आहे.