आरजीपीचे रूबर्ट, मनोज यांचे अर्ज सादर

गोवेकरांचे प्रश्न संसदेत मांडणार : काँग्रेस, भाजपचे सरकार अपयशी मडगाव : लोकसभा निवडणुकीच्या अर्ज सादर करण्याच्या सातव्या दिवशी काल गुरुवारी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मनोज परब यांनी उमेदवारी अर्ज उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी स्नेहा गिते यांच्याकडे सादर केला. यावेळी मनोज परब यांच्यासमवेत आमदार विरेश बोरकर, पक्षाचे पदाधिकारी अजय […]

आरजीपीचे रूबर्ट, मनोज यांचे अर्ज सादर

गोवेकरांचे प्रश्न संसदेत मांडणार : काँग्रेस, भाजपचे सरकार अपयशी
मडगाव : लोकसभा निवडणुकीच्या अर्ज सादर करण्याच्या सातव्या दिवशी काल गुरुवारी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मनोज परब यांनी उमेदवारी अर्ज उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकारी स्नेहा गिते यांच्याकडे सादर केला. यावेळी मनोज परब यांच्यासमवेत आमदार विरेश बोरकर, पक्षाचे पदाधिकारी अजय खोलकर, विश्वेश नाईक, महेश शिरोडकर, आदी उपस्थित होते. दक्षिण गोव्यासाठी उमेदवार रूबर्ट परेरा यांनी आपला अर्ज दक्षिण गोव्याचे निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू यांच्याकडे दाखल केला. गोमंतकीयांचा आवाज संसदेत पोहोचावा या उद्देशाने राज्यातील लोकसभा निवडणुका लढण्याचा निर्णय आरजीपीकडून घेण्यात आलेला आहे. गोव्याच्या समस्या संसदेत मांडण्यात राष्ट्रीय पक्ष अपयशी ठरलेले आहेत. एसटी आरक्षण, म्हादई, कोळसा वाहतूक, बेरोजगारी, जमिनी राखण्याचा प्रश्न जैसे थे स्थितीत आहेत. इतकी वर्षे भाजप व काँग्रेस यांनी देशात सत्ता स्थापन करूनही त्याचा गोव्याला फारसा उपयोग झालेला नाही. गोव्यातील युवकांना आजही नोकऱ्यांसाठी झगडावे लागत आहेत. युवक व लोकांना त्रासातून मुक्त करण्यासाठीच आरजीपी लोकसभा निवडणूक लढवत असल्याचेही मनोज परब यांनी अर्ज सादर केल्यानंतर बोलताना सांगितले. आमदार विरेश बोरकर म्हणाले, इंडिया आघाडीला चर्चेला येण्याचे आवाहन आरजीपीने केले होते. तरीही काँग्रेसने यासाठी पुढाकार न घेतल्याने त्यांचे खरे रूप कळते. सरकारी जमिनी, कोमुनिदादच्या जमिनी हडप झालेल्या आहेत. मात्र, कॉंग्रेस व त्याच्यासोबतच्या घटकपक्षांना गोव्याचे काहीच पडलेले नाही, असा आरोपही विरेश बोरकर यांनी केला. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आरजीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.
दक्षिण गोव्यात परेरांचा अर्ज
आरजीपीचे दक्षिण गोवा उमेदवार रूबर्ट परेरा यांनीही काल गुऊवारी उमेदवारी अर्ज दक्षिण गोव्याचे निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू यांच्याकडे दाखल केला. यावेळी पक्षाचे आमदार विरेश बोरकर उपस्थित होते. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उमेदवार रूबर्ट परेरा म्हणाले की, डबल इंजिनचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. यापूर्वी लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदाराने गोव्यातील समस्या संसदेत मांडल्या नाहीत. त्यामुळे गोव्यावर अन्याय होत राहिला. आज स्थानिक पक्षाचे खासदार निवडून येणे ही काळाची गरज बनली आहे. आपण खासदार म्हणून निवडून आल्यास संसदेत म्हादईच्या प्रश्नाबरोबरच पोगो बिलावर देखील चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गोव्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यापर्यंत मजल गेली आहे. गोव्यात चोऱ्या, बलात्कार या सारखे प्रकार सातत्याने घडत आहेत आणि अशा गोष्टींकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे रूबर्ट परेरा म्हणाले.