उपद्रवी कानडी संघटनांना आवर घाला
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची पोलीस आयुक्तांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
नेहमीच भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या कानडी संघटनांकडून मागील काही दिवसात बेळगाव शहरात व्यावसायिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रकार सुरू आहे. आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी फलकांचे नुकसान केले जात आहे. कोणत्याही दुकानात घुसून व्यवस्थापक, मालकांना कानडी फलकांसाठी धमकी दिली जात आहे. त्यामुळे आशा उपद्रवी कानडी संघटनांच्या कार्यकर्त्यांना वेळीच रोखा, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने मंगळवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
आस्थापनांवर 60 टक्के कन्नड तर 40 टक्के इतर भाषेत फलक लावण्याचा कायदा कर्नाटक सरकारने केला आहे. तरीदेखील आस्थापनांवर मराठी लिहिलेले असेल तर दुकानांमध्ये घुसून फलकांना रंग फासला जात आहे. विशेष म्हणजे पोलीस संरक्षणात हे प्रकार केले जात असल्याने व्यावसायिक वैतागले आहेत. फलक न बदलल्यास बघून घेण्याची दादागिरी व्यावसायिकांवर केली जात आहे. या अशा उपद्रवी संघटनांमुळे बेळगावमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कायदा हातात घेऊन व्यापाऱ्यांवर अरेरावी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मध्यवर्ती म. ए. समितीने केली. 2022 साली केलेल्या कायद्यानुसार कन्नड भाषेचा प्रचार, प्रसार करण्यास सांगितले आहे. परंतु कोठेही असलेली भाषा पुसा असा उल्लेख करण्यात आलेला नाही. बेळगाव, खानापूर, निपाणी, अथणी तालुक्यात मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या भाषिक अधिकारांची पायमल्ली होणार नाही याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने घ्यावी, असे पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, रणजीत चव्हाण-पाटील, तालुका म. ए. समितीचे अॅड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, अनिल पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, रणजीत हावळाण्णाचे, दत्ता उघाडे, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सचिन केळवेकर, किरण हुद्दार, बी. डी. मोहनगेकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी उपद्रवी कानडी संघटनांना आवर घाला
उपद्रवी कानडी संघटनांना आवर घाला
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची पोलीस आयुक्तांकडे मागणी प्रतिनिधी/ बेळगाव नेहमीच भाषिक तेढ निर्माण करणाऱ्या कानडी संघटनांकडून मागील काही दिवसात बेळगाव शहरात व्यावसायिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रकार सुरू आहे. आस्थापनांवरील मराठी व इंग्रजी फलकांचे नुकसान केले जात आहे. कोणत्याही दुकानात घुसून व्यवस्थापक, मालकांना कानडी फलकांसाठी धमकी दिली जात आहे. त्यामुळे आशा उपद्रवी कानडी संघटनांच्या कार्यकर्त्यांना वेळीच […]
