स्पोर्ट्स mania
मराठमोळी जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुख
विश्वनाथन आनंदनंतर प्रथमच आपले बुद्धिबळपटू कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात बुद्धिबळ जगतावर वर्चस्व गाजवू लागलेत…यात एक नवीन नाव जोडलं गेलंय ते मराठमोळ्या दिव्या देशमुखचं…‘भारतीय बुद्धिबळातील सध्याच्या ‘गोल्डन जनरेशन’चा भाग बनणं खूप छान वाटतंय’ असं म्हणणाऱ्या दिव्यानं ‘फिडे’ची 20 वर्षांखालील मुलींची जागतिक स्पर्धा जिंकून आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविलीय…
सध्या भारताची बुद्धिबळातील नवी फळी जग विलक्षण गाजवत सुटलीय…डी. गुकेशनं चक्क ‘कँडिडेट्स स्पर्धा’ जिंकून विश्वविजेता ठरविण्यासाठी चीनच्या डिंग लिरेनबरोबर होणार असलेल्या लढतीतील आव्हानवीराची खुर्ची पटकावलीय…आर. प्रज्ञानंद विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत थडकून त्यानं अव्वल मॅग्नस कार्लसनला चांगली टक्कर दिली होती…अर्जुन एरियागायसीनं नुकतीच आर्मेनियातील स्पर्धा जिंकून जागतिक ‘लाईव्ह रेटिंग’मध्ये पार चौथ्या स्थानापर्यंत झेप घेतलीय…याशिवाय प्रज्ञानंदची बहीण आर. वैशाली देखील मोठी भरारी घेण्याची क्षमता वेळोवेळी दाखवून देऊ लागलीय…या यादीत आता आणखी एक भर पडलीय ती नागपुरातील मराठमोळ्या दिव्या देशमुखची…
प्रतिभावान उगवती भारतीय बुद्धिबळपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिव्यानं नुकताच बल्गेरियाच्या बेलोस्लाव्हा क्रास्तेव्हाचा पराभव करून गुजरातमधील गांधीनगर इथं झालेल्या जागतिक कनिष्ठ मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. हा सामना 57 चाली अन् साडेपाच तास चालला…‘इंटरनॅशनल मास्टर असलेल्या या तरुणीनं दुसऱ्या स्थानावर असलेल्या आर्मेनियाच्या मरियमवर अर्ध्या गुणांची आघाडी मिळविताना 11 पैकी 10 गुण खिशात घातले. तिनं सहाव्या फेरीनंतर अव्वल स्थान पटकावलं अन् मग त्यानंतर मागं वळून पाहिलं नाही, प्रतिस्पर्ध्यांना कसलाही वाव दिला नाही…
हे यश खास आहे ते वेगळ्या कारणासाठी. कोनेरू हम्पी (2001), द्रोणवल्ली हरिका (2008) नि सौम्या स्वामीनाथन (2009) यांच्यानंतर हा चषक पटकावणारी ती केवळ चौथी भारतीय तरुणी. त्यामुळं भारताला आणखी एक जागतिक ‘ज्युनियर चॅम्पियन’ मिळालाय तो तब्बल 15 वर्षांनी…देशमुख या स्पर्धेतील केवळ अव्वल मानांकित खेळाडू नव्हती, तर तिचे 2456 गुणांचे ‘एलो रेटिंग’ दुसऱ्या मानांकित बुद्धिबळपटूपेक्षा 156 गुणांनी अधिक होते. याचा अर्थ असा की, तिला खराब खेळ करणं परवडणारंच नव्हतं. कारण तसं घडल्यास तिनं कष्टानं कमाई केलेले ‘एलो गुण’ गमावून बसण्याचा प्रसंग तिच्यावर ओढवला असता. त्यामुळं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्याच्या आनंदापेक्षा सुटकेचा नि:श्वास आपण जास्त सोडला असं ती म्हणते ते उगाच नव्हे…
दिव्या देशमुखनं 11 पैकी 9 सामने जिंकले आणि बाकीचे दोन बरोबरीत सोडविले. यातून तिनं आपल्या खात्यात जमा केले ते सातपेक्षा जास्त ‘एलो’ गुण. या कामगिरीच्या बळावर ती महिला विभागातील ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये 20 क्रमांकावर पोहोचलीय…‘एलो गुणांचं दडपण होतंच. या स्पर्धेसह मला फक्त दोन जागतिक कनिष्ठ स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आणि ही स्पर्धा जिंकण्याची माझी नेहमीच मनीषा राहिली होती. ती भारतात आयोजित करण्यात आल्यानं मला आणखी सोपं झालं. पण द्वितीय मानांकित मरियमसारख्या माझ्या अनेक प्रतिस्पर्धी प्रत्यक्षात त्यांच्या रेटिंगपेक्षा चांगल्या होत्या’, दिव्या सांगते…किताब पटकावण्याच्या बाबतीत तिला शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीला तेंड द्यावं लागलं ते मरियममुळंच…
‘स्पर्धेत उतरताना अपेक्षांचा दबाव मला निश्चितच जाणवत होता. प्रत्येकाला माझ्याकडून प्रतिस्पर्ध्यांना साफ केलं जाण्याची अपेक्षा होती. कारण ‘रेटिंग’चा विचार करता बाकीच्या खेळाडूंत व माझ्यामध्ये असलेलं खूप अंतर. मी त्या अपेक्षा पूर्ण करू शकले याचं मला समाधान वाटतंय. पण माझ्या स्व त:च्या मात्र फारशा अपेक्षा नव्हत्या. जर विजयी झाले, तर चांगलंच असा मी विचार करत होते’, दिव्याचे शब्द…
‘प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास मी निकालाच्या संदर्भात अपेक्षा ठेवण्यावर विश्वास ठेवत नाही. माझ्या वैयक्तिक उद्दिष्टांवर भर देण्याकडे माझा अधिक कल असतो. माझ्या हातून कसा खेळ होतो अन् माझ्या खेळाची ताकद नि गुणवत्ता यावर मी जास्त लक्ष केंद्रीत करते. या स्पर्धेत मी फक्त एकच गोष्ट साध्य करू पाहत होते अन् ती म्हणजे चांगल्या दर्जाचा बुद्धिबळ खेळणं. मी तेच करण्याचा प्रयत्न केला’, देशमुख म्हणते…सध्या भारतात ‘ग्रँडमास्टर’ बनू शकलेल्या केवळ तीन महिला बुद्धिबळपटू आहेत. त्यात आपली भर टाकणं हे तिच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक…रणनीती आखण्यातील कौशल्य, दूरदर्शीपणा अन् आक्रमक खेळ ही वैशिष्ट्यां असलेल्या दिव्या देशमुखला त्याशिवाय गाठायचाय तो 2500 च्या रेटिंगचा स्तर!
लहानपणापासूनच झेप…
दिव्या देशमुखची प्रतिभा सर्वप्रथम समोर आली ती 2014 मध्ये…त्यावेळी तिनं वयाच्या आठव्या वर्षी 10 वर्षांखालील मुलींचं जागतिक विजेतेपद पटकावलं. 2017 मध्ये आणखी एक जागतिक विजेतेपद(12 वर्षांखालील मुलींचा गट) जिंकून तिनं आपण चांगली प्रगती केली असल्याचं सिद्ध करून दाखविलं…
तिचे वडील जितेंद्र देशमुख व आई नम्रता देशमुख हे दोघेही डॉक्टर. त्यांनी मुलीच्या प्रचंड वाढीमध्ये मोलाची भूमिका बजावलीय…‘13 वर्षं केलेले कठोर परिश्रम, अगणित तासांचा सराव आणि कुटुंबाकडून मिळालेलं सतत प्रोत्साहन यामुळं हे यश प्राप्त झालंय’, दिव्या बुद्धिबळपटू म्हणून केलेल्या प्रवासावर बोलताना म्हणते…
2022 पासून दिव्याची कामगिरी खूप सुधारत गेलीय. तिनं भुवनेश्वरमध्ये पहिलं राष्ट्रीय महिला विजेतेपद जिंकलं आणि त्यानंतर चेन्नईत झालेल्या ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’मध्ये कमाई केली ती वैयक्तिक कांस्यपदकाची…
‘दिव्य’ पराक्रम…
ताजा किताब हे दिव्या देशमुखचं तिसरं विश्वविजेतेपद…तिनं यापूर्वी 10 वर्षांखालील आणि 12 वर्षांखालील गटांतून जागतिक विजेतेपद पटकावलं होतं…
विविध वयोगटांतील 38 स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना दिव्यानं कमाई केलीय ती 21 सुवर्ण, सात रौप्य आणि पाच कांस्यपदकांची…गेल्या वर्षी तिनं आशियाई महिला विजेती बनण्याचा मान मिळविला. त्यापूर्वी तीन वेळा तिनं जिंकला तो आशियाई युवा किताब…
दोन वेळा राष्ट्रीय महिला विजेती बनलेल्या दिव्यानं नुकत्याच झालेल्या जागतिक कनिष्ठ स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करण्यापूर्वी बारावीच्या परीक्षेसाठी ब्रेक घेतला होता. तरीही तिनं यश मिळवून दाखविलं…लहानपणापासूनच किताब जिंकत आलेल्या दिव्याच्या मागील 12 महिन्यांतील सर्वांत मोठ्या सिद्धीपैकी ही एक…
2020 साली झालेल्या ‘ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड’चं रशियासह संयुक्तपणे जेतेपद जिंकलेल्या भारतीय संघाची देखील ती सदस्य होती. पाच वेळचा विश्वविजेता महान विश्वनाथन आनंदचा त्या चमूत समावेश होता. त्यामुळं त्यावेळी 14 वर्षांच्या असलेल्या दिव्याकरिता तो संस्मरणीय अनुभव ठरला…
गतवर्षीपासून दाखविलेली चमक…
2023 साली दिव्या देशमुखनं भारतातील अव्वल महिला खेळाडूंमधील आपलं स्थान मजबूत करतानाच सुऊवात केली ती कोल्हापुरात दुसऱ्या राष्ट्रीय महिला किताबावर शिक्कामोर्तब करून…
पुढं आशियाई महिला विजेतेपद पटकावून तिनं आपल्या प्रगतीत खराच दम असल्याचं दाखवून दिलं. या विजयामुळं तिला महिला विश्वचषकात स्थान मिळालं. बाकूमध्ये बाद पद्धतीनं खेळविण्यात आलेल्या त्या स्पर्धेत तिन पहिल्याच फेरीत ग्रँडमास्टर होआंग थान ट्रांगला पराभूत केलं होतं. पुढच्या फेरीत तिला अलेक्झांड्रा गोर्याचकिनाविऊद्ध नमतं घ्यावं लागलं. अलेक्झांड्रानंच ती स्पर्धा नंतर जिंकली हे विशेष…
पण दिव्यासाठी खरा मोठा क्षण आला तो सप्टेंबरच्या सुऊवातीला. तेव्हा तिनं ‘टाटा स्टील इंडिया महिला रॅपिड’ स्पर्धेचं जेतेपद पटकावताना चक्क महिला विश्वविजेती जू वेनजून, माजी महिला विश्वविजेती अॅना उशेनिना अन् माजी जागतिक रॅपिड चॅम्पियन कोनेरू हम्पी यांना पछाडून दाखविलं. खरं तर दिव्याची वर्णी लागली होती ती अखेरच्या क्षणी आर. वैशालीच्या जागी. पण शेवटचं मानांकन लाभूनही तिनं एका अनुभवी व्यावसायिक खेळाडूप्रमाणं कामगिरी केली अन् हम्पी, द्रोणवल्ली हरिका नि इरिना क्रश यांच्यावर विजय मिळवत तब्बल 181 रेटिंग गुण पदरात पाडले…
यंदाच्या ‘टाटा स्टील चॅलेंजर्स’मध्येही आपल्या कौशल्याची चुणूक दाखविताना देशमुखनं ग्रँडमास्टर जैमे सांतोस लतासा व लियाम व्रोलिज्क यांना नमविलं…‘ग्रेन्के ओपन’मध्ये ‘ग्रँडमास्टर’ नॉर्म’ गाठण्याच्या जवळ पोहोचल्यानंतर तिनं यंदाच्या मे महिन्यात ‘शारजाह चॅलेंजर्स’ जिंकली. हा तिचा आंतरराष्ट्रीय ‘ओपन’ स्पर्धेतील पहिला किताब…
दिव्या देशमुखचे मागील चार वर्षांतील प्रमुख किताब…
वर्ष स्पर्धा किताब
2020 फिडे ऑनलाईन चेस ऑलिम्पियाड (सांघिक) सुवर्णपदक
2022 महिलांची भारतीय बुद्धिबळ स्पर्धा विजेती
2022 चेस ऑलिम्पियाड (वैयक्तिक) कांस्यपदक
2023 टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धा (महिलांचा रॅपिड विभाग) प्रथम स्थान
2024 फिडे विश्व 20 वर्षांखालील मुलींची बुद्धिबळ स्पर्धा विजेती
खेळ जुनाच ओळख नवी ! : लॅक्रोस
लॅक्रोस….या खेळाचा उगम 12 व्या शतकातील उत्तर अमेरिकेतील स्थानिक लोकांच्या विरंगुळ्यासाठीच्या प्रकारातून झाला. मूळ कॅनेडियन परंपरेत हा खेळ विधीचा भाग होता आणि शेकडो पुऊषांचा समावेश असलेले संघ अनेक किलोमीटर लांब मैदानात खेळायचे…मिशनरींनी 17 व्या शतकात या खेळाचे दस्तऐवजीकरण केले आणि त्यानंतर जवळजवळ 100 वर्षांनी दंतचिकित्सक विल्यम जॉर्ज बियर्स यांनी ‘माँट्रियल लॅक्रोस क्लब’ची स्थापना केली तसंच खेळाचे नियम ठरविले…
लॅक्रोस हा एक सांघिक खेळ…यात खेळाडू प्रतिस्पर्ध्यांच्या गोलमध्ये रबरबॉल हाणण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी टोकाला जाळी असलेली काठी वापरतात…
या खेळामध्ये काठीच्या शेवटी असलेल्या जाळीचा वापर चेंडू वाहून नेण्यासाठी, पास करण्यासाठी, पकडण्यासाठी आणि शूट करण्यासाठी केला जातो. फक्त गोलरक्षकास चेंडूला हातांनी स्पर्श करण्याची परवानगी राहते…
फिल्ड लॅक्रोस हा प्रत्येकी 10 खेळाडूंच्या संघांचा खेळ, जो 100 मीटर्स × 55 मीटर्स मैदानात खेळविला जातो. यात तीन आघाडीपटू, तीन मिडफिल्डर्स, तीन बचावपटू व एक गोलरक्षक अशी संघरचना असते…खेळाडूंचा एकमेकांशी संपर्क येत असल्यानं आणि हवेत काठ्या फिरविल्या जात असल्यानं विस्तृत संरक्षणात्मक उपकरणं वापरणं आवश्यक असतं…
‘फेस ऑफ’नं सुरुवात होते. म्हणजे पुरुषांच्या खेळात मैदानाच्या मध्यास चेंडू जमिनीवर टाकल्यानंतर दोन प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये ताबा मिळविण्यासाठी चुरस लागते…महिलांच्या खेळात दोन प्रतिस्पर्धी खेळाडू सुरुवातीला दोन्ही बाजूंनी सज्ज राहतात आणि रोखलेल्या दोन्ही काठ्यांच्या मागील बाजूने मधोमध चेंडू टाकला जातो. सदर चेंडू नंतर खेळाडू हवेत उडवितात व ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतात…गोल केल्यानंतर पुन्हा खेळास मध्यभागातून सुरुवात होते…
पुढील म्हणजे 2028 च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा रंगतील त्या ‘वर्ल्ड लॅक्रोस सिक्स’च्या. या स्वरुपाची निर्मिती 2021 मध्ये ‘वर्ल्ड लॅक्रोस’ या खेळाच्या जागतिक संघटनेकडून झाली…
हा प्रकार 70 मीटर्स × 36 मीटर्स मेदानात खेळली जातो. त्यात पाच खेळाडू आणि एक गोलरक्षक असा सहा जणांचा संघ खेळविला जातो. संघरचना तीन आघाडीपटू व दोन मिडफिल्डर्स अशी राहते. आठ मिनिटांच्या चार सत्रांमध्ये खेळ रंगतो अन् यात गोल झाल्यानंतर गोलरक्षकच खेळ पुन्हा सुरू करतो…
‘वर्ल्ड लॅक्रोस सिक्स’मध्ये 30 सेकंदांचं ‘शॉट क्लॉक’ असतं. या मुदतीत संघानं गोल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा चेंडूवरील ताबा तरी सोडला पाहिजे…किरकोळ ‘फाऊल’ झाल्यास खेळाडूला 30 सेकंदांसाठी पेनल्टी बॉक्समध्ये पाठविलं जातं आणि मोठ्या ‘फाऊल’साठी एका मिनिटाचं निलंबन होतं…
सामन्याच्या शेवटी सर्वाधिक गोल केलेला संघ जिंकतो. बरोबरी झाल्यास गोल होईपर्यंत चार मिनिटांचे ‘सडन-डेथ ओव्हरटाईम’ खेळविले जातात…
‘वर्ल्ड लॅक्रोस सिक्स’ ऑलिम्पिकमध्ये प्रथमच पाऊल ठेवणार असला, तरी ‘फिल्ड लॅक्रोस’ यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये झळकलाय…पुऊषांच्या लॅक्रोस स्पर्धा या सेंट लुईस (1904) आणि लंडन (1908) इथं झालेल्या ऑलिंपिकच्या भाग होत्या…अॅमस्टरडॅम (1928), लॉस एंजलिस (1932) अन् लंडन (1948) इथं झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याचा ‘प्रात्यक्षिक खेळ’ म्हणून समावेश राहिला…अमेरिका नि कॅनडा हे ‘फिल्ड लॅक्रोस’मधील मातब्बर संघ…
– राजू प्रभू
महाराष्ट्रातील पहिल्या महिला क्रिकेट पंच : ज्योती काटकर
राष्ट्रीय क्रिकेटर, एनआयएस कोच, महाराष्ट्र टिम सिलेक्टर म्हणूनही क्रिकेटसाठी दिले योगदान
खेळाला जीवनाचं पॅशन केलं की करिअरचा मार्ग कसा सापडतो, हे कोल्हापूरच्या माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू व विद्यमान महिला क्रिकेट पंच ज्योती जयसिंगराव काटकर यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी गेल्या 20 वर्षाच्या कालावधीत महिला क्रिकेटपटू, एनआयएस कोच आणि महाराष्ट्र टिम सिलेक्टर अशा तिनही भूमिका चोखपणे पार पाडत महाराष्ट्र क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले. या योगदानानंतरचीच फलप्राप्तीच म्हणून त्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) पंच परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रातील पहिल्या महिला क्रिकेट पंच बनल्या आहेत. गेल्या काही महिन्यात त्यांनी स्थानिकसह राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमधील 40 सामन्यांत पुऊष पंचाच्याबरोबरीने पंचगिरी करत आपल्यातील टॅलेंट दाखवले आहे. रणजी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंचगिरी करण्याचे लक्ष्य त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यांची क्रिकेटमधील ही कामगिरी समाजातील मुलींना खेळात करीअर करण्याची जणू सादच घालत आहे.
ज्योती या राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला क्रिकेट पंच बनल्याचे श्रेय त्यांचे सख्खे भाऊ संग्राम यांना द्यावेच लागेल. कारण क्रिकेटमधील करीअरचा राजमार्ग संग्राम यांनीच ज्योती यांना दाखवला आहे. तू मुलगी आहे, क्रिकेट कसले खेळतेस़् म्हणत संग्राम यांनी ज्योती यांना क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर नेले नसते तर त्यांच्या ऊपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला क्रिकेट पंच मिळाल्या नसत्या. ज्योती ह्या अवघ्या 10 वर्षाच्या असताना भाऊ त्यांना कोल्हापुरातील विक्रमनगरातील मोकळ्या जागेत टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी नेत होते. येथूनच ज्योती यांची क्रिकेटसाठीची पहिली इनिंग सुऊ झाली. मैदानात भाऊ व त्यांच्या सहकारी मित्रांसोबत फलंदाजीसह गोलंदाजीचाही सराव कऊ लागल्या. बऱ्याच वर्षांच्या सरावानंतर ज्योती चांगल्या गोलंदाज आणि फलंदाजही बनल्या.
क्रिकेटमधील पहिला इंनिग…
ज्योती यांच्या क्रिकेट करिअरला खरा ब्रेक मिळाला तो म्हणजे बारावीनंतर. कमला कॉलेजमध्ये शिक्षण घेत ज्योती यांनी लेदरबॉल क्रिकेटच्या सरावाला सुऊवात केली. गोलंदाजी व फलंदाजीचे गुण लहानपणीच अंगात निर्माण झाल्याने ज्योती यांना कमला कॉलेजच्या संघात सहज स्थान मिळाले. सोलापूरात झालेल्या आंतरविभागीय महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेल्या कमला कॉलेज संघाला फारसे यश मिळाले नसले तरी ज्योती यांची गोलंदाजी उठून दिली. त्यामुळेच त्यांना अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात स्थान दिले. यावेळी शशिकांत घोरपडे यांच्याकडून फलंदाजीचे धडे घेतले. पॉण्डेचेरीतील (तामिळनाडू) अ. भा. आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत ज्योती यांनी गोलंदाजीसह फलंदाजीतही कसब दाखवले. पॉण्डेचेरीहून कोल्हापूरात परतल्यानंतर ज्योती यांना महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्यासाठी त्यांना वुमन्स क्रिकेट असोसिएशनने पुण्यात आयोजित केलेल्या महाराष्ट्र संघ निवड चाचणीत स्वत:ला सिद्ध करावे लागले. झारखंडमध्ये 2003 साली झालेल्या राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळलेल्या ज्योती यांनी क्रिकेटमधील आपल्या प्रगतीचा आलेख वाढवतच नेला. पुढे शिवाजी विद्यापीठ संघातून चारवेळा अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी प्रतिनिधीत्व केले. अनेक सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 ते 4 बळी घेण्याचा पराक्रम केला. 2007-08 साली राजस्थानमधील बनस्थळीमध्ये झालेल्या अ. भा. आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी तर त्यांच्याकडे शिवाजी विद्यापीठ संघाच्या कप्तानपदाची धुराही सोपवली होती.
दुसरी इनिंग….
2007-08 सालीच ज्योती यांना क्रिकेटमध्ये करीअर करण्याची कुणकुण लागली. त्यानुसार एनआयएस क्रिकेट कोच होण्याचे मनाशी पक्के केले. पतियाळा (पंजाब) येथील नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्मध्ये (एनआयएस) प्रवेशही मिळवला. या इन्स्टिट्यूटमध्ये निवासी पद्धतीने एक वर्षाचा डिप्लोमा इन क्रिकेट कोचिंग हा कोर्स पूर्ण केला. इन्स्टिट्यूटने घेतलेल्या परीक्षेत उत्तम यशही मिळवले. या यशाने ज्योती यांची क्रिकेटमधील दुसरी इनिंग सुऊ झाली. कोल्हापूराच्या सीमा ओलांडून दुसऱ्या इनिंगचे ओपनिंग करत त्या पुण्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे क्रिकेट मार्गदर्शक म्हणून ऊजू झाल्या. तब्बल पाच वर्षे त्यांनी मुला-मुलींना क्रिकेटच्या महत्वपूर्ण अशा टिप्स दिल्या. या काळात स्वत:चीही अॅकॅडमी सुऊ केली. त्यामुळे आर्थिक स्त्राsत सुऊ ज्योत स्वावलंबी बनल्या. अॅकॅडमीच्या माध्यमातून 14, 16 व 19 वर्षाखालील शंभरावर मुला-मुलींना गोलंदाजी, फलंदाजीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊ लागल्या. त्यांनी पुण्यातील आझम कॅम्पसमधील शाळेच्या 14 वर्षाखालील मुलांच्या आणि ज्युनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाला प्रशिक्षण दिले. या दोन्हीही संघांनी पुणे जिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. ज्योती यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतलेल्या अनेक मुला-मुलींनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेंपर्यत मजल मारली आहे. 2015 ते 22 या कालावधीत भारतीय क्रिकेट संघाचे असिस्टंट फिल्डर कोच अतुल गायकवाड यांच्या क्रिकेट नेक्टस् अॅकॅडमी व मुंबईतील नेऊळ जिमखानाच्या माध्यमातूनही ज्योती यांनी खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. क्रिकेटमधील कामगिरी व कोचिंगमधील अनुभवाची दखल घेऊन ज्योतींना स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने शालेय महाराष्ट्र 14, 16 19 मुला-मुलींच्या संघ निवड समितीवर संधी दिली. ही संधी सार्थ ठरवत सलग तीन वर्षे त्यांनी महाराष्ट्र संघ निवडण्यात महत्वपूर्ण कामगिरी केली.
तिसरी इनिंग…
2023 साली ज्योती यांची तिसरी इनिंग सुऊ झाली ती म्हणजे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव केदार गयावळ यांच्यानिमित्ताने. गयावळ यांनी ज्योती यांना क्रिकेट पंच बनण्यासाठी प्रोत्साहित केले. ज्योती यांनीही मनावर घेऊन क्रिकेट पंच बनण्यासंदर्भातील अभ्यासाला करत. पंचांचे लॉ जाणून घेतले. रत्नागिरीमध्ये एमसीएने पंचगिरीसंबंधीत आयोजित केलेले चार दिवसांचे ट्रेनिंग पूर्ण केले. रायगडचे पंच नयन कट्टा यांच्याकडूनही पंचगिरीच्या टिप्स घेत पंच निर्णयासंबंधीत असलेल्या लॉमधील बारकावे जाणून घेतले. सर्व तयारीनिशी एमसीएने घेतलेली प्रत्येकी 100 गुणांची लेखी व तोंडी परीक्षा दिली. एमसीएच्या समितीसमोर क्रिकेटमधील लॉवर एक टॉपिक सादर केला. यानंतर समितीने टॉपिकसह पंचांशी संबंधीत ज्योती यांना प्रश्न विचारले. त्यांची योग्य उत्तरे दे ज्योती वायवाला सामोरे गेल्या. त्यातही त्यांना पंचांच्या निर्णयावर आधारीत व्हिडीओ दाखवून उलट-सुलट प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांनाही समर्पक उत्तरे दिलेल्या ज्योती परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे एमसीएने जाहीर केले. इतकेच नव्हे तर त्यांनी पंचगिरी करायला सुऊवात केली. राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट (दोन दिवसीय) स्पर्धेअंतर्गत इचलकरंजीमध्ये युनायटेड क्लब (पुणे) वि. हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात झालेल्या सामन्यात त्यांनी पहिल्यांदा पुऊष पंचांसोबत पंचगिरी केली. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित 14, 16, 19 मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसह बी, सी, डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेतही पुऊष पंचांच्या खांद्याला खांदा लावून पंचगिरी करत आपले टॅलेंट दाखवून दिले. याचबरोबर एमसीएच्या 14 व 19 वर्षाखालील निमंत्रितींच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेसह कोल्हापूर-पुणे येथे झालेल्या वरिष्ठ महिलांच्या टी-ट्वेटी व वन-डे सामन्यानंतर व 19 वर्षाखालील मुलींच्या वन-डे सामन्यांमध्येही धाडसाने पंचगिरी कऊन दाखवली. त्यांना मुंबई इंडियन्स ज्युनिअर क्रिकेट स्पर्धेतही पंचगिरी करण्याची संधी दिली गेली. सध्या पंचगिरीचा व्याप सांभाळत त्या केडीसीएच्या मुलींच्या संघाला प्रशिक्षण देण्याचेही काम करत आहेत. आपल्याला एकुणच क्रिकेटमधील कामगिरीसाठी केडीसीएचे बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, चेतन चौगुले, केदार गयावळ, नितीन पाटील, अभिजित भोसले, जर्नादन यादव, अजित मुळीक व विजय सोमाणी यांचे सहकार्य लाभल्याचे ज्योती यांनी सांगितले आहे.
-संग्राम काटकर, कोल्हापूर